पुरुलिया छाऊ : भारतातील विविध लोकनृत्यापैकी एक लोकनृत्य. प्रामुख्याने भारतातील बंगाल, बिहार आणि ओडिशा या राज्यात प्रसिद्ध. छाऊ नृत्याचे आरंभ क्षेत्र प्रामुख्याने पश्चिम बंगालमधील नैऋत्येकडील क्षेत्र, बिहार मधील दक्षिणेकडील क्षेत्र आणि ओडिशा मधील उत्तर आणि पश्चिम क्षेत्रांमध्ये पहावयास मिळते. छाऊ नृत्याच्या विविध प्रकारांपैकी तीन प्रमुख प्रकार मानले जातात, ज्यांना त्यांच्या प्रचलित ठिकाणानुसार ओळखले जाते. पुरुलिया जे पश्चिम बंगालमध्ये आहे. मयुरभंज हे ओडिशा राज्यामध्ये आहे. तर सिरईकेला हे बिहार राज्यांमध्ये आहे. मात्र सर्व छाऊ नर्तक आपापल्या नृत्यामध्ये ओडिआ भाषेचा वापर करतात. मयुरभंज व सिरईकेला यांना पूर्वी त्या प्रदेशातील राजांनी उत्साहवर्धक संरक्षण दिले. त्यामुळे छाऊ नृत्याच्या या दोन मुख्य शैली सर्वाधिक विकसित आहेत. त्यांचे व्याकरण व शास्त्र संरक्षित आहे. मुख्यतः या नृत्यांचे शास्त्र लिखित स्वरूपात जरी नसले तरी मौखिक व परंपरेच्या माध्यमातून अधिक विकसित व संरक्षित झालेले आहे. छाऊ या नृत्याची पुरुलिया शैली सहज सोपे शास्त्र, व्याकरणासह नाट्यचरित्र सादरीकरणासाठी  सक्षम आहे. या नृत्यात मार्शल आर्ट्स (जपानी संरक्षण खेळ), अ‍ॅक्रोबॅटिक्स (कसरत) आणि अ‍ॅथेलेटिक्स (अंगचापल्य खेळ) सादर करण्यापासून ते लोकनृत्याच्या उत्सवाच्या कथानकासोबतच, शैव, शक्ती आणि वैष्णव धर्मातील धार्मिक कथानक असलेले संरचित नृत्य समाविष्ट आहे.

स्वरूप : छाऊ नृत्य शैलीमध्ये प्रामुख्याने मुखवट्यांचा वापर करून विविध नृत्यप्रकार सादर केले जातात. पुरुलिया व सिरईकेला या शैलीमध्ये मुखवट्यांचा प्रयोग केला जातो. तर मयूरभंज शैलीच्या नृत्यप्रकारात मुखवट्यांचा वापर केला जात नाही. सिरईकेला मध्ये मुखवटे अधिक मोठे असतात तर उंच टोपाचा प्रयोग केलेले पुरुलियामध्ये  मुखवटे अधिक नाट्यमय असतात. पश्चिम बंगालमधील पारंपरिक जात्रा या रंगमंचीय लोकनाट्यातून प्रभावित होऊन पुरुलिया छाऊ नृत्य एक प्रभावशाली नाट्याभिनयता आणि मुखवट्यांचा वापर करून नृत्य स्वरूपात सादर केले जाते. यामध्ये पौराणिक प्रसंग सुस्पष्टपणे सादर केले जातात.

छाऊ नृत्य शैली निर्मिती, विकास, शास्त्र यासंबंधी ऐतिहासिक दस्तऐवज लिखित स्वरूपात नसल्यामुळे छाऊ या शब्दाचा मुख्य अर्थ यासंबंधी अनेक मतांतरे आहेत. मात्र या सर्व प्रकारच्या नृत्यामध्ये प्रामुख्याने सादर होणारे प्रसंग युद्धाशी संबंधित आहेत. मयुरभंज छाऊ मधील प्रारंभिक नृत्यास रुक-मार-नाचा म्हणतात. याचा शाब्दिक अर्थ आहे – सुरक्षा आणि आक्रमणाचे नृत्य. तर सिरईकेला छाऊ मधील प्रारंभिक नृत्य प्रकारास फारी-खांडा-खेला  म्हणतात. याचा शाब्दिक अर्थ आहे – ढाल आणि तलवार यांचे नाट्य. अनेक विद्वानांच्या मतांनुसार प्राचीन काळात सैनिक वजनदार शस्त्र वापरत असत. या शस्त्रांचा प्रभावी प्रयोग करण्यासाठी नर्तकाप्रमाणे स्फूर्तीदायक शरीराची गरज असे. त्यामुळे सैनिक विविध अस्त्र-शस्त्र मध्ये कुशल होत. त्यामुळे सैनिकांच्या युद्ध प्रशिक्षणात या नृत्यशैलीचा वापर केला जात असे. पारंपरिक युद्ध संबंधी कलाकौशल्य आजही आपल्या देशात पाहायला मिळतात. ज्यामध्ये मणिपूरचा थांग ता,  केरळमधील कलरीपयेट्टू हे आजही युद्धासंबंधीचे कलाकौशल्य आहेत. ओडिशामध्येही या प्रकारची  परंपरा विद्यमान आहे. जी पाईका नाच या नावाने ओळखली जाते. प्राचीन काळात छाऊ या नृत्याचा एक प्रकार पाईका नाच नावाने प्रसिद्ध होता, याचा अर्थ सैनिकांचे नृत्य असा होतो. यामुळेच प्रमुख विद्वानांच्या मते छाऊ म्हणजे एक युद्धनृत्यच होय.

रामायणातील विविध प्रसंग

प्राचीन परंपरेमध्ये छाऊ हे केवळ युद्ध नृत्य नव्हते तर त्याद्वारे आत्मिक अनुष्ठान सुद्धा केले जात असे. याचबरोबर छाऊ नृत्यातून युद्धातील विजयासाठी प्रेरित केले जात असे. छाऊ नृत्याच्या विविध शैली चैत्र महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजऱ्या केला जाणाऱ्या चैत्र उत्सवामध्ये चरमसीमेवर असतात. बंगाली आणि आणि ओरिसा कॅलेंडरनुसार हा वर्षाचा शेवटचा दिवस असतो. पश्चिम बंगालमध्ये बागमुडी क्षेत्र हे पुरुलीया छाऊ नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. या क्षेत्रांमधील नृत्य कार्यक्रमांमध्ये पारंपरिक संगीत आणि कथानक  कायम आहेत.

पुरुलीया छाऊ नृत्य मोकळ्या मैदानामध्ये पारंपारिक पद्धतीने सादर केले जाते. कार्यक्रम सादरीकरणासाठी साधारणपणे ३० फूट × ३० फूट मोकळी जागा आवश्यक आहे. ही जागा ६ फूट रुंदीच्या भागाने जोडली जाते. यामुळे नृत्य कलाकार येथून कार्यक्रमासाठी आत व बाहेर जाऊ शकतात. याची लांबी साधारणपणे २० फुट लांब असते. सामान्यतः कार्यक्रम सादरीकरणाची क्षेत्र ३० फुट  व्यासाच्या  गोलाकारप्रमाणे असते. सर्व श्रोते या क्षेत्राच्या बाजूने जमीनीवर सभोवताली बसतात. स्त्रियांसाठी एक उंच चबुतरा तयार केलेला असतो. कार्यक्रम साधारणतः रात्री १० वाजता सुरू होतो आणि तो संपूर्ण रात्रभर चालतो. कधीकधी कार्यक्रम सूर्योदयापूर्वी  तासभर आधी संपतो. कार्यक्रम पाहण्यासाठी दर्शक रात्रीचे जेवण करून उपस्थित राहतात.

रचना  : नृत्य सादरीकरणापूर्वी संगीतकार मुख्यतः ढोल वादक आपले कौशल्य सादर करतात. रात्री सादर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये एकापेक्षा अधिक समूह आणि त्यांचे संगीतकार, ढोलवादक  आपापल्या समूहामध्ये आपले वादन सादर करतात. सर्व समूहांच्या संगीतकारांच्या सादरीकरणानंतर या नृत्यातील आरंभिक सादरीकरण संपते. त्यानंतर श्री गणेश स्तुती प्रारंभ केली जाते. या प्रकारच्या सर्व नृत्यामध्ये सादरीकरण हे सामूहिक नृत्याद्वारेच केली जाते. बागमोडी क्षेत्रातील नृत्यामध्ये महिषासुर वध, परशुराम पराजय या विषयावर नृत्य सादरीकरण केले जाते. आरंभी कार्यक्रमानंतर रामायणावर आधारित क्रमबद्ध कार्यक्रम सादर केले जातात. रामायणाचे  संपूर्ण सादरीकरण ३० क्रमबद्ध प्रसंगाद्वारे सादर केले जाते. हे ३० प्रसंग सादर करण्यासाठी साधारणपणे दोन रात्रींचा वेळ लागतो. याबरोबरच महाभारत आणि विविध पौराणिक कथा यांचेही  सादरीकरण केले जाते.

संगीत :  नृत्यासोबत संगीत साथ-संगत करण्यासाठी तीन प्रकारचे संगीत वाद्य वापरले जातात. मधु वाद्य शानाई (एक सुषिर वाद्य), तर छाऊ नृत्य शैलीतील प्रत्येक प्रकारांमध्ये ढोल संगीत मुख्य असते. यामध्ये दोन प्रकारचे ढोल वाजवले जातात. पहिला सामान्य ढोल वादक हा प्रत्येक समूहाचे नेतृत्व करत असतो. दुसरा ढोल धूमसा किंवा ढाक या नावाने ओळखला जातो. ज्याचा आकार नगाऱ्यासारखा असून दोन लाकडी काड्यांनी तो वाजवतात. शानाई वर वाजवले जाणारे संगीत किंवा धून या प्रामुख्याने पुरुलिया आणि मयूरभंज शैलीच्या झूमर गीतांवर आधारित असतात. यामधील असणाऱ्या गीतात्मक सौंदर्यामुळे तसेच साथीच्या ढोल वादनामुळे निर्माण होणारे संगीत अधिक आकर्षक होते. याबरोबरच झांज, टाळ हे वाद्यही वाजवितात.

नृत्य व त्याच्या अवस्था : पुरुलिया छाऊ या नृत्यास कोणतेही विस्तृत शास्त्र किंवा व्याकरण लिखित स्वरूपात अस्तित्वात नाही. मात्र पुरुलिया छाऊ नर्तकांसाठी पारंपरिक पद्धतीनुसार विशिष्ट अभ्यास करणे आवश्यक असते. यामध्ये नायक आणि राजसी चाल, दैत्य, दानव यांची अहंकारी चाल, शत्रूचा शोध घेणारी चाल, विविध प्राण्यांची (माकड, वाघ, सिंह, चित्ता, हत्ती) चाल, गुडघ्यावर चालणे, गती युक्त संचालन, रांगण्याची मुद्रा, पोहण्याचे संचलन अशा विविध चालीचा समावेश होतो. यासोबतच विशिष्ट प्रकारच्या उड्यामध्ये एका पायावर उडी मारणे, दोन पायांची उडी, उडी घेऊन हवेमध्ये गोल फिरणे, वाघ, सिंह, माकड, अशा प्राण्यांच्या आवाजासह उड्या मारणे. यांचा सराव करावा लागतो. याशिवाय या नृत्यातील विशेष आकर्षक  भाग सादर करण्यासाठी काही विशिष्ट शैली व त्यांचा अभ्यास आवश्यक असतो. यामध्ये मुकुट हलविणे, खांदे हलविणे, तसेच अंगावर धारण केलेली पूर्ण प्रतिमा हलवणे, या कौशल्यांचा समावेश होतो.

