क्षीरसागर, निलिमा अरुण : ( ८ जून १९४९ ) नीलिमा अरुण क्षीरसागर यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वैद्यकीय शिक्षण एम.बी.बी.एस., एम.डी. आणि पीएच्.डी. हे सर्व जी. एस. मेडिकल महाविद्यालयातच झाले. त्यानंतर त्या जी. एस. मेडिकल महाविद्यालय व के.ई.एम. रुग्णालय येथे काम करू लागून तेथेच त्यांनी अधिष्ठाता (डीन) म्हणून आणि संचालक, वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन म्हणून काम केले असून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या वेळी, मुंबईत अतिवृष्टीमुळे झालेल्या जलप्रलयाच्यावेळी क्षीरसागर आणि त्यांच्या जी.एस. मेडीकल ॲण्ड केईएम रूग्णालयातील सहकाऱ्यांनी डिसास्टर मॅनेजमेंट प्लॅनचा (आपत्कालीन व्यवस्थापन योजना) अवलंब करुन अनेकांचे प्राण वाचविले आहेत.
निलिमा क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मुंबईतील आपत्तीच्या वेळचे कार्य सुद्धा तितकेच मोठे आहे. यासंबंधीचा वृत्तांत जग प्रसिद्ध लॅन्सेट मासिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. मुंबईतील लेप्टोस्पायरोसीस साथीच्या वेळची परिस्थिती प्रभावीपणे हाताळून त्यांच्या गटाने लेप्टोचा बीमोड केला. हे कार्य रिओ-दी-जानेरिओतील कार्याशी तुलनात्मक साधर्म्य दर्शविणारे असल्याचा वृत्तांत जर्नल ऑफ ग्रॅज्युएट मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झाला. त्या संसर्गजन्य रोग चिकित्सा केंद्राच्या संचालक आणि त्यानंतर महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरु झाल्या. पुढे राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत असलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिटयुटच्या त्या अधिष्ठाता झाल्या.
सध्या निलिमा क्षीरसागर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या नॅशनलचे अरक्लिनिकल फार्माकॉर्लोजी या पदावर काम करीत आहेत. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या आणि भारत सरकारच्या अनेक समित्यांवर कार्यरत आहेत. क्लिनिकल चाचण्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे काम त्यांनी अंगिकारले आहे. फार्माकॉ व्हिजिलन्स क्षेत्रातही त्या काम करीत आहेत. या व्यतिरिक्त काळा आजार, मलेरिया (हिवताप), क्षयरोग, नियंत्रण आणि निर्मुलनाचे कार्य करीत असतानाच निलिमा क्षीरसागर नवी औषधे विकसित करण्यासाठीही प्रयत्नशील आहेत.
क्लिनिकल फार्माकॉलॉजी म्हणजे मानवी शरिरावरील सर्वाधिक उपयुक्त आणि अनुकुल औषधांच्या वापरासंबंधीच्या अभ्यासाचे शास्त्र. क्षीरसागर यांनी अनेक औषधांचा त्यांच्या गुणधर्माचा सखोल अभ्यास करुन सुरक्षितता आणि कार्यक्षमतेचा विचार करुन काही नव्या पद्धती आणि वैद्यकिय उत्पादने विकसित केली. मॉर्फिन हे अफूपासून तयार केलेले वेदनाशामक औषध उपयुक्त आहे. परंतु त्यांच्या सतत वापरामुळे त्याचे व्यसन लागण्याचा धोका असतो. पाठीच्या कण्यामध्ये मॉर्फिनचे इंजेक्शन दिल्यामुळे रक्ताभिसरणात वाढ होते, रक्तप्रवाहाला वेग प्राप्त होतो. धूम्रपानामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये, विशेषत: पायांमध्ये होणाऱ्या वेदनांवर (पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज) ही पद्धती विशेष गुणकारी असल्याचे त्यांनी दाखवून दिले. तसेच जखमा भरुन येण्यासाठीही ते उपयुक्त ठरते हे त्यांनी भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरने विकसित केलेल्या इम्पेडन्स प्लेथिस्मोग्राफी या यंत्राचा वापर करुन सिद्ध केले. त्यांच्या या कार्याचे वृत्तांकन लॅन्सेट या नियतकालिकात प्रसिद्ध झाले.
