डक्कलवार : डक्कलवार हा एक भटका विमुक्त समाज आहे. त्यांना मातंग समाजे स्तृतिपाठक म्हणून ओळखले जाते. डक्कलवार मूळचे आंध्र प्रदेश तेलंगणा भागातून आले असल्यामुळे त्यांची बोलीभाषा ही तेलगू असते. मात्र, मराठी गद्य व पद्य वापरून ते पुराण कथाकथन करतात. त्यामध्ये प्रामुख्याने बसवपुराण  कथांचा समावेश असतो. ते मौखिक स्वरूपात असल्यामुळे त्याची रीतसर कुठे लेखी स्वरूपात नोंद नसते. कथाकथन करण्याची पद्धत, त्यातील नाट्यमयता, वाचिक व कायिक अभिनय आणि किंगरी वाद्य व बाडाचा वापर करून सादर केलेले एक विधिनाट्य असाच त्याचा उल्लेख करावा लागेल. डक्कलवार म्हणजे मातंगांचे मागते. हिंदू समाजात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या जातीजमातींचा एक वर्ग आहे, ज्यांना ‘मागते’ असे म्हणतात. त्यांच्यात आणि इतर मागत्यांमध्ये फरक केवळ इतकाच की इतर भिक्षा मागणाऱ्या जाती स्वत:ला विशिष्ट जातीचे मागते म्हणवत असल्या तरी इतर समाजाकडून देखील भिक्षा मागतात. मात्र डक्कलवारांचे तसे नाही; ते फक्त मातंगांचेच मागते असतात. डक्कलवार मातंगांशिवाय दुसऱ्या कोणाच्याच हातचे खात नाहीत किंवा कुणी काहीही दिले तरी स्वीकारत नाहीत.

महाराष्ट्रात मराठवाडा आणि नगरमध्ये प्रामुख्याने वस्ती करून राहणारा हा डक्कलवार समाज. या समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे, ‘किंगरी’ या एका अफलातून तंतुवाद्याने ते गात असलेले पुराण. निसर्ग आणि समाजातल्या प्रत्येक ‘का’चे उत्तर डक्कलवारांच्या पुराणकथांमध्ये सापडते, इतका या समाजावर मिथके आणि पुराणकथांचा प्रभाव आहे. ‘डक्कलवार’ हे नाव कसं पडलं, याची देखील कथा या समाजाकडे तयार आहे. ‘एकदा शिवाच्या लग्नासाठी एक अलंकार करायचा होता. त्यासाठी एका सुवर्णकाराला बोलावून अलंकार तयार करायला सांगितले. त्या सुवर्णकाराकडे अलंकार तयार करण्यासाठी भाता, हातोडी, शेगडी अशी सामग्री नव्हती. त्या वेळी जांबुवादू या सुवर्णकाराने त्याच्या शरीराच्या निरनिराळ्या अवयवांपासून अलंकार तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू बनवल्या आणि पाठीचे मणके मात्र कायम ठेवले. जांबुवादूने स्वत:च्या मुलाचा बळी देऊन अलंकार तयार केला. हे पाहिल्यावर देव संतुष्ट झाले व त्यांनी पाठीच्या मणक्यांमध्ये जीव निर्माण केला. अशा रीतीने पुन्हा जिवंत झालेला मुलगा जांबुवादूकडे आला, तेव्हा त्याने मुलाला ओळखले नाही व घरात येऊ दिले नाही. त्याला सांगण्यात आले की, यापुढे त्याने कोणाच्याही घरात प्रवेश न करता किंवा स्वत:ही घर न बांधता फिरस्त्याचे जीवन कंठावे व माडिया या जमातीकडून भिक्षा मागून उदरनिर्वाह करावा. पाठीच्या मणक्यांपासून निर्माण झालेल्या या मुलाला ‘डक्कल’ असे नाव पडले, कारण ‘डक’ म्हणजे पाठीचा कणा. तेव्हापासून डक्कल हे एके ठिकाणी घर न करता भिक्षा मागतात आणि ही भिक्षा ते फक्त माडिया जमातीकडूनच स्वीकारतात.

चित्रकथीशी काही प्रमाणात साधर्म्य असलेली आणखी एक कला म्हणजे डक्कलवार समाजाची पुराणकथा. बसवपुराण सांगण्याच्या वेळेस डक्कलवारांचा विशिष्ट पोशाख असतो. धोतर, सदरा, कोट अन् डोक्याला फेटा असा हा पारंपरिक पोशाख असतो. कथा पुराण सांगताना कधी गद्याचा, तर कधी पद्याचा वापर केला जातो. त्याला पौराणिक कथांचा आधार असतो. विशिष्ट पद्धत, शब्दोच्चारातील चढ-उतार, चेहर्‍यावरील हावभाव व देहबोलीचाही ते लीलया वापर करतात.

डक्कलवार समाज आपल्या शैलीत कमीतकमी शब्द वापरून सृष्टीच्या निर्मितीचे श्रेष्ठ, गहन, गूढ तत्त्वज्ञान सांगतात. पहिल्या दोन भागात सृष्टीची उत्पत्ती सांगून अध्याय पूर्ण करतात. सृष्टीच्या उत्पत्तीची कथा डक्कलवारांच्या भाषेत समजून घेणे उद्बोधक ठरते. आधुनिक विज्ञानसृष्टीच्या उत्क्रांती विकास हा रासायनिक प्रक्रिया यावर भाष्य करून अंदाज वर्तविते. त्यांचे बसवपुराण तासनतास चालते. हे पुराण सांगत असताना ते बाड उकलून त्यावरील चित्रे एका छडीने दाखवत असतात. डक्कलवारांचे बाड वैशिष्टय़पूर्ण असते. जवळ जवळ अडीच हात रुंद आणि पंधरा ते वीस हात लांब अशा पासोडीवर रंगीत चित्रे काढलेली असतात. हे बाड एका वेळूसारख्या काठीला गुंडाळलेले असते आणि पुराण सांगताना, ते हळूहळू उकलले जाते. यालाच बाड उकलणे, असे म्हटले जाते. सगळे बाड उघडायला कित्येक दिवस लागतात. गुंडाळलेले बाड ठेवण्यासाठी शिंदीच्या पानांपासून तयार केलेली एक लांब आकाराची पिशवी असते. या पिशवीतून बाड बाहेर काढून उकलण्यापूर्वी बाडासमोर पूजा केली जाते. या बाडामध्ये सगळ्या जातींची उत्पत्ती आहे, असे म्हटले जाते. या बाडांवर दोन चित्रपट्टय़ा एकाखाली एक अशा होत्या. त्यावर निरनिराळ्या घटनांची चित्रे काढलेली होती. चित्रे अनेक रंगात असून कलापूर्ण होती. लोकचित्रकलेचे सुंदर नमुने असे त्या चित्रांचे स्वरूप होते.

कोणे एके काळी एका खळ्यात मोर नाचू लागला, तेव्हा एका शिकाऱ्याने त्याला मारले. मोर घायाळ होऊन पडला असता त्या मोराला एका मातंगाने पाणी पाजले. मोर सावध झाला व त्याने ‘तुला केव्हाही कमी पडणार नाही’असा आशीर्वाद दिला आणि तुझ्यासंबंधीची कथा मी श्रवण करीन’ असे सांगितले. तेव्हापासून मोर डक्कलवारांच्या किंगरीवर बसला. डक्कलवार ज्या पुराणकथा सांगतात त्या सगळ्या कथा किंगरीवर बसवलेल्या लाकडी मोराला सांगितल्या जातात. डक्कलवार मोराला श्रोता या नात्याने आवाहन करून कथा सांगत असतो.

किंगरीला काही भागात त्याला ‘कोका’ असेही म्हणतात. मात्र डक्कलवारांकडे जे किंगरी नावाचे वाद्य आहे ते या वाद्यापेक्षा सर्वस्वी वेगळं आहे. किंगरी हे एक तंतुवाद्य. तीन भोपळ्यांना एका बांबूच्या काठीने जोडून हे वाद्य तयार करतात. काठीवर दोन किंवा तीन तारा लावलेल्या असतात. तारांची टोके खुंट्यांना बांधलेली असतात. खुंटीला फिरवून आवश्यकतेनुसार तारेचा ताण कमीअधिक करता येतो. तारा अशा रीतीने बांधलेल्या असतात की त्यांना बोटाने छेडून त्यातून नाद निर्माण करता यावा. टोकाच्या एका भोपळ्यावर एक मोर जोडलेला असतो. मोर म्हणजे लाकडाने तयार केलेली मोराची प्रतिकृती. मोराचे डोळे, चोच, त्याची पिसे इत्यादी कौशल्यपूर्ण रीतीने तयार केले जातात. त्याच्या खाली पायाशी घुंगरू बांधलेले असतात. मोराचा खालचा भाग एका छोटय़ा लाकडी दांडीचा असतो, ही लाकडी दांडी भोपळ्याला छिद्र करून त्यात घालतात. दांडीच्या टोकाला एक दोरी बांधलेली असते. त्या दोरीला ओढून व सैल सोडून मोराला वरखाली हलवता येते. असे केल्याने घुंगरु भोपळ्यावर आदळून त्याचा मंजुळ नाद ऐकायला येतो. एका हाताने तार छेडून व दुसऱ्या हाताने किंगरी धरून व बोटाला गुंडाळलेल्या दोऱ्याला वरखाली करून घुंगराचा नाद निर्माण केला जातो. मोराच्या वरखाली होण्याबरोबरच पिसाऱ्याचीही उघडझाप होते. म्हणजे, एकाचवेळी तंतुवाद्य, घुंगराचे वाद्य व भोपळ्यावर घुंगरु आपटल्यानंतर निर्माण होणारा नाद असे तीन ध्वनी एकाच वाद्यातून निर्माण होतात. यालाच डक्कलवारांचे मोर नाचवणे असे म्हणतात.

डक्कलवारांच्या पोतडीत असंख्य पुराणकथा असल्या तरी त्यापैकी सृष्टी कशी निर्माण झाली यावर डक्कलवार खुप सुंदर भाष्य करतो. श्रेष्ठ, गहन, गूढ तत्वज्ञान आपल्या सहज शैलीत कमीत कमी शब्द वापरून सांगण्याची डक्कलवारांची शैली अद्भुतच म्हणावी लागेल. जातीपुराणाला प्रारंभ करतानाच डक्कलवार सृष्टीच्या निर्माणाची कथा सांगतो. प्रथम अंध:कार होता मग धुंदकार झाला. तेथे वाऱ्यासारखा लोदाचा अवतार झाला होता. तोच थिजून गोळ्याप्रमाणे झाला. त्याला रुप, रंग तर नव्हतेच परंतु नाव आणि स्थळही नव्हते. त्याच्या हुंकार आणि हंकार यातून सर्व आकार निर्माण झाले. निराकाराला आकार प्राप्त होताच त्याच्या रोमारोमाला घाम फुटला अणि जल निर्माण झाले. या पाण्याच्या भोवऱ्यात या आकाराचे राहणे व त्यावरच त्याचे आसन तयार झाले. स्वहंकारापासून आत्मा, हंकारापासून शिर आणि धुंकारापासून हातपाय झाले. आकारात सर्व तयार झाला आणि शेवटी निराकारात निराळा झाला. असे या कथेचे निवेदन असते.

संदर्भ :

  • https://www.evivek.com/Encyc/2021/1/6/Dakkalwar-society.html