हो भाषा : मध्य भारतातील एक प्रमुख बोलीभाषा. ती ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहातील असून भारतात आढळणाऱ्या या भाषासमूहात जवळ जवळ साठ भाषा बोलल्या जातात. या भाषा मध्य व पूर्व भारताच्या डोंगराळ भागात व भारताबाहेरही पसरलेल्या आहेत. हो भाषा ही बिहार हो व लंका कोल या नावांनीही परिचित आहे. या भारतीय भाषांचे कोल किंवा मुंडा, खासी व निकोबारी असे तीन प्रमुख गट आहेत. ‘हो’ भाषा ही मुंडा या अनार्य भाषासमूहातील  विशेषतः कोलॅरियन भाषासमूह गटातील आहे. हो भाषिक मुख्यत्वे झारखंड, बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांत आढळतात आणि तेही प्रामुख्याने सिंगभूम (कोल्हान प्रदेश), सराईकेला, धारभूम, मयूरभंज, केओंझार या जिल्ह्यांतून आढळतात. सु. १,५०,००० लोक हो भाषा बोलतात (२००१). झारखंडातील संथाळ, ओराओं व मुंडा या तीन अनुसूचित जमातींच्या खालोखाल हो ही अनुसूचित जमात आहे. हो भाषेचे मुंडा गटातीलच मुंडारी व संथाळी या भाषांशी विशेष साम्य आढळते. या तीनही भाषा खेरवारीयन (Kherwarian) भाषा गटातील आहेत. तसेच चाईबासा-ठाकुरमुंडा (Chaibasa-Thakurmunda), लोहरा (Lohara) या होच्या बोली आहेत.

हो भाषा ज्या ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहातील आहे, तो ऑस्ट्रिक भाषक द्रविड भाषकांच्याही पूर्वी उत्तर भारतभर पसरलेला असावा. इ. स. पू. १५०० च्या सुमारास भारतात आलेल्या आर्य भाषकांच्या आक्रमणापुढे त्यांना माघार घ्यावी लागली. नंतरच्या काळात बहुसंख्य ऑस्ट्रिक भाषिकांनी आर्यभाषा स्वीकारल्या तर अनेकांनी रानावनाचा व डोंगराळ प्रदेशाचा आश्रय घेतला. या ऑस्ट्रिक भाषांच्या साहचर्याचा परिणाम आर्यभाषांवर व आर्यसंस्कृतीवर झालेला असावा. उदा., मयूर, नारिकेल, हरिद्रा, ताम्बूल, अलाबू हे शब्द मुळात ऑस्ट्रिक असावेत असे मानले जाते. चांद्रमासानुसार तिथीवरून दिवस मोजण्याची हिंदूंची पद्धती किंवा पुनर्जन्माची कल्पना यांचा उगम ऑस्ट्रिक जीवनपद्धतीशी असावा, असे दिसते. शब्दसंग्रहाप्रमाणेच आर्यभाषांची ध्वनिपद्धती, रूपपद्धती, वाक्यरचना, वाक्प्रयोग यांच्यावरही ऑस्ट्रिक भाषांचा प्रभाव पडलेला असावा. संस्कृतच्या ध्वनिपद्धतीशी ऑस्ट्रिक भाषेचे साम्य आहे. हो भाषकांपैकी फार थोड्या लोकांना स्वतःची भाषा लिहिता-वाचता येते. मात्र पुष्कळशा ‘हो’ लोकांना हिंदी, इंग्रजी, ओडिया या भाषा अवगत असतात. हो भाषा लिपीच्या संदर्भात देवनागरी, ओडिया व लॅटिन अशा तिन्ही लिप्यांचा वापर करते मात्र लॅको बोद्रा या भाषातज्ज्ञाने १९५० मध्ये शोधलेल्या ‘वारंग क्षिती’ लिपीचा वापर करण्याकडे ‘हो’ मधील बुद्धिवादी वर्गाचा कल आहे, असे अनुमान काढले. त्याद्वारे ‘हो’ भाषेमध्ये ध्वनी व अर्थ यांची सांगड कशी घातलेली आहे, हे लक्षात येईल. वारंग क्षिती लिपीमध्ये प्रथमारंभी ॐ हे पवित्र अक्षर दिलेले असते. मात्र त्याचा समावेश वारंग क्षितीच्या ३१ अक्षरांत केला जात नाही. रोमन लिपीतील इंग्रजी भाषेप्रमाणेच या लिपीतही मोठे अक्षर (कॅपिटल) व लहान अक्षर (स्मॉल) अशा दोन प्रकारांत ३१ चिन्हे – अक्षरे – असतात. त्यांमध्ये स्वर व व्यंजने यांचा समावेश आहे. वारंग क्षिती या लिपीचा वापर ‘हो’ भाषेपुरता मर्यादित आहे. इतर कोणतीही भाषा या लिपीचा वापर करीत नाही.

संदर्भ :

  • Burrows, Lionee, Ho Grammer and Vocabulary, New York, 1980.
  • Daniels, P. T. Bright, William, The World’s Writing System, Oxford, 1996.
  • Dryer, Matheco Hospelmath, Martin, Ho Language of India, London, 2011.
  • Grierson, G. A. Grammer of Ho Language, London, 1967.