क्षीरसागर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने औषध निरीक्षणासाठीचा बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आणि मिरगीच्या (फिटस) अनेक रुग्णांना ॲण्टिएपिलिक्टिक (मिरगीरोधक) औषधांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला. एवढेच नव्हे तर शरीरावर औषधांचे कोणतेही दुष्परिणाम न होता, मिरगीवर नियंत्रण शक्य झाले. बरे झालेले रुग्ण नोकरी–व्यवसाय करण्यास सक्षम झाले. विद्यार्थीसुद्धा अभ्यासात प्रगती दाखवू लागले. या सर्व रुग्णांना एकप्रकारे सामाजिक स्थैर्य लाभले. क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे हे कार्य क्लिनिकल फार्माकॉलॉजीविषयक ब्रिटीश नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. याव्यतिरिक्त फेनिटाईन (एप्टॉईन) या मिरगीरोधक औषधांचे शंखपुष्पी या आयुवैदिक औषधाशी गुणधर्मविषयक कमालीचे साधर्म्य असल्याचे नीलिमा क्षीरसागर यांना संशोधन करतांना आढळून आले. शंखपुष्पी हे आयुर्वेदिक औषध चार वनस्पतींचे मिश्रण आहे. या औषधात मिरगी नियंत्रणाचे गुणधर्म तर आहेतच, शिवाय फेनिटॉईनशी साधर्म्य असल्यामुळे त्याचे परिणाम कमी होण्यास तसेच रक्ताची पातळी संतुलित राखण्यासाठीही ते उपयुक्त असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या या कार्याचे वृत्तांकन जे ऑफ एथ्रोफार्मार्कोलॉजी आणि जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाले आहे.
रुग्णोपयोगी लिपोसॉमल ॲम्फोटेरिसीनवर क्षीरसागर यांनी अधिक संशोधन केले आणि त्याचा उपयोग सिस्टेमिक फंगल इन्फेक्शन (एसएफआय) च्या रुग्णांवर उपचार म्हणून केला. एसएफआयची लागण मुख्यत्वे एचआयव्ही-एड्सचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण आणि नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच जन्मलेल्या अर्भकांना होते. क्षीरसागर यांनी तयार केलेले औषध हे जीवरक्षक तर आहेच, याशिवाय त्यांचे दुष्परिणाम सुद्धा होत नाहीत. प्राणघातक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळा आजारावरही हे औषध गुणकारी आहे. याच कार्याबद्दल क्षीरसागर यांना प्रतिष्ठेचा वास्विक पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी विकसीत केलेल्या या औषधाला एकस्व प्राप्त झाले असून ते तंत्रज्ञान आता इतरत्र हस्तांतरित झाले आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या जीएमपी फॅसिलिटीमध्ये त्याची निर्मिती होऊन ते विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होत आहे. तसेच परदेशांत त्याची निर्यात सुद्धा होत आहे.
सन १९९० मध्ये मलेरियाने मुंबईला मोठ्या प्रमाणात ग्रासले होते. तेव्हा निलिमा क्षीरसागर आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी मलेरियावर वापरल्या जाणाऱ्या औषधांचा वापर केला. कोअर्टेमचा वापर पी. फॉल्सिपारमसाठी तर प्रिमाक्वीनचा वापर पी. व्हिवॅक्स मलेरियासाठीच्या १४ दिवसांच्या उपचार पद्धतीसाठी करुन त्याची कार्यक्षमता आणि सुरक्षितता दाखवून दिली. या अभ्यासामुळे राष्ट्रीय हिवताप केमोथेरपी कार्यक्रम तयार करण्यास मदत झाली. अमेरिकन जर्नल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन ॲण्ड हायजीन ॲण्ड ट्रन्झॅक्शन ऑफ रॉयल सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसीनमध्ये नीलिमा क्षीरसागर यांच्या कार्याचा वृत्तांत प्रसिद्ध झाला. ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांना डॉ. बी. सी. रॉय नॅशनल ॲवार्ड फॉर डेव्हलपमेंट ऑफ डिसिप्लीन ऑफ क्लिनिकल फार्माकॉलॉजी हा पुरस्कार मिळाला. त्यापाठोपाठ रॉयल कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल मेडिसीनची पाठ्यवृत्ती मिळाली. नंतर अमेरिकन कॉलेज ऑफ क्लिनिकल फार्माकॉलॉजीची पाठ्यवृत्ती सुद्धा प्राप्त झाली.
संदर्भ :
- dndi.org/ourpeople/scientific-advisory-committee/nilima-kshirsagar
- sacaccp.org/team/clinical-pharmacology-dr-nilima-kshirsagar
- com/web/nilima_arunkshirsagar/652511
समीक्षक : राजेंद्र आगरकर