मांझी, रामचंद्र :  (१९२५). बिहारमधील भोजपुरी लौंडा नाच या लोककलेचे कलाकार. रामचंद्र मांझी यांचा जन्म ताजपूर येथे बिहारच्या सारण जिल्ह्या्त झाला. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी बिहारचे शेक्सपिअर म्हणून ओळखले जाणाऱ्या भिखारी ठाकूर यांच्या नाटक कंपनीत काम करायला सुरूवात केली. भिखारी ठाकूर यांच्या पश्चात रामचंद्र मांझी यांनी त्यांची परंपरा आजपर्यंत कायम ठेवली आहे. घागरा-चोळी, कानात झुमके, गळ्यात नेकलेस, माथ्यावर बिंदी आणि ओठांना लालभडक लिपस्टिक अशा पेहरावात ९६ वर्षांचे रामचंदर मांझी लौंडा म्हणून आजही स्टेजवर कार्यक्रम सादर करतात. ऐन उमेदच्या काळात भिखारी ठाकूर यांनी सुरय्या, मधुबाला, मिना कुमारी, वहीदा रेहमान, हेलन या अभिनेत्रींसोबत सिनेमात काम केले आहे.

नाच हा लोककलेचा प्रकार बिहारमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. नाच म्हणजे, केवळ नृत्य नव्हे, तर स्त्रियांसारखी वेशभूषा करून गाणं, नृत्य आणि पौराणिक कथांचे सादरीकरण अशा एकत्रित लोककलेच्या प्रकाराला नाच म्हटले जाते. लौंडा या शब्दाचा सरळसरळ अर्थ म्हणजे मुलगा. बिहार, उत्तरप्रदेशसारख्या राज्यात जी मुले बायकांप्रमाणे वेशभूषा करून नाच-गाणी करतात, त्यांना लौंडा म्हणूनच ओळखले जाते, आणि त्या नृत्याच्या प्रकाराला लौंडा नाच म्हणून ओळखले जाते. एकदा का लौंडा म्हटलं की, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार हे निश्चितच इतका मोठा लोकाश्रय आणि राजाश्रय मिळूनही लौंडा नाचला अश्लील ठरवण्यात आले. लौंडा नाच असा कुठलाही फॉर्म लोककलेमध्ये कधीच नव्हता. इतिहासातही तसे दाखले मिळत नाहीत. १९व्या शतकांपासून आजही भारताच्या गावांगावांमध्ये जी नाटके होतात, रामलीला, रामायण, महाभारताचे प्रसंग नाच-गाण्यातून सादर केले जातात, त्यात अनेक तरुणांनी स्त्रीपात्र रंगवले आहे. मनोहर श्याम जोशी, बालगंधर्व इतकेच नव्हे तर हबीब तनवीर, रतन थिय्याम यांच्या नाटकातही पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका साकारल्या आहेत. पूर्वी राजदरबारात नर्तकी नाचायच्या. राजे-महाराजांचे युग संपले आणि तवायफ, कोठेवाली, बायजींचे युग सुरू झाले. इतर समाजातील महिलांना नाच-गाणं सादर करण्याची परवानगीच नाकारली. त्यामुळे एक खूप मोठा उपेक्षित वर्ग नृत्यासारख्या मनोरंजनापासून वंचित राहिला होता. त्यावर मात करण्यासाठी एका वेगळ्या शैलीचा जन्म झाला. पुरुषांनीच स्त्रिया बनून नाच-गाणं करण्याचा. अल्पावधीतच कलेचा हा फॉर्म इतका लोकप्रिय झाला, की त्यातून अनेक नाच-गाण्याची पथके तयार झाली, जी आज लौंडा नाच म्हणून लोकप्रिय आहेत.

