भाषा पुनरुज्जीवन : भाषा पुनरुज्जीवन ह्या प्रक्रियेची व्याख्या लोपप्राय किंवा सुप्त/ निष्क्रिय भाषेची संभाषक-संख्या वाढवणे व तिच्या वापराची क्षेत्रे विस्तृत करणे अशी करता येईल. भाषा जतनाचा (language maintenance) हेतू हा सद्य परिस्थितीचे रक्षण हा असतो, तर भाषा पुनरुज्जीवनाचा हेतू भाषाविस्तार हा असतो. समाजातील लहान मुले सक्रियपणे भाषेचा वापर करत असल्यास ती जिवंत समजली जाते. भाषेतून सांस्कृतिक समृद्धी जोपासली जाते, संभाषकांना एक विशिष्ट दृष्टिकोन मिळतो. तसेच अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण व वाढ भाषेद्वारे केली जाते. हे भाषा पुनरुज्जीवनामागचे प्रेरक हेतू आहेत. भाषा पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्याआधी भाषेची संरचना, भाषेला किती धोका आहे व भाषा बोलणाऱ्या समूहाच्या गरजा, उद्दिष्ट्ये व साधने तपासली जातात. समाजाची स्वतःच्या भाषेकडे पाहण्याची वृत्ती बदलणे हा बहुतेक भाषा पुनरुज्जीवन प्रकल्पांतील एक टप्पा असतो. अल्पसंख्यांक जमाती, विशेषतः शहरात वसलेल्या जमातींसाठी आदिवासी भाषा ज्ञात नसणे ही प्रतिष्ठेची बाब असते. काही अपवाद नमूद करायचे झाल्यास आसाम, बिहार, पश्चिम बंगाल व ओडिशा ह्या चार राज्यात बोलल्या जाणाऱ्या संथाली भाषेचा समाज द्विभाषी असूनही त्यांना संथाली बद्दल अभिमान आहे. संथाली इतर आदिवासी भाषा शैक्षणिक माध्यमासाठी वापरण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दक्षिणेकडील तोडा व कोटा समाजाने गावांत व शहरातही आपापल्या भाषांचे जतन केले आहे. समाजाबाहेरील व्यक्तीने पुनरुज्जीवनाला आरंभ केल्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, कविता रस्तोगी ह्यांनी, २००१च्या जनगणनेनुसार अवघी ७३२ संख्या असलेल्या, राजी भाषेच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न १९९८मध्ये सुरू केले होते.

भाषा पुनरुज्जीवन समाजिक व वैयक्तिक अशा दोन पातळींवर केले जाते. सामाजिक पातळीवर समाजातील भाषेच्या वापराच्या व्याप्तीवर व वैयक्तिक पातळीवर एखाद्याचे भाषेतील प्राविण्य किती आहे ह्यावर लक्ष केंद्रित केले जाते. भाषेला असलेल्या धोक्याच्या पातळीवरून तिच्या पुनरुज्जीवनाची पद्धती निवडली जाते. बाऊमन ह्या मानववंशशास्त्रज्ञानी भाषेची स्थिती व त्यानुसार ती जपण्याची पद्धत असा तयार केलेला आराखडा पुढीलप्रमाणे आहे ;

भाषेची स्थिती समृद्ध भाषा तग धरलेली भाषा ऱ्हास होणारी भाषा लोपप्राय भाषा लुप्त भाषा
प्रतिपालन पद्धतीचे स्वरूप प्रतिबंध विस्तार बळकटी आणणे जीर्णोद्धार पुनरुज्जीवन

 

भाषा पुनरुज्जीवनाच्या अनेक पद्धती आहेत, त्यापैकी काही पुढे दिल्या आहेत :

कमी धोका असलेल्या भाषांसाठी –

  • भाषा निमग्नता: ज्यात केवळ लक्ष्य भाषाच वापरली जाईल, शैक्षणिक माध्यम म्हणून सुद्धा. अशा वातावरणाची निर्मिती. उदा. न्यूझीलंडमधील माओरी (maori) भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी अशा प्रकारचा प्रकल्प स्थापन केला गेला.
  • द्विभाषी पद्धत : काही विषय रूढ भाषेत तर काही विषय लक्ष्यभाषेत शिकवणे.

गंभीर धोका असलेल्या भाषांसाठी –

  • गुरु-शिष्य पद्धत: इच्छुक विद्यार्थी भाषा जाणणाऱ्या ज्येष्ठाकडून, प्राथमिकतः संभाषणातून भाषा शिकतो, तेही स्वयंपाक, माळीकाम इ. वास्तविक जीवनातील घटनांमध्ये सहभागी होऊन.
  • टेलिफोन पद्धत: श्राव्यपरिषदेच्या (audioconference)  माध्यमातून संभाषक व विद्यार्थी नियमित भेटून भाषा ग्रहण करतात.

लुप्त भाषांसाठी – ह्यासाठी प्राथमिक नोंदी, व्याकरण व शब्दकोश, असणे आवश्यक असते.

  • रेडिओ पद्धत : रेडिओवरून (आता, पर्यायी आंतरजालकावरून) भाषेचे धडे देणे. उदा. १९८७ मध्ये जपानमध्ये रेडिओवरून आईनु शिकवणी सुरू केली गेली
  • भाषा पुनरुत्थान (reclamation) पद्धत: उपलब्ध साहित्य वापरून भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न. उदा. लिखित नोंदी व इतर ऑस्ट्रेलियन भाषांतील ध्वनी अभ्यासून कौरना (kaurna) भाषा परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले गेले.

भाषेच्या पुनरुज्जीवनात येणारे काही अडथळे म्हणजे भाषेचे काठीण्य, संभाषक संख्या, पोटभाषा, भाषिक तपशीलाचे दस्तऐवजीकरण नसणे, इ.

संदर्भ :

  • Lenore A. Grenoble, Lindsay J. Whaley, Saving Languages : An Introduction to Language Revitalization, Cambridge,2005.
  • Tsunoda,Tasaku, Language Endangerment and Language Revitalization : An Introduction, De Gruyter Mouton, 2006.