नृत्यासाठी मुखवटा निर्मिती : पुरुलिया छाऊ या नृत्यामध्ये मुखवट्यांची भूमिका फार महत्त्वाची असते. मुखवटा निर्माण करणारे मुख्यतः मातीचे शिल्पकार असतात. मुखवटा बनविण्यासाठी माती, कागदाचे तुकडे, कणकीची खळ आणि विविध रंग वापरले जातात. याची टप्पे पुढीलप्रमाणे – माटी गाडा (मातीचा आकार देणे), कागज चिट्टानो (कागद चिटकवणे), काबीज लेपा (माती लावणे), चीता माटी (कपडे चिटकवणे), थापी पॉलिश (थापीने चकाकी करणे), काबीज लेपा (माती लावणे), सजानो (अलंकृत करणे). तसेच विविध चरित्रानुसार मुखवटे, त्यांचा आकार, कपडे, रंग यांचा वापर केला जातो. रामायण, महाभारत आणि विविध पौराणिक कथा यामधील चरित्र या मुखवट्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर केले जातात.

वेशभूषा आणि रंगभूषा : डोक्यावर विविध प्रकारचे टोप आणि मुखवटा हे पुरुलिया छाऊ नृत्याचे  महत्त्वपूर्ण अंग आहेत. मुखवटे असल्यामुळे साधारणपणे रंगभूषा अधिक प्रमाणात वापरली जात नाही. मात्र शिवशंकराचे  पात्र करणाऱ्या व्यक्तीसाठी वाघाच्या कातडीप्रमाणे कापड गुंडाळले जाते तर शरीरावर आणि पायावर चांदी सारख्या पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो. याचबरोबर कृत्रिम मोत्यांनी नक्षीकाम केलेले मखमली अंगरखा (जॅकेट) अंगामध्ये घातले जाते. राक्षसी चरित्रांसाठी काळया  रंगाचा पायजमा, तर देवी-देवतांसाठी गडद हिरव्या किंवा लाल रंगाचा पायजमा वापरतात. महिषासुर, अभिमन्यू, श्री गणेश, कार्तिकेय अशा चरित्रांचे सादरीकरण करण्यासाठी जोशपूर्ण नृत्य आवश्यक असते, यामध्ये विविध प्रकारच्या उड्यांचा समावेश असतो, त्यामुळे या सर्व पात्रांसाठी पायजमे वापरतात. ऋषी मुनी यांच्या चरित्रासाठी भगव्या रंगाचे धोतर वापरले जाते. पुरुलिया छाऊ नृत्य प्रकारांमध्ये स्त्री चरित्र खूपच कमी असते. यामध्ये कालिका देवी साठी काळया रंगाचा पायजमा तर दुर्गादेवी साठी लाल रंगाची साडी वापरली जाते. स्त्री पात्र साधारणपणे पुरुषच सादर करतात.

पुरुलिया छाऊ एका श्रेष्ठ नाट्यछटाद्वारे आणि संगीत नृत्याद्वारे प्रदर्शित केले जाते. ज्यामुळे प्रस्तुत पौराणिक कथा यांचे सुस्पष्ट सादरीकरण, मनोरंजन, जनजागृती करण्याचे काम केले जाते. २०१० मध्ये छाऊ नृत्य युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसाच्या यादीमध्ये समाविष्ट केले. ओडिशा सरकारने १९६० मध्ये सराईकेला येथे शासकीय छाऊ नृत्य केंद्र आणि १९६२ मध्ये मयूरभंज छाऊ नृत्य प्रतिष्ठानची स्थापना केली. या संस्था स्थानिक गुरू, कलाकार, संरक्षक, छाऊ संस्थांचे प्रतिनिधी आणि प्रायोजक सादरीकरणाच्या प्रशिक्षणात विविध कार्य करत आहेत. छाऊ नृत्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला ‘चैत्र पर्व उत्सव’ राज्य सरकारद्वारे पुरस्कृत केला आहे. संगीत नाटक अकादमीने ओडिशाच्या बारीपाडा येथे छाऊ नृत्यासाठी एक राष्ट्रीय केंद्र स्थापित केले आहे. बर्फी  या  हिंदी चित्रपटात पुरुलिया छाऊ नृत्याचा समावेश केलेला आहे.

संदर्भ :

  • Bhattacharya Asutosh, Chhau dance of Purulia, Rabindra Bharati University Publication, 1972.
  • Khokar, Mohan,Traditions of Indian Classical Dance,Clarion Books Publication,1984.
  • Purulia Chhau, CCRT Publications,New Delhi.