रुस्का, अर्न्स्ट ऑगस्ट फ्राइडरिच : (२५ डिसेंबर, १९०६ – २७ मे, १९८८)अर्न्स्ट ऑगस्ट फ्राइड्ररिच रुस्का यांचा जन्म जर्मनीतील हाईडलबर्ग (Heidelberg) येथे झाला. रुस्का यांनी म्यूनिक आणि बर्लिन येथील तांत्रिक महाविद्यालयात प्रवेश घेतला प्रथम त्यांनी एअरोनॉटिक्स (Aeronautics) आणि इलेक्ट्रीकल इंजिनीरिंगचा अभ्यास केला. बर्लिन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीकडून रुस्का यांना ‘इलेक्ट्रॉन ऑप्टीक व दि टेक्नोलॉजी ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप’ या विषयात डॉक्टरेट पदवी मिळाली. १९४४ साली रुस्का यांनी जर्मनीमधील कंपनीमध्ये काम केले. त्यांना जर्मन विद्यापीठाकडून हेबिलीटेशन ही पदवी देण्यात आली. १९५७ -१९८८ या काळात रुस्का यांनी जर्मन विद्यापीठ तसेच फ्रित्झ हार्बर इन्स्टिटयूट आणि वेस्ट बर्लिन अशा विविध संस्थांमध्ये संशोधन केले. भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, सूक्ष्मदर्शकशास्त्र आणि वैद्यकशास्त्र यातील योगदानासाठी ते गौरविले गेले. रुस्का हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचे जनक मानले जातात. त्यांनी दोन मॅग्नेटीक कॉईलचा वापर करून इलेक्ट्रॉन बीम लाईट केंद्रित करून त्याचे वर्धन (Magnification) केले. १९३१चा रुस्का यांनी शोधलेला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा १७००० पटीने चित्राचे वर्धन करू शकत होता. १९३८ मध्ये रुस्का यांनी त्यात सुधारणा करून शोधलेला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा ३०००० पटीने चित्राचे वर्धन करू शकत होता. या त्यांच्या शोधामुळे सूक्ष्मजीवशास्त्रातील विषाणूचे अफाट विश्व उघडे झाले. त्यामुळे जीवाणू आणि विषाणूच्या अंतरंगात डोकावता आले. नोबेल पारितोषिक जरी भौतिकशास्त्रातील असले तरी सूक्ष्मजीवशास्त्राच्या विकासात इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यंत्राने क्रांती केली. रुस्का यांच्या नावावर १०० शोधनिबंध आहेत आणि अनेक पुस्तकांमध्ये त्यांचे योगदान आहे. १९५९ मध्ये त्यांनी बर्लिन येथील टेक्नीकल युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रॉन ऑप्टीक अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप या विषयासाठी प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. १९३९च्या सुरुवातीला जर्मन आणि परदेशी संस्थेकडून त्यांना अनेक बक्षीसें मिळाली आणि १९८६ साली त्यांना भौतिकशास्त्रमध्ये नोबेल पुरस्कर देऊन गौरविण्यात आले.
रुस्का यांचा मृत्यु जर्मनीतील पश्चिम बर्लिन येथे झाला.
संदर्भ :
- http://www.leo-em.co.uk/ernst-ruska-the-inventor-of-electron-microscope.html
- https://www.nobelprize.org/prizes/physics/1986/ruska/biographical/
- https://www.optics4kids.org/careers/nobel-laureates/ernst-ruska
समीक्षक : रंजन गर्गे