लोहिया, राममनोहर : (२३ मार्च १९१०-१२ ऑक्टोबर १९६७). भारतातील समाजवादी चळवळीतील एक अग्रगण्य नेते आणि विचारवंत. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर या गावी हिरालाल व चंद्रीबाई या दांपत्याच्या पोटी झाला. चंद्रीबाई राममनोहर लहान असतानाच वारली. तेव्हा आजी व चुलतीने त्यांचा सांभाळ केला. वडील हिरालाल हे व्यापार करीत असत. ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. अकबरपूरजवळील टंडन पाठशाळा व विश्वेश्वरनाथ हायस्कूल यांमधून राममनोहरांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. वडील व्यवसायानिमित्त मुंबईला राहू लागले, तेव्हा तेथूनच राममनोहर मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले (१९२५). त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते प्रथम बनारस हिंदू विश्वविद्यालयात दाखल झाले पण ते सोडून त्यांनी तत्कालीन कलकत्त्याच्या विद्यासागर महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि कलकत्ता विद्यापीठाची बी. ए. ही पदवी संपादन केली (१९२९). उच्च शिक्षणासाठी निधी जमा करून ते प्रथम इंग्लंडला गेले पण नंतर त्यांनी बर्लिन विद्यापीठात संशोधन करून अर्थशास्त्र विषयात सॉल्ट अँड सिव्हिल डिस्ओबीडिअन्स या विषयात पीएच्.डी. ही पदवी मिळविली (१९३२).
विद्यार्थिदशेतच १९२६ च्या गौहाती काँग्रेस अधिवेशनास ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांचा सुभाषचंद्र बोस आणि नेहरूंशी सहवास घडला आणि ते राष्ट्रीय चळवळीकडे आकृष्ट झाले ; तथापि जर्मनीहून परतल्यानंतर (१९३३) त्यांनी सुरुवातीस बनारस विद्यापीठात अध्यापकाच्या नोकरीसाठी प्रयत्न केला आणि नाखुषीने रामेश्वरदास बिर्लांच्या स्वीय साहाय्यकाचे काही महिने काम पतकरले. जेव्हा काँग्रेसमध्ये काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन झाला (१९३४), तेव्हा त्यांनी राजकीय कार्याला वाहून घेतले. त्यांची या पक्षाच्या कार्यकरिणीवर निवड झाली तसेच काँग्रेस सोशॅलिस्ट या नवीन साप्ताहिकाच्या संपादकत्वाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. लखनौच्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनात नेहरूंनी काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाचे त्यांना सचिव नेमून आणखी एक जबाबदारी सोपविली (१९३६-३८). त्यांनी आपले वास्तव्य कोलकात्याहून अलाहाबादला हलविले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी प्रखर युद्धविरोधी आणि साम्राज्यशाही विरोधी भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना अटक झाली (१९३९); पण न्यायालयात त्यांची सुटका करण्यात आली. त्यांना स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात एकोणीस वेळा तुरुंगावास घडला. तुरुंगात त्यांचा छळही करण्यात आला. अमेरिका, ग्रेट ब्रिटन, म्यानमार (ब्रह्यदेश), गोवा येथेही त्यांना विविध कारणांसाठी कारावासात डांबण्यात आले. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी अच्युतराव पटवर्धन व जयप्रकाश नारायण यांच्या बरोबरीने चळवळीचे नेतृत्व केले. याच सुमारास जयप्रकाशांबरोबर ‘आझाद दस्तसाठी’ काही महिने ते नेपाळात गेले. तेथून आल्यावर २० मे १९४४ रोजी त्यांना अटक होऊन प्रथम लाहोर व नंतर आग्रा येथे तुरुंगात ठेवण्यात आले. लाहोरच्या तुरुंगात त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. पुढे ११ एप्रिल १९४६ रोजी त्यांची सुटका झाली. भारताच्या फाळणीला त्यांचा तीव्र विरोध होता, तरीसुद्धा १९४७ च्या हिंदु-मुस्लिम दंगलीत त्यांनी म. गांधीबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. काँग्रेस अध्यक्षांसह कोणीही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र भारताचे पंतप्रधान होऊ नये, अशी त्यांची धारणा होती. अखेर काँग्रेसमधील समाजवादी विचारसरणीच्या गटाला घेऊन ते बाहेर पडले (१९४८). त्यांनी स्वतंत्र समाजवादी पक्षाचे नेतृत्व केले. हा समाजवादी पक्ष कृषक मजदूर प्रजा पक्षात विलीन करण्यात आला आणि त्याचे नाव प्रजा सोशॅलिस्ट पक्ष असे ठेवण्यात आले (१९५२). त्याचे ते महासचिव झाले तथापि त्यातही त्यांचे मतभेद होऊन त्यांनी हैदराबाद येथे समाजवादी पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले (१९५५). ते या पक्षाचे अध्यक्ष व मॅनकाइंड या नियतकालिकाचे संपादक झाले (१९५६). पुढे हाही पक्ष पुन्हा प्रजासमाजवादी पक्षात विलीन होऊन (७ जून १९६४) त्याचे संयुक्त समाजवादी पक्ष असे नामांतर झाले. तत्पूर्वी १९६३ मध्ये ते फरूखाबाद मतदार संघातून लोकसभेवर निवडून आले. अखेरपर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते.
आपल्या बहुरंगी आणि विविधतापूर्ण सार्वजनिक जीवनात त्यांनी त्रिपदरी कार्यावर भर दिला. निवडणुकांद्वारे सत्तापालट घडवून आणण्यासाठी राजकीय कार्य, सत्याग्रह व संघर्षाद्वारे परिवर्तनासाठी लढा आणि रचनात्मक कार्य असा त्यांचा कार्यक्रम होता. मतपेटी, तुरुंग आणि फावडे या प्रतीकांच्या स्वरूपात त्यांनी ही त्रिसूत्री मांडली. विद्यार्थिदशेतच त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव पडला होता. त्यांचे विचार त्यांच्या अनुयायांमध्ये ‘लोहियावाद’ म्हणून ओळखले जातात. त्याचे प्रमुख घटक असे : (१) लोकांचा शासनांत अधिकाधिक सहभाग असावा, यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करून केंद्र, राज्य, जिल्हा आणि गाव या चार पातळ्यांवरील शासनयंत्रणांना स्वतंत्र अधिकार असावेत. यालाच त्यांनी ‘चौखंबा राज्य’ हे नाव दिले. (२) आर्थिक क्षेत्रात त्यांनी माफक यांत्रिकीकरणाचा पुरस्कार केला. यंत्र हे शोषणाचे साधन न बनता दारिद्र्यनिवारणाचे साधन बनावे. माणूस यंत्रामुळे आळशी, परावलंबी आणि एकाकी बनू नये, या म. गांधींच्या विचारांचा स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच त्यांच्यावर प्रभाव पडला होता. त्यामुळे लघुउद्योग, त्यांना उपयुक्त अशी यंत्रसामग्री आणि स्वावलंबन यांवर त्यांनी भर दिला. या घोरणालाच त्यांनी ‘अल्पप्रमाण यंत्र’ असे म्हटले. औद्योगिक केंद्रीकरण, मोठे उद्योग आणि यांत्रिकीकरणावरील भर कमी केला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. (३) लोहिया हे स्त्रियांच्या समस्यांची जाणीव असलेले एक विचारवंत होते. त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा तसेच आंतरजातीय विवाह, कुटुंब नियोजन आणि हुंडाबंदी इ. प्रागतिक विचारांचा हिरिरीने पुरस्कार केला. जातिसंस्था हा समाजवादाच्या मार्गातील मुख्य अडसर आहे, हे लक्षात घेऊन या सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी प्रखर संघर्ष उभा केला आणि अनुसूचित जातिजमातींची आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला. जातीवर आधारित राजकारणाला मूलगामी परिवर्तनाचे परिमाण लोहियांनी दिले. (४) स्वातंत्र्योत्तर काळातील इंग्रजी भाषेच्या वर्चस्वाचे ते कट्टर विरोधक होते. इंग्रजी भाषेचा अनुनय हे गुलामी मनोवृत्तीचे लक्षण असल्याची त्यांनी टीका केली. म्हणून राष्ट्रभाषा व भारतीय भाषा यांचा आग्रह त्यांनी सातत्याने धरला; परंतु पुढे इंग्रजी विरोधी आंदोलनातून दक्षिणेत हिंदी विरोधाचे आंदोलन उद्भवले. (५) १९६२ नंतरच्या काळात लोहियांनी काँग्रेसला सत्ताभ्रष्ट करणे, हे मुख्य उद्दिष्ट मानले आणि काँग्रेस विरोधात डाव्या व उजव्या सर्वांनी एक व्हावे, यासाठी अथक प्रयत्न केले. ‘काँग्रेस हटाव’ आंदोलन आणि सर्व काँग्रेसविरोधकांची आघाडी करण्याचे हे प्रयत्न हा भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा असून या धोरणाचा १९६७ नंतरच्या भारतीय राजकारणावर फार मोठा ठसा उमटलेला दिसतो.
लोहियांनी आपले विचार व्याख्याने, स्फुटलेख व ग्रंथांद्वारे मांडले. त्यांचे सर्वच लेखन विचारप्रवर्तक असून त्यांच्या काही ग्रंथांचा मराठीत अनुवाद झाला आहे. काहींच्या आवृत्त्याही निघाल्या आहेत. त्यांच्या इंग्रजी-हिंदी प्रमुख व मान्यवर ग्रंथांपैकी मिस्टरी ऑफ सर स्टॅफर्ड क्रिप्स (१९४२), ॲस्पेक्टस ऑफ सोशॅलिस्ट पॉलिसी (१९५२), व्हिल ऑफ हिस्टरी (१९५५), विल-पॉवर अँड आदर रायटिंग्ज (१९५६), गिल्टी मेन ऑफ इंडियाज् पार्टिशन (१९६०), मार्क्स, गांधी अँड सोशॅलिझम (१९६२), इंडिया, चायना अँड नॉर्दर्न फ्राँटिअर्स (१९६३), द कास्ट सिस्टीम (१९६४), इंटरव्हल ड्यूअरिंग पॉलिटिक्स (१९६५), फ्रॅग्मेन्ट्स ऑफ वर्ल्ड माइंड (१९६६), वाल्मीकी और वसिष्ठ, क्रांती के लिए संघटन इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत. नियतंकालाकांतून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या बहुविध स्फुटलेखांची मराठी भाषांतरे श्रीमती इंदुमती केळकर व श्रीपाद केळकर यांनी अंतहीन यात्रा, ललित लेणी (१९६९), दोन हत्यारे सत्ताधाऱ्यांची : भाषा आणि जाती (१९७१) या शीर्षकांनी प्रसिद्ध केली आहेत. अलीकडे त्यांचे आणखी काही स्फुटलेख समता आणि समृद्धी (१९७७), भारतीय शिल्प (१९८१), मार्क्सवाद-समाजवाद (१०८१), अल्प प्रमाणयंत्र (१९८४), नर-नारी (१९८४), शेती-शेतकरी-भूसेना (१९८४), जातिप्रथेचा तुरुंग (१९८४) इ. मथळ्यांनी मराठीत प्रसिद्ध झाले आहेत.
लोहियांनी समाजवादी चळवळीचे नेतृत्व केले, पण मूलतः त्यांची धारणा उदारमतवादी होती. त्यांनी मार्क्सवाद अथवा गांधीवाद पूर्णांशाने कधीच स्वीकारला नाही. भारतीय समस्यांच्या संदर्भात स्वदेशी समाजवाद विकसित केला पाहिजे, अशी त्यांची मूलगामी भूमिका होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासूनच ते नेहरूंचे टीकाकार बनले होते. अखेरपर्यंत संसदेतील एक प्रमुख विरोधी नेते म्हणूनच त्यांनी नावलौकिक मिळविला. स्वातंत्र्योत्तर काळातील त्यांचे राजकीय जीवनही संघर्षपूर्ण होते. शेतकऱ्यांच्या चळवळी, इंग्रजी हटाव आंदोलन, जाती तोडो आंदोलन, गोवा मुक्ती चळवळ, हिंदी राष्ट्रभाषेचा पुरस्कार, नेपाळमधील स्वातंत्र्य संघर्ष अशा अनेक चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले; तथापि आपल्या राजकीय जीवनात त्यांनी काँग्रेस वा कम्युनिस्ट यांबरोबर कधीच तडजोडीची भाषा वापरली नाही. लोहियांनी अनेक देशांचा या ना त्या निमित्ताने प्रवास केला. त्यात अमेरिका, जपान, श्रीलंका, इंडोनेशिया तसेच अनेक यूरोपीय व आफ्रिकी देशांचा सदिच्छा दौरा होता. १९५१ मध्ये फ्रँकफुर्ट (जर्मनी) येथील पहिल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेस ते उपस्थित होते. याशिवाय त्यांनी १९५३ च्या रंगून येथील आशियाई समाजवादी परिषदेचे आयोजन केले होते; पण त्या परिषदेस ते उपस्थित राहू शकले नाहीत. ते इंग्रजी, हिंदी या भाषांशिवाय फ्रेंच, जर्मन या परकीय भाषा आणि उर्दू-बंगाली या भारतीय भाषाही उत्तम प्रकारे बोलत. त्यांना कला-साहित्याची चांगली जाण होती. त्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र होते. आयुष्यभर त्यांनी अन्याय व भ्रष्टाचार यांविरुद्ध प्रखर लढा दिला. संसदीय लोकशाहीतील एक जबरदस्त विरोधी नेता म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. ३० सप्टेंबर १९६७ रोजी दिल्लीच्या विलिंग्डन नर्सिंग होम रुग्णालयात अष्ठीला ग्रंथीची शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात आली. त्यांनतर काही दिवसांतच त्यांचे देहावसन झाले. ते अखेरपर्यंत अविवाहित राहिले.
संदर्भ :
- Arumugam, M. Socialist Thought in India, New Delhi, 1978.
- Mehrotra, N. C. Lohia – A Study, Delhi, 1978.
- Sinha, Phulgenda, The Prjaja Socialist Party of India, Washington, 1968.
- ओंकार, शरद, लोहिया, अलाहाबाद, १९७७.
- केळकर, इंदुमती, लोहिया : सिद्धांत और कर्म, हैदराबाद, १९६३.
- भटनागर, राजेंद्र, समग्र लोहिया, दिल्ली, १९८२.