थेलर, मॅक्स : ( ३० जानेवारी १८९९ – ११ ऑगस्ट १९७२ ) थेलर यांचा जन्म साउथ अमेरीकन प्रिटोरीयामध्ये झाला. त्यांचे वडील आर्नोल्ड थेलरहे पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. थेलर यांचे शालेय शिक्षण प्रिंटोरीया मुलांच्या शाळेत झाले. १९१८ मध्ये ते  केपटाउन विद्यापीठातून पदवीधर झाले. पदव्युत्तर शिक्षणासाठी ते लंडनला गेले व सेंट थोमस  मेडीकल स्कूल किंग्स कॉलेज लंडन येथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९२२ मध्ये लंडन स्कूल ऑफ हायजिन येथे उष्णकटीबंधातील औषधे व आरोग्यशास्त्र यामध्ये डिप्लोमा केला. त्याच वर्षी ते पुढील संशोधनासाठी युनायटेड स्टेटमधील हार्वड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ ट्रॉपीकल मेडीसीन केंब्रिज, मॅसॅच्युसेटस येथे गेले. १९३० मध्ये न्यूयॉर्कमधील रॉकफेलर संस्थेच्या व्हायरस प्रयोग शाळेचे नियामक बनले. रॉयल कॉलेज ऑफ लंडन आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन यामध्ये त्यांना सदस्य पदासाठी प्रमाणपत्र देण्यात आले.

त्यांनी १९२२ साली अमेरिकेतील हार्वड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडीसीन इन केंब्रिज येथे काही वर्षे अमिबिक डिसेंट्रीच्या संशोधनात घालवले आणि उंदीर चावल्यावर येणाऱ्या तापावर प्रतिबंधक लस विकसित करण्याचा प्रयत्न केला. ॲड्रयु सेलार्ड यांचा सहायक बनल्यानंतर त्यांनी यलो फिवरवर काम करण्यास सुरूवात केली. १९२६ मध्ये त्यांनी मांडलेल्या गृहितानुसार यलो फिवर हा रोग लेप्टोस्पायरा इक्टेराइडस  या (Leptospira icteroides ) या बॅक्टेरियामुळे होतो. परंतु १९२८ मध्ये असे आढळून आले की हा रोग व्हायरसमुळे होतो. १९३० मध्ये थेलर हे न्यूयॉर्कमधील रॉकफेलर संस्थेमधील व्हायरस प्रयोगशाळेचे नियामक होते. १९३७ मध्ये मॅक्स थेलर यांनी हे शोधून काढले की उंदराला होणारा लकवा हा या व्हायरसमुळे होतो. आज त्या व्हायरसलाथेलरस मूरीन इंसिफालोमयलीटीस  व्हायरस (Theiler’s Murine Encephalomyelitis Virus) असे म्हणतात.

मॅक्स थेलर यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. १९४८ मध्ये व्हायरल अँड रिकेटशियल इन्फेक्शन  ऑफ मेन आणि यलो फिवर. दि अमेरिकन जर्नल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन  तसेच ‘ॲनल्स ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन’ आणि ‘पॅरासायटोलॉजी’मध्ये त्यांचे  शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

ते १९६४ –१९६७  या काळात येल विद्यापीठात रोगपरिस्थिती विज्ञान व मानवीय आरोग्य याचे प्राध्यापक होते.

त्यांना विविध सन्मानांनी विभूषित करण्यात आले. १९३९ मध्ये रॉयल सोसायटी ऑफ ट्रॉपीकल मेडिसीन ॲण्ड हायजिन चालमर्स मेडल. १९४५ सालचा हार्वड युनिव्हर्सिटी फ्लाटरी मेडल, १९४९ सालचा अमेरीकन पब्लिक हेल्थ ॲसोसिएशनचा लास्कर अवार्ड आणि १९५१ साली त्यांना फिजिओलॉजी आणि मेडिसीनचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मॅक्स थेलर यांचा मृत्यु न्यू हवेन, कनेक्टिकट, यु.एस.ए. येथे झाला.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे