महाराष्ट्रातील विमुक्त जातीतील एक जात .मुंबई रायगड,ठाणे,रत्नागिरी,नाशिक,धुळे,जळगाव ,पुणे,अहमदनगर,सातारा,सांगली कोल्हापूर,सोलापूर,औरंगाबाद,नांदेड आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ही जात आढळते.धोन्तले,कोरवा,माकडवाले  किंवा कोन्चीकोरवा ,पामलोर आणि कोरवी या तत्सम पोटजाती आढळतात .चोर कैकाडी आणि गाव कैकाडी अशाही काही पोटजाती सांगितल्या जातात . ही दक्षिणेची द्रविड संस्कृतीतील प्राचीन जमात आहे.तेलुगु तमिळ साहित्याच्या कुरवंजी नाटकात कुरत्ती चा (कोरव-कैकाडी भटक्यांचा जमातीतील स्त्री )उल्लेख आहे.कीकट या जातीपासून या जातीची उत्पत्ती झाल्याचा पुरावा दिला जातो.तसेच ही जमात केरळमधून संपूर्ण भारतात स्थलांतरित झाली.केरळमधील होयसर राजा बल्लाळ प्रथम हा कैकाडी जमातीचा होता असा एक ऐतिहासिक विचार  मांडला जातो.  हे  लोक महाराष्ट्राबाहेरील असून तेलगंण हे त्यांचे वस्तीस्थान सांगितले जाते. त्यांची मातृभाषा तेलगू सांगितली जात असली तरी तामिळी आणि कानडी या भाषेचे शब्द एकत्र करुन एक मिश्रभाषा ते  बोलतात. त्याला ग्रामीण भागात कैकाडी भाषा असे नाव आहे.या जातीची आर्थिक , सामाजिक, शैक्षणिक प्रगती न झाल्यामुळे दारिद्र्याचे जीवन जगत आहे.

ब्रिटीश आमदनीमध्ये गुन्हेगार जमात म्हणून ह्या जमातीचा उल्लेख आहे.चोरी आणि दरोडे यामध्ये या जमातीतील अनेक लोकांचा सहभाग असल्याचे नमूद आहे.मात्र आपल्या उपजिविकेसाठी जमातीतील लोक गावातील छोटेमोठे कामे करतात. कैकाडी समाजाचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे रानात जाऊन निरगुडीचे, निळुंबीचे, धामणीचे फोक कापून आणणे. फोक चिरुन, आख्ख्या फोकपासून उपण्या, टोपल्या, कणगुली, झाप, सलूद, कुडवे, कणगी तयार करणे, ते गावात नेऊन विकणे. भटकंतीत गावोगावी हाच व्यवसाय करतात. कैकाडयाने विणलेली पाटी धान्य उपसण्यासाठी वापरली तर बरकत येते असा समज आहे. काही वेळेला जुने कुडवे, कणगी, कणगुली दुरुस्त करतात. दुय्यम व्यवसाय म्हणून डुकरे पाळतो. त्यांची मोठ्या प्रमाणात पैदास करतो. गाढवं आणि डुकरे हे कैकाड्यांचे मुख्य पाळीव प्राणी म्हणून ओळखले जातात. गाढवाच्या खरेदी-विक्रीबरोबर त्याच्याअ लिदीचे उत्पन्न (शेणाचे) त्यांना मिळत असते.

कैकाडी समाजात लग्न जमवताना प्रथम कुळाचा विचार केला जातो. समाजात कुळाला अतिशय महत्त्व आहे. कुळे ही समाजातील कुलवंत घराणी समजली जातात. समाजात प्रत्येक कुळाचा दर्जा ठरलेला असतो. त्या त्या दर्जाप्रमाणे कुळातील लोक आपआपसात व्यवहार करतात. कैकाडी समाजात एकाच कुळात बेटीव्यवहार होत नाही. कैकाडी समाजात पितृअमावास्येशिवाय सर्व सण साजरे करतात. शिमगा सण कैकाडी समाजात महत्त्वाचा मानला जातो. यल्लामाय त्यांचे  कुलदैवत आहे.भूत लागणे, भानामती, करणी, मूठ मारणे असल्या गोष्टीवर त्यांचा विश्वास आहे. देवदेवताना कोंबडी-बकरी बळी देतात. माणसाच्या अंगात आल्यानंतर एकसारखे घुमतात.पुरुष अंधश्रद्धाळू आहेत तसेच कैकाडी समाजातील स्त्रियादेखील देवाच्या नावाने उपावास करतात. देवाच्या नावाने नवस बोलतात. बोलल्याप्रमाणे केलेला नवस फेडतात. सिद्धी, चमत्कार मानतात. अशा प्रकारे पिढ्यान-पिढ्या या समाजाचे चक्र चालू आहे. देवाच्या नावाने सर्वस्व झोकून दिलेला असा हा समाज आहे. कैकाडी समाजात अंधश्रद्धेचे प्रमाण फार मोठे आहे. कैकाडी समाजात जातपंचायत न्यायदानाचे कार्य करते.. महाराष्ट्रात मढी जेजुरी, मालेगाव (जि. नांदेड) ही या समाजाची वार्षिक जातपंचायत बसण्याची मुख्य ठिकाणे आहेत.जातपंचायत ही पद्धत आता व्यक्तिस्वातंत्र्याच्या उत्कर्षामुळे बंद होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा