स्वतःने स्वतःला दिशा देऊन केलेले अध्ययन म्हणजे स्वयंनिर्देशित अध्ययन. स्वयंनिर्देशित अध्ययन ही पूर्णपणे विद्यार्थ्यांवर अवलंबून असणारी एक विद्यार्थीकेंद्रित वैयक्तिक अभ्यासपद्धती किंवा अध्ययनपद्धत आहे. स्वयंनिर्देशित अध्ययन हे प्रौढ अध्ययनाला प्रेरणा देणारी अध्ययन पद्धती आहे. ज्यामध्ये मार्गदर्शन, अध्ययन आणि नियोजन यांची पूर्णतः जबाबदारी अध्ययनार्थीची असल्याचे गृहीत धरले जाते. स्वयंनिर्देशित अध्ययनपद्धतीचा वापर सर्व वयोगटातील अधयनार्थी करू शकतात. या पद्धतीने शिकणे ही स्वतः अध्ययनार्थ्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. हिमस्ट्रा, आर. यांच्या मते, स्वयंनिर्देशित अध्ययन ही अभ्यासाची एक पद्धत असून या पद्धतीमध्ये नियोजन, प्रयत्नांची दिशा ठरविणे आणि त्याचे मुल्यपमान करणे या बाबींची प्राथमिक जबाबदारी अध्ययनार्थ्यांवर असते.
स्वयंनिर्देशित अध्ययन ही प्राचीन काळापासून चालत आलेली एक अध्ययन पद्धती आहे. उदा., पाश्चात देशांमधील प्लेटो, सॉक्रेटीस, ॲरिस्टॉटल, सॅम्युएल अलेक्झांडर इत्यादी विचारवंत स्वयंनिर्देशित अध्ययनार्थीच होते. आपल्याकडील एकलव्याचे उदाहरण हे स्वयंअध्ययनार्थ्यांचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. मध्यंतरीच्या काळात ही पद्धती दुर्लक्षित होती; पण अगदी अलीकडे म्हणजे १९६० नंतर ‘स्वयंअध्ययन पद्धती’ला मुक्त शिक्षण व प्रौढ शिक्षण यांमुळे पुन्हा चालना मिळाली. १९६० – १९८० या काळात पाश्चात देशांत या अध्ययन पद्धतीसंदर्भात अनेक संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आले. या संशोधनातूनच ॲलन एम. टॉघ यांनी १९७१ मध्ये दी अडल्ट लर्निंग प्रोजेक्ट हे पुस्तक लिहिले. त्याच प्रमाणे स्वयंनिर्देशित अध्ययनाचे मापन करणारी कसोटी व त्यावरून एक श्रेणी तयार केली. स्पीकर व मॉकर यांनी अध्ययनार्थीच्या स्वयंनिर्देशित अध्ययनासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात याविषयी १९८४ मध्ये संशोधन केले. नोल्स यांच्या प्रयत्नांतून १९७५ मध्ये आफ्रिकेत प्रौढ अध्यापनशास्त्राची संकल्पना लोकप्रिय ठरली व स्वयंनिर्देशित अध्ययनाला मार्गदर्शक ठरले. स्वयंनिर्देशित अध्यापनात मानव हा त्याच्या क्षमतांनुसार अध्ययनातून वृद्धिंगत होत असतो, त्याचे अनुभव हेच अध्ययनास मोठे स्रोत असतात.
स्वयंअध्ययन पद्धतीने व्यक्ती आपल्या आयुष्यात चांगली कार्ये होण्यासाठी काय आत्मसात केले पाहिजे हे शिकते. समस्याकेंद्रित अध्ययनामुळे प्रौढांचे नैसर्गिक उद्बोधन होते. यात अध्ययनार्थी हा स्वतःच्या विविध आंतरिक प्रेरणेतून प्रेरित झालेला असतो. जिज्ञासा, स्व-आदर, कार्यसिद्धीची जिद्द आणि पूर्णत्त्वाचे समाधान ही या पद्धतीची मार्गदर्शक तत्त्वे म्हणता येतील. स्वयंनिर्देशित अध्ययनाच्या संकल्पनांशी स्वतंत्रपणे अध्ययनाशी मिळत्याजुळत्या कल्पनांमध्ये गृहाभ्यास (होम वर्क), अध्ययन खोली (स्टडी हॉल), करार (कॉन्ट्रॅक्ट), अध्ययनाची स्वयंपूर्णांगे (लर्निंग मॉड्यूल्स), अपर्यवेक्षित अभ्यास (अनसुपर्वाइज स्टडी), वैयक्तिक अभ्यास (इन्डीव्ह्युज्वल स्टडी), वैयक्तिक पद्धती (पर्सन्लाइज्ड सिस्टिम), संगणक केंद्रित सूचना (कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन्स) आणि स्वयंसूचना (सेल्फ इन्स्ट्रक्शन) इत्यादींचा समावेश होतो. अर्थात, सूक्ष्मात गेल्यावर स्वयंनिर्देशित अध्ययनाचे वेगळेपण लक्षात येते.