दलित समाजाचे रामचंदर मांझी वयाच्या दहाव्या वर्षी भिखारी ठाकूर यांच्या पथकात सहभागी झाले होते. आपले सगळे आयुष्य त्यांनी भिखारी ठाकूर आणि नाचला समर्पित केले होते. लग्नाच्या दिवशीही रामचंद्र मांझी कार्यक्रम सादर करून आले होते आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशीही ते नाच करायला गेले होते. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी, जयप्रकाश नारायण, जगजीवन राम, नितीश कुमार, शरद यादव, रामविलास पासवान यांच्यासमोर रामचंद्र मांझी यांचे अनेक कार्यक्रम झाले. विशेषत: राजकीय नेत्यांमध्ये लालुप्रसाद यादव यांनी त्यांच्यावर खूप प्रेम केले. रामचंदर मांझी यांचे गुरू भिखारी ठाकूर यांना भोजपुरीचे शेक्सपिअर आणि तुलसीदास म्हणून संबोधिले जाते. महापंडित राहुल सांकृत्यायनने भिखारी ठाकूर यांचा अनगढ हिरा म्हणून गौरव केला आहे. लोककवी भिखारी ठाकूरमुळेच आज भोजपुरीचे सांस्कृतिक स्थान उभे राहिले आहे. बिहारच्या छपरा येथे नाभिक समाजात जन्मलेले भिखारी ठाकूर रोजगाराच्या शोधात इतर बिहारी-युपी तरुणांप्रमाणेच कोलकाताला आणि त्यानंतर पुरी येथे स्थलांतरित झाले होते. तिथली लोक संस्कृती, तिथल्या लोककला पाहून ते भारावून गेले. बिहारमधल्या सांस्कृतिक दारिद्र्याबद्दल भिखारी ठाकूर यांना खंत वाटली. आणि पुन्हा बिहारला परतून पुरुषांनीच स्त्रियांच्या भूमिका साकारणारे भिखारी ठाकूर यांनी स्वत:चे एक सांस्कृतिक विश्व जन्माला घातले. ‘बिदेसिया’ (परमुलुखात गेलेल्या कर्त्या पुरुषाची आळवणी करताना स्त्री मनाचं दु:ख, वेदना हुरहूर आदी भावनांचं दर्शन घडवणारा कलाप्रकार) ही भिकारी ठाकूर यांची नृत्य-नाट्य असलेली एक अजरामर १९१७ मध्ये सादर केेलेली कलाकृती. उत्तरेकडे असा एकही कलावंत नसेल, ज्याने रंगमंचावर बिदेसिया केलं नसेल. बिदेसियाच्या आजवर किती आवृत्त्या निघाल्या हेदेखील कोणी ठामपणे सांगू शकत नाही. बिदेसिया पाठोपाठ भिखारी ठाकूर यांच्या प्रतिभेतून आणखी काही कलाकृती साकारल्या गेल्या. स्त्रियांच्या अधिकारांवर आधारित गबरघिचोर, बालविवाह आणि भ्रूणहत्येविरोधात बेटी बचवा  आणि वृद्धाश्रमवर आधारलेले बूढशाला का बेयान आणि परखड सामाजिक भाष्य करणाऱ्या या कलाकृतींचा काळ विसाव्या शतकातला होता.

रामचंद्र मांझी यांनी स्वत: बिदेसिया’चे शेकडो प्रयोग केले आहेत. अनेक सामाजिक भूमिकेवर त्यांनी लोककलेमार्फत भाष्य केले आहे. स्त्रीचा वेष धारण करून रामचंदर मांझी खालील गाणे सादर करतात. घर में रहे दूध पांच सेर, केहू जोरन दिहल एक धार. का पंचाईत होखत बा, घीव साफे भईल हमार… याचा अर्थ, माझ्या घरी जर पाच शेर दूध असेल आणि जर का कुणी त्यात विरजण घातले, तर यात पंचायतीचा काय संबंध? त्यातून तयार होणारे तूप हे सरळ सरळ माझेच असणार आहे. जिचा नवरा कामाचे निमित्त सांगून घरदार सोडून पळून गेलाय, तिथे जाऊन त्याने दुसरे संधान बांधले आहे आणि अशा परिस्थितीत त्याची पत्नी इतर कोणाकडून गरोदर राहिली तर ? इतकाच कुतूहल चाळवणारा या गाण्याचा अर्थ नाहीये, तर मी कुणाशी संबंध ठेवावेत हा फक्त माझा प्रश्न असून माझ्या गर्भावर पूर्णपणे माझाच हक्क आहे, त्यात पंचायतीला नाक खुपसायचं काहीएक कारण नाहीये, असा थेट सवाल एका स्त्रीने व्यवस्थेला विचारला आहे.

एकेकाळी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणारी, ही कला आता खरोखरच अश्लील संवाद, अचकट-विचकट हावभाव अशा स्वरुपात सादर केली जाते. पूर्णपणे ऑर्केस्ट्राकरण झालेल्या या जमान्यात पारंपरिक कलावंत भरडले जात आहेत. आणि म्हणूनच पारंपरिक नाच करणाऱ्या अनेक कलावंतांनी त्याकडे पाठ फिरवायला सुरूवात केली आहे. २००० नंतर इथली अनेक नाच पथके बंद पडली. आता आसाम, बांगलादेश, नेपाळमधून मुली येतात. मात्र काहीही झाले तरी मांझी यांना भिखारी ठाकूर यांची परंपरा जिवंत ठेवायची आहे. २०१७ साली रामचंद्र मांझी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जानेवारी २०२१ मध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार रामचंद्र मांझी प्रदान करण्यात आला आहे.

संदर्भ :

  • https://www.youtube.com/watch?v=p7kozOo-h_U