लोपप्राय भाषा  : ज्या भाषांना नजीकच्या भविष्यात लुप्त होण्याचा धोका असतो त्या लोपप्राय भाषा होत.भाषाशास्त्रज्ञ मायकल क्रॉस ह्यांच्या मते ज्या भाषा मातृभाषारूपात आत्मसात करणारा समाज ह्या शतकाच्या अखेरपर्यंत अस्तित्वात असेल अशी शक्यता ठामपणे वर्तवता येते, त्या भाषांना सुरक्षित समजावे. लाखो संभाषक असलेल्या भाषा किंवा सरकारी समर्थन असलेल्या भाषा ह्या प्रकारात मोडतात. २००७ च्या नोंदीनुसार जगातील ६००० पैकी ३०० (५%) भाषांना सुरक्षित म्हणता येईल. उदा. हिंदी, मराठी, इ. ज्यांचे संभाषक शिल्लक नाहीत अशा भाषा लुप्त भाषा होत. ह्या दोन टोकांच्या मधल्या सर्व भाषांची गणना लोपप्राय गटात होते. लोपप्राय भाषांचे स्थिर, अस्थिर, निश्चित लोपप्राय, लोपाचा तीव्र धोका असलेल्या व लोपाचा गंभीर धोका असलेल्या असे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी प्रामुख्याने भाषांचे अनुवांशिक संप्रेषण हा निकष वापरला आहे. क्रॉस यांनी लोपप्राय भाषांसाठी बनवलेल्या तपशीलवार तक्त्याचे भाषांतरित स्वरूप पुढीलप्रमाणे आहे

सुरक्षित लाखो संभाषक आहेत किंवा सरकारी समर्थन आहे.
स्थिर सर्व पिढ्यांद्वारे बोलली जाते.
अस्थिर केवळ काही लहान मुले व आधीच्या पिढ्या बोलतात.
निश्चितरीत्या लोपप्राय केवळ पालक व आधीच्या पिढ्या बोलतात.
लोपाचा तीव्र धोका असणारी केवळ आजीआजोबांची पिढी व आधीच्या पिढ्या बोलतात.
लोपाचा गंभीर धोका अगदी तुरळक संभाषक, आजी आजोबांच्या आधीच्या पिढीतील
लुप्त संभाषक नाही

भाषांना असलेल्या धोक्याचा अंदाज घेण्यासाठी अनुवांशिक भाषाप्रेषणासोबत संभाषक संख्या, भाषेच्या वापराची क्षेत्रे, भाषाशिक्षणासाठी उपलब्ध साहित्य, भाषेप्रत असलेली सरकारी धोरणे व भाषा बोलणाऱ्या समाजाचा भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन असे काही इतर निकष सुद्धा वापरले जातात.

ढोबळमानाने भाषांचे अस्तित्व धोक्यात येण्याची कारणे चार प्रकारची आहेत. नैसर्गिक आपत्ती, युद्ध व ज्ञातीहत्या, दडपशाही व सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक वर्चस्व. उदा. ब्रिटिशांनी १८५८ साली अंदमान बेटांवर वसाहत स्थापन केली. त्यांच्यासोबत बाहेरून आलेल्या विविध रोगांना तोंड देत देत तेथील मूळ रहिवाशांची संख्या १८६०- १९००च्या काळात ७००० वरून १००० वर घसरली (त्रिपाठी २०१८). अब्बी (२००७) नोंद करतात, की ३०० वर्षांपूर्वी अंदमान बेटांवर विस्तृतपणे पसरलेल्या दहा ग्रेट अंदामानिझ जमातींमधील आता केवळ ५० लोक शिल्लक असून त्यापैकी केवळ सात जणांना मूळ भाषा बोलता येते. इतर सर्वांनी हिंदी भाषा स्वीकारली आहे. इतर उदाहरणे द्यायची झाल्यास झारखंडमधील रांचीमध्ये बोलली जाणारी केरा मुन्डारी (KeraɁMundari) ही भाषा वाढते शहरीकरण व कमी सामाजिक प्रतिष्ठेमुळे लोपप्राय झाली आहे. दक्षिणपूर्व भारतात आर्थिक संधी व शिक्षणासाठी गोंडी भाषेचे संभाषक तेलुगुकडे वळत आहेत.

एखाद्या भाषेच्या सर्व संभाषकांचा मृत्यू झाल्याने किंवा कालानुक्रमे संभाषकांनी इतर भाषा अंगीकारल्याने भाषा बोलली जाणे बंद होते व तिचा लोप होतो. हा लोप आकस्मिक किंवा कालांतराने होऊ शकतो. अकस्मात होणारा लोप भूकंप, रोगराई, सुनामीसारख्या आपत्तींमुळे होऊ शकतो. राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक दबावामुळे भाषा विस्थापन होऊनही भाषा लुप्त होतात. उत्तर हिमालयातील झांग-झुंग (zhangzhung) भाषेची जागा तिबेटीयन भाषेने घेतल्याने ती लुप्त झाली. २०व्या शतकाच्या सुरुवातीला नोंदवली गेलेली रांगकास (rangkas) भाषा आता लुप्त झाली आहे. ईशान्येकडील अहोम (ahom), अँड्रो (andro) व  सेन्गमाई (sengmai) भाषांचीही हीच स्थिती आहे. समाजभाषाविज्ञानाच्या दृष्टीकोनातून प्राचीन ग्रीक व लॅटिनसारख्या भाषांना मृत म्हणता येणार नाही कारण त्यांचे अनुवांशिक संप्रेषण होऊन तयार झालेल्या अर्वाचीन ग्रीक, फ्रेंच, इटालियन, इ. भाषा अजूनही बोलल्या जातात. पुढील संकेतस्थळावर जगभरातील लोपप्राय व लुप्त भाषांची नकाशावर नोंद केलेली सापडते (http://www.unesco.org/languages-atlas/index.php). भारतातील बहुतांशी लोपप्राय भाषा पश्चिम-ईशान्य भागात व उत्तरेकडील डोंगराळ भागात आहेत असे दिसून येते.

संदर्भ :

keywords: #language domains, #language maintenance, #language shift, revitalization, #Sociolinguistics