ग्रामोपाध्ये, गं. ब. : (११ डिसेंबर १९०९ –  १८ ऑक्टोबर २००२ ). मराठीचे नामवंत प्राध्यापक, अभिरुचिसंपन्न आणि आस्वादक अंगाने साहित्यकृतीचे मर्म उलगडून दाखविणारे सहृदय समीक्षक. प्राचीन आणि आधुनिक वाङ्मयाचे ते व्यासंगी अभ्यासक होते. तसेच ते भाषाशास्त्राचेही अभ्यासक होते. संतवाङ्मय, बखरवाङ्मय आणि आख्यानकाव्य हेही त्यांच्या व्यासंगाचे विषय होते. या विषयांची त्यांनी नव्याने मांडणी केली. नवकाव्याविषयी त्यांना विशेष आस्था होती. ग्रामोपाध्ये यांचे मूळ गाव अक्कलकोट होते. त्यांचे संपूर्ण नाव गंगाधर बळवंत ग्रामोपाध्ये होय. पुण्यातील नामांकित अशा नूतन मराठी विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांनी इंटरपर्यंतचे शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालयात घेतले. वाडिया महाविद्यालयातून त्‍यांनी बी. ए. केले. एम. ए. ला मराठी विषयाच्या जोडीला ऐच्छिक विषय म्हणून त्यांनी इंग्रजी घेतले. तीन तपे डॉ. ग्रामोपाध्ये यांनी मराठीचे अध्यापन केले. १९४३ ते १९५० या कालावधीत त्‍यांनी बेळगावच्या लिंगराज कॉलेजमध्ये अध्यापनास केले. त्यानंतर १९५१ साली ते मुंबईला खालसा कॉलेज, विल्सन कॉलेजमध्ये, पुढे मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर केंद्रात मराठीचे अध्यापन केले. विभागप्रमुख झाले. आठ वर्षे तेथे अध्यापन करून ते सेवानिवृत्त झाले. पण त्यानंतरही त्यांनी त्यांचे लेखनव्रत निरंतर चालू ठेवले.  समीक्षक या नात्याने  ग्रामोपाध्ये यांनी परंपरा आणि आधुनिकता या मूल्यांविषयी सारखीच आस्था बाळगली. नववाङ्मयीन प्रवाहांविषयी त्यांचा दृष्टिकोन नेहमीच स्वागतशील राहिला.

मराठीतील साक्षेपी समीक्षक आणि भाषाशास्त्रज्ञ अशी ग्रामोपाध्ये यांची ख्याती आहे. भावे हायस्कूलमध्ये अध्यापनाचे कार्य करीत असतानाच त्यांनी ‘ पेशवे दप्तरांतील मराठी भाषा ’ हा पीएच. डी. चा प्रबंध प्रसिद्ध केला. तरुण वयातच त्यांचा निळावंती हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. यातील कवितांचे वळण नवकाव्याचे आहे. संतकाव्य समालोचन (१९३९), पेशवे दप्तरांतील मराठी भाषेचे स्वरूप (१९४१), वाङ्मयीन मूल्ये आणि जीवनमूल्ये (१९५०), बखर गद्य (संपादन, १९५२), भाषाविचार आणि मराठी भाषा, वाङ्मयविचार (१९६८) आणि आख्यानकविता: एक अभ्यास ही ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेतून त्यांनी वेळोवेळी वार्षिक समालोचन केले आहे.

 वाङ्मयीन मूल्ये आणि जीवनमूल्ये या समीक्षाग्रंथात ग्रामोपाध्ये यांनी प्रचलित वाङ्मयीन प्रश्नांविषयी मूलगामी चिंतन केले आहे. उदा. ‘आज महाकाव्याची निर्मिती का होत नाही? ‘वाङ्मयविचार’ या ग्रंथातील लेखांत वैविध्य आढळते. ‘भावकविता आणि गीत’, ‘सुगंध’ आणि ‘वीणा’, ‘हरिभाऊंची विदग्ध वाङ्मयाची व्याख्या’, ‘नवे काव्य आणि जुना घोळ’, ‘वाङ्मयेतिहासलेखन: काही समस्या’, ‘लेखक-वाचक संबंध’ आणि ‘साहित्यकृती: चांगली आणि श्रेष्ठ, एक विचार’ या लेखांत तात्त्विक विवेचन केले. ‘महानुभावीय मराठी गद्याचा विकास’ या लेखात दृष्टांतकथांतील वर्णनशैली, संवादांचा खटकेबाजपणा आणि नाट्यमयता असल्यामुळे मराठी कथेचा हा मूलस्त्रोत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले आहे. ‘भारतीय वाङ्मयाचा तौलनिक अभ्यास’ या लेखात बदलत्या राजकीय व सामाजिक परिप्रेक्ष्यात भाषाभाषांच्या आदान-प्रदान प्रक्रियेने भारतीय साहित्यात एकात्म भाव कसा टिकविला याविषयीचे मूलगामी चिंतन आढळते.

मराठी आख्यानकविता: एक अभ्यास या ग्रंथात मराठी आख्यान कवितेतील गुणविशेषांचे डॉ. ग्रामोपाध्ये यांनी मार्मिक विश्लेषण केले आहे. तसेच ‘चंपूकाव्य’ या काव्यप्रकारची वैशिष्ट्ये त्यांनी विशद केली आहेत. पेशवे दप्तरांतील मराठी भाषेचे स्वरूप हा ग्रंथ म्हणजे त्यांचा पीएच. डी. चा प्रबंध होय. पेशवेकालीन मराठीची भाषाशास्त्र आणि व्याकरण या दृष्टीने केलेली ही पाहणी होय. भाषाविचार आणि मराठी भाषा हा  ग्रामोपाध्ये यांचा भाषाशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचा ग्रंथ होय. भाषाशास्त्राकडून भाषाविज्ञानापर्यंत आज वाटचाल झाली आहे. त्याच्या पाऊलखुणा या पुस्तकात आढळतात. ‘महाराष्ट्राचे भाषिकदृष्ट्या आर्यीकरण’, ‘भाषेचे अवस्थांतर, नामांतर आणि मराठी भाषा’ आणि ‘आंतर बहिर वर्तुळ सिद्धांत आणि मराठी भाषा’ या प्रदीर्घ लेखांतून त्यांनी भाषाशास्त्रीय मूलतत्त्वांची शास्त्रपूत चिकित्सा केली आहे.

पणजीच्या पदव्युत्तर केंद्रात कार्यरत असताना ग्रामोपाध्ये यांनी मराठीच्या अध्यापनप्रक्रियेत समकालीनतेचे भान यावे आणि अद्ययावतपणा यावा म्हणून वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात पुढाकार घेतला. गोवा मुक्तीनंतरच्या कालखंडात साहित्याची अध्यापनप्रक्रिया आणि वाङ्मयीन अभिरुची रुजविण्यात ग्रामोपाध्ये यांचे श्रेय मोठे आहे. वार्धक्यातही त्यांनी गोमंतक दैनिकात ‘साहित्य सहवास’मधून नव्या मराठी पुस्तकांची परीक्षणे लिहिली. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

संदर्भ : गणोरकर, प्रभा, टाकळकर उषा आणि सहकारी, संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (१९२०-२००३), मुंबई, २००४.