टाटा, जमशेट नसरवानजी : (३ मार्च १८३९ – १९ मे १९०४ ) वयाच्या चौदाव्या वर्षी शिक्षणासाठी जमशेट नुसरवानजी टाटा मुंबईत आले. एल्फिस्टन महाविद्यालयात शिकत असताना त्यांना साहित्याची, वाचनाची, अभ्यासाची आणि व्यासंगाची गोडी लागली. मुळच्या कुशाग्र बुद्धिमत्तेला दिशा मिळाली आणि नवनिर्माणाचा ध्यास त्यांच्या मनामधे रुजला. पदवी घेताना त्यांनी डिकन्स, थॅकरे, मार्क ट्वेन आदी लेखक झपाटून वाचले. ग्रंथातून ज्ञान मिळवावे आणि प्रगतीसाठी त्याचा उपयोग करावा हा संस्कार त्यांना त्यातून मिळाला.
वडलांची मुंबईत पेढी होती. जमशेटजींनी लहान सहान कंत्राटे घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. यूरोप आणि अतीपूर्वेकडील देशांना माल पुरवून त्यांनी भरपूर पैसा आणि अनुभव मिळवला.
मॅंचेस्टरला भेट दिल्यावर त्यांना कापडनिर्मितीत रस उत्पन्न झाला पण त्यासाठी पैसा हवा होता. ॲबिसिनियाच्या युध्दात जनरल नेपियरला सामान पुरवायचे कंत्राट घेऊन त्यांनी पैसे उभे केले. मुंबईतील एकजुनी तेलगिरणी स्वस्तात विकत घेऊन ती आपल्या कौशल्याने त्यांनी कापडगिरणीत परावर्तित केली आणि दोन वर्षांनी फायद्यात विकून टाकली. नुकत्याच सुरू झालेल्या रेल्वे सेवेचा फायदा घेऊन त्यांनी नागपूरला स्वस्तात पाणथळ जागा घेतली आणि सेंट्रल इंडिया स्पिनिंग मिल काढली, तेव्हा त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला, पण त्यांनी हे साहस यशस्वी केले.
जेव्हा १८८५ साली मुंबईला नॅशनल कॉंग्रेसची स्थापना झाली तेव्हा जमशेटजी टाटा उपस्थित होते. राष्ट्रभक्तीबरोबर त्यांचे मानव प्रेमही पुढे अनेक प्रसंगात दिसून आले. त्यांचे देश प्रेम हृदयापेक्षा बुद्धीनिष्ठ होते. तरुण वयात त्यांनी चीन, जपान, मध्यपूर्वेतील देश, यूरोप येथे भेटी दिल्या आणि उत्तरायुष्यात अमेरिकाही पाहिली. त्यांची दूरदृष्टी परिपक्व होत गेली. कोणत्याही देशाची संपन्नता तीन घटकांवर अवलंबून असते ते त्यांनी जाणले.
स्टील अथवा पोलाद म्हणजे प्रक्रिया केलेले लोखंड. ही यंत्रयुगाची पहिली गरज, त्यापासून यंत्रे बनली की ती चालवण्यासाठी पाण्यावर जनित्रे चालवून बनवलेली स्वस्त वीज, ही दुसरी आणि ही यंत्रे चालवून उत्पादन करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हवे, नवे उद्योग उभे करुन संपन्नता आणण्यासाठी संशोधन हवे ही तिसरी गरज आहे हे जमशेटजींनी जाणले. त्यावेळच्या कृषिप्रधान संस्कृतीवर आधारित अर्थकारण असताना त्यांची ही समज अजोडच म्हणावी लागेल. त्यांनी फक्त स्वप्ने पाहिली नाहीत तर त्यासाठी कृतियोजना आखून त्या अंमलातही आणल्या. या तीनही क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी पहिली पावले टाकली. त्यांच्या परदेश प्रवासाचा हाच प्रमुख हेतू होता. नायगारा धबधबा पहाताना तेथे वीजनिर्मिती कशी करतात हे त्यांनी प्राधान्याने पाहिले. फ्रान्स आणि जपानच्या भेटीत तिथे रेशीम उत्पादन कसे होते ते त्यांनी बारकाईने पाहिले. पूर्वी म्हैसूरला उत्तम रेशीम पैदा होत असे आणि कालौघात ते मृतप्राय झाले होते. त्याला जमशेटजींनी नवसंजिवनी दिली. सिंध प्रांतात लांब धाग्याचा कापूस पैदास करायची त्यांची कल्पना अशीच यशस्वी झाली. कोणत्याही नव्या उद्योगाची पूर्वतयारी अभ्यास, वाचन, प्रत्यक्ष पाहून करायची त्यांची पध्दत होती. जिथे अनुकूल परिस्थिती असेल तिथे तो उद्योग उभा राही आणि यशस्वी होई.
इंग्लंडहून जुनी यंत्रसामग्री आणून ती दुरुस्त करायची आणि इथे उद्योग उभारायचे त्यांचे स्वस्तातले प्रयोग फसले. उत्पादनाचा दर्जा घसरला. प्रथमजरी स्वस्त पडले तरी कालांतराने त्याची दुरुस्ती-देखभाल यात बराच खर्च होत असे. अशा एका साहसात त्यांना अपयश आले आणि त्यांच्या शेअरचे भाव गडगडले तर आपली सारी वैयक्तिक संपत्तीपणाला लावून त्यांनी कर्जे उभी केली आणि आठ वर्षात उत्पादन निर्यात करण्याइतके यश मिळवले. उत्कृष्टतेचा ध्यास त्यांच्या सर्व उद्योगात दिसून येई.
रोज दोन तासतरीवाचन व्हायला हवे असा दंडक त्यांनी घालून घेतला होता. घोड्याच्या बग्गीतून आणि नंतर मोटारीतुन आपल्या वरीष्ठ सहकाऱ्यांसोबत मुंबईत फेरफटका घ्यायचा त्यांचा क्रम कधीही चुकला नाही. त्यावेळी नव्या उद्योगांची चाचपणी केली जाई. ते इतरांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत आणि नंतर निर्णय घेत. आज व्यवस्थापनशास्त्रात जे ’ब्रेनस्टॉर्मिंग’ म्हणतात ते त्याकाळात ते असे आचरणात आणत. अनेक बाबतीत ते काळाच्या पुढे होते.
जमशेटजींना अनेक विषयात रस होता. त्यांचे वनस्पतीशात्राचे ज्ञान पाहून कोलकात्याच्या बोटॅनिकल उद्यानाच्या अधिकाऱ्याने चकित झाल्याची नोंद केली आहे. आपल्या जन्मगावी नवसारी येथे त्यांनी प्राणीसंग्रहालय उभे केले, अनेकानेक दुर्मिळ झाडे त्यांनी तिथे लावलेली होती.
भारतात मुलटी येथे फक्त कच्चे लोखंड तयार होई. इथे उत्तम प्रतीचे पोलाद तयार व्हावे म्हणून त्यांनी पंधरा-वीस वर्षे अनेक मार्गांनी प्रयोग आरंभलेले होते. परदेशाहून तज्ञ मागवून काम केले होते. देशाच्या भूगोलाचा अभ्यास करुन सुवर्णरेखा नदीकाठी साकची येथील जागा निश्चित करुन टाटा स्टीलचे उत्पादन करायची अतीभव्य योजना त्यांनी १९०२ साली लिहून ठेवलेली होती. तिथे वसवायच्या शहराचे रस्ते, बागा, मैदाने, घरे, यांचे पूर्ण नकाशे तयार होते. तेच आजचे जमशेटपूर. टाटांच्या फूटबॉल टीमचा वेष कोणत्या रंगांचा असावा इतके बारीक तपशील त्यात नोंदलेले होते.
१८९३ सालच्या जुलै महिन्यात जमशेटजी आणि स्वामी विवेकानंद यांनी जपानपासून शिकागोपर्यंत बोटीतून एकत्र प्रवास केला. जपानच्या औद्योगिक प्रगतीमुळे स्वामीजी प्रभावित झाले होते. भारताच्या या दोन थोर सुपुत्रांनी देशाच्या उन्नतीची चर्चा केली. विवेकानंदांच्या त्या भेटीत भारतात मूलभूत संशोधन व्हायला हवे या कल्पनेचे बीज जमशेटजींच्या मनात रुजले. आपल्या संपत्तीतील तीस लाख रुपये जमशेटजींनी बाजूला काढून ठेवले. त्यात म्हैसूरच्या राजाने भर घातली आणि बंगलोरजवळ त्यांना जागाही दिली. तिथे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स ही संस्था उभी राहिलेली पहायला जमशेटजी राहिले नाहीत. परंतु त्यांनी आपले पुत्र श्री. दोराबजीटाटा यांना त्याची कल्पना दिलेली होती. टाटा स्टील आणि ही संस्था, अशी वडलांची दोन स्वप्ने पुढे दोराबजींनी पूर्ण केली.
परदेशी लोकांना राखून ठेवलेल्या हॉटेलात काळ्यांना, एतद्देशीयांना प्रवेश देत नाहीत, हे शल्य त्यांना एका प्रसंगात इतके डाचले की त्यांनी जागतिक दर्जाचे हॉटेल मुंबईत उभे करायचा मनसुबा रचला आणि ताजमहाल हॉटेल मुंबईत उभे राहिले. त्या काळात मुंबई अनेक बेटात विभागलेली होती. या शहराचे उत्तम बंदर हे वैशिष्ट्य उद्योगाच्या भरभराटीसाठी योग्य आहे हे हेरुन त्यांनी अनेक जागा विकत घेतल्या आणि त्यावर इमारती उठवल्या. यूरोपिय स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट नमूने असलेल्या या इमारती आजही शहराचे हेरिटेज वैभव दर्शवीत दिमाखात उभ्या आहेत.
कोणतेही कायदे अस्तित्वात नसताना जमशेटजींनी आपल्या कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना आखून त्या कार्यवाहीत आणल्या. कामाचे तास कमी करणे, कपड्याच्या मिलमधे आर्द्रताशोषक यंत्रे बसवणे, उत्तम वेतनमान देणे, पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवण्यासाठी यंत्रे बसवणे, अपघातासाठी नुकसान भरपाई, घरासाठी कर्जे आदी अनेक कल्याणकारी योजना आखण्यात त्यांचा मानवतावादी दृष्टीकोन दिसून येतो.
आपल्या बहुविध उद्योगांचे जाळे व्यवस्थित चालावे म्हणून त्यांनी टाटा सन्सही शिखर संचालक संस्था आणि तिच्या मार्गदर्शनाखाली स्वायत्तपणे चालणाऱ्या घटकसंस्था असे सुनियोजित व्यवस्थापकीय रूप दिले. त्यामुळे त्यांचा उद्योगसमूह नवनव्या क्षेत्रात पाय रोवू शकला. उत्पादनाची विविधता, गुणवत्ता आणि व्यवस्थापनातील नैतिकता त्यांना पाळता आली. १८९५ सालच्या सुमारास त्यांनी टाटांच्या कंपन्यातील फायद्याचा काही भाग बाजूला काढून पहिल्या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. भारतातील बुद्धिमान विद्यार्थ्यांना त्यातून शिष्यवृत्त्या घेऊन परदेशी शिक्षण घेणे शक्य झाले. ही त्या उद्योगसमूहाची पुढे संस्कृती झाली. त्यात त्यांचे पुत्र दोराबजी आणि नंतरचे प्रमुख संचालक जे. आर. डी. टाटा यांनी अनेकपटीने भर घातली. टाटांच्या कंपन्यांच्या फायद्याचा काही भाग ट्र्स्टच्या माध्यमातून समाजाच्या कल्याणासाठी वापरला जातो.
समीक्षक : अ.पां. देशपांडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.