स्वयंनिर्देशित अध्ययनात अनेक कृतींचा समावेश होतो, असे हिमस्ट्रा आर. यांनी मत मांडले. अध्ययनाची ध्येये स्पष्ट व साध्य करण्यासाठी आवश्यक त्या कौशल्यांचा वापर करणे; नेमके अध्ययन कशाचे आहे यावर लक्ष केंद्रित करणे; विविध माहिती, स्रोत, संदर्भ, अध्ययन साहित्यांचा शोध व बाहेरील अध्ययन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा उपयोग करणे; प्राथमिक स्तराकरिता अध्ययन कौशल्यांचा वापर करता येणे; स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व विविध निर्णय घेण्याची जबाबदारी घेणे; वैयक्तिक प्रकल्प, स्वतंत्रपणे संशोधन, क्षेत्रीय कार्य करणे; शिकाऊ उमेदवारी किंवा अध्ययन समूहात सहभाग घेणे; तांत्रिक माध्यमे, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा व संपर्कसत्राचा उपयोग करून विशिष्ट विषयांतील अध्ययनाची कौशल्ये संपादन करणे इत्यादी कृती स्वयंनिर्देशित अध्ययनात अभिप्रेत आहेत.
स्वयंनिर्देशित अध्ययन ही पद्धती सहजासहजी आत्मसात होत नाही. ती एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. मार्टिन टेलर यांनी स्वयंनिर्देशित अध्ययनाची प्रक्रिया आकृतीद्वारे दर्शविली आहे.
आकृती १ : स्वयंनिर्देशित अध्ययनाची प्रक्रिया
स्वयंनिर्देशित अध्ययनाच्या प्रक्रिया :
(१) शिकणारी व्यक्ती अस्वस्थ होते. उदा., मी अभ्यास करूनसुद्धा नापास कसा झालो? किंवा अध्ययन केलेले मला का समजत नाही, असा वैचारिक संघर्ष होतो. काही वेळेस दोषारोप दुसऱ्यांवर केले जाते.
(२) स्वतःच्या समस्या नेमकेपणाने मांडण्यासाठी दुसऱ्यांची स्वपरीक्षणासाठी मदत घेतली जाते; ‘स्वजबाबदारीची’ जाणीव होते.
(३) स्वजबाबदारीच्या जाणीवेनंतर स्वतःच्या समस्येसंदर्भात नवीन माहिती, नवीन ज्ञान मिळविले जाते. काही मूळ गृहीतके पूर्णपणे कोलमडून जातात. या प्रक्रियेत अध्ययनार्थी हळूहळू स्वअध्ययनाची जबाबदारी स्वतःवरच घेतो आणि शेवटच्या अवस्थेत स्वतःच स्वतःच्या निर्देशानुसार अभ्यास करायचा, अशा वयक्तिक जबाबदारीकडे जातो. या प्रक्रियेमुळे अध्ययनार्थीमध्ये काही बदल होतात. उदा., अध्ययनाविषयी प्रेम व अंगी सर्जनशीलता असते; अध्ययनाच्या मुलभूत कौशल्यांची व समस्या निराकरणाच्या कौशल्यांचा वापर करण्याची क्षमता असते; ‘स्व’ अंत:प्रेरणेने प्रेरित होतो; ‘स्व’चे अस्तित्व टिकविण्याची गरज व जिज्ञासा त्यांच्यात निर्माण होते; विविध अध्ययनशैली आणि अनुभवांवरील विविध भूमिका शिकायला तयार असतो; अध्ययनाची संधी शिकविण्यास सतत तयार असते; क्रियाशील अध्ययनार्थी अध्ययनाबाबतीत स्वतःच जबाबदार असतो; प्राथमिक जबाबदारी ही व्यक्तिगत अध्ययनाची असते इत्यादी वैशिष्ट्ये