डोनॉल्ड फोरशा जोन्स :   (१६ एप्रिल, १८९० ते १९ जून, १९६३) डोनाल्ड फोरशा जोन्स यांचा जन्म अमेरिकेतील हचिन्सन प्रांतातील कन्सास येथे झाला. विचिता गावाबाहेर घराशेजारील शेतीत बाग आणि पाळीव प्राणी होते. डोनाल्ड यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. डोनॉल्ड लहानपणी सकाळी वर्तमानपत्र वितरण करत. त्यांनतर शाळा आणि नंतर बागेतील झाडांचे संगोपन करत. हीच बागकामाची आणि झाडांची आवड पुढे आयुष्यभर ते जपत राहीले. ते एक उत्साही आणि हुशार माळी बनले. पुढे संशोधक म्हणून कार्य केल्यांनतर घरी आल्यानंतर ते बागकाम करत. या अनुभवावर बागकामासंदर्भात त्यांनी अनेक लेखही लिहिले. माध्यमिक शिक्षणानंतर कन्सास स्टेट ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटिमध्ये कृषीशास्त्रातील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. पदवी प्राप्त झाल्यानंतर अरिझोना प्रयोगशाळेत मेथीसारख्या दिसणाऱ्या अल्फाल्फा या जनावरांच्या घासाच्या संकरित वाणांच्या निर्मितीचे कार्य केले. त्यांना हे काम आवडत नसे. त्याचवेळी इस्ट आणि हेज यांच्या प्रकाशनातून वनस्पती संकराबाबत माहिती मिळाली. हॉवर्ड विद्यापीठात कार्य करणाऱ्या इस्ट यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याविषयी विनंती केली. हॉर्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी सिरॅकस विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर त्यांनी न्यू हॅवन येथे इस्ट यांच्या प्रयोगशाळेत काम सुरू केले. पुढील अनेक वर्ष ते न्यू हॅवन आणि केंब्रिज या दोन ठिकाणी आलटून पालटून काम करत राहिले.

अखेरीस ते कनेक्टीकट येथील कृषी संशोधन केंद्रात काम करत. पन्नास वर्षे त्यांनी विविध प्रयोगातील निष्कर्षावर शंभरपेक्षा जास्त दर्जेदार शोधनिबंध प्रकाशित केले. समाज प्रबोधन आणि जनजागृतीसाठीही अनेक लेख लिहिले. त्यांचे वाचन अफाट होते. विशेषत: चरित्रे आणि इतिहासविषयक वाचन ते करत. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना विज्ञान प्रसारासाठी लेखन करण्यास प्रोत्साहित केले. जेवणाच्या सुट्टीतील मोकळ्या वेळेतही ते वाचन करत. त्यातील संशोधनासाठी पूरक पुस्तकावर विद्यार्थ्यांशी चर्चा करत. डोनॉल्ड हे मध्यमार्गी, मृदू स्वभावाचे, सहनशील, न रागावणारे, हुशार व्यक्ती होते. इस्ट आणि डोनॉल्ड यांनी प्रजनन आणि संकरण (Inbreeding and Outbreeding) हे जनूकशास्त्राचा इतिहास सांगणारे पुस्तक लिहिले.

डोनॉल्ड यांनी मक्याच्या दुहेरी संकर प्रक्रियेवर संशोधन केले. साधारणपणे संकरित वाण तयार करण्यासाठी एकाच पिकाच्या दोन वाणांची निवड केली जाते. त्यांच्या परागकणांची अदलाबदल करून  संकरीत वाण बनवतात. ही पद्धती सर्वप्रथम मेंडेल यांनी सिद्ध केली. यामध्ये वापरले जाणारे वाण हे एकाच पिकाचे आणि एकाच प्रकारच्या पिकासाठी वापरले जात. याला एकक संकरण पद्धती (सिंगल क्रॉस हायब्रिड) असे म्हणतात. जॉर्ज शल यांनी ही पद्धती अनेक संकरीत वाण निर्मितीसाठी वापरली होती. यात पहिल्या पिढीच्या वाणांची रोपे चांगली वाढत नसत. तसेच उत्पादनातही मोठी वाढ होत नव्हती.

हॉर्वर्ड विद्यापीठातील इस्ट (Edward Murray East – October 4, 1879 – November 9, 1938) हेही या विषयावर संशोधन करत. त्यांनी पहिल्या टप्प्यावर चार वाणे निवडून केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष उत्साहवर्धक नसल्याने ते निराश झाले. तिकडे डोनॉल्ड यांचे याच विषयावर प्रयोगशाळा आणि घराशेजारील बाग असे दोन्ही ठिकाणी प्रयोग सुरु होते. त्यातील दोन वाणांचा पहिल्या टप्प्यात संकर घडवून संकरीत वाण तयार केले. प्रथम पिढीच्या संकरीत वाणांचा संकर घडवून पुन्हा नवीन संकरीत वाण मिळवला. ही पद्धती दुहेरी संकरण पद्धती (डबल क्रॉस हायब्रिड) म्हणून ओळखली जाते. याच तंत्राचा वापर करून डोनॉल्ड यांनी मक्याचे संकरीत वाण बनवले. या वाणांची वाढ झपाट्याने होत असे. त्यांच्यापासून मिळणारे उत्पादनही जास्त होते. त्या काळातील मक्याचे उच्चतम दर्जाचे आणि सर्वोच्च उत्पादन देणारे संकरीत वाण होते. यातून उच्च लायसीन असणारे मक्याचे वाण तयार झाले. यातून तयार झालेले ओपेक-२ वाण खूपच लोकप्रिय झाले. उच्च प्रथिन मात्रा असणारे हे मक्याचे वाण आजही लोकप्रिय आहे. १९६९ पर्यंत ही संकरीत वाण लागवड जवळपास शंभर टक्के झाली. त्यांच्या या यशानंतर जगभर या तंत्राचा वापर सुरू झाला.

शल यांनीही या प्रकारे प्रयोग केले होते. मात्र त्यांना त्यामध्ये नवीन किंवा परिणामकारक बदल जाणवले नसल्याने त्यांनी पुढे संशोधन केले नाही. डोनॉल्ड प्रयोगातील प्रत्येक टप्प्यावर जनुकिय बदल कसे होतात, याचा अभ्यास करत. संशोधन निबंधात प्रयोगाची संपूर्ण वैज्ञानिक माहिती देत. त्यामुळे या तंत्राच्या निर्मितीचे श्रेय शल यांच्याकडे न जाता डोनॉल्ड यांना देण्यात आले. त्यांनी मक्याच्या वाणांच्या अभ्यासातून थिअरी ऑफ हेटेरिओसिस मांडली  (Heterosis- संकरज ओज). हा सिद्धांत संकर प्रक्रियेसाठी मार्गदर्शक मानला जातो. त्यांनी मक्याच्या जनूक साठवणीची पद्धतीही विकसीत केली. यासाठीचे स्वामित्व हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अर्ज केला. याला अनेक बियाणांच्या कंपन्यांनी आक्षेप घेतला. मात्र ते फेटाळण्यात आले. तोपर्यंत अनेकांनी तंत्रज्ञान वापरले होते. या कंपन्यांना डोनाल्ड यांना स्वामित्त्व हक्क शुल्क प्रदान करावे लागले.

त्यांनी चाळीस वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन केले. बोटॅनिकल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेचे ते सचिव होते. जेनेटिक्स सोसायटीचे ते प्रथम सचिव आणि नंतर अध्यक्ष झाले. त्यांनी येल आणि कनेक्टीकट विद्यापीठात अध्यापन केले. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मिशिगन विद्यापीठ, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी या संस्थात ते पाहुणे व्याख्याते म्हणून जात. अमेरिकन ॲकेडमी ऑफ आर्टस अँड सायन्स आणि ॲकेडमी ऑफ सायन्स या संस्थांचे ते सन्माननीय सदस्य होते. इटलीतील सोसायटी ऑफ जेनेटीक आग्रारिया या संस्थेनेही त्यांना सदस्यत्व प्रदान केले. कॅन्सस विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा सन्मान करत मानद डॉक्टरेट पदवी त्यांना प्रदान केली. ते अखेरपर्यंत संशोधन, अध्यापन आणि समाजप्रबोधन या कार्यात मग्न राहीले.

त्यांचे हॅम्डेन येथील निवासस्थानी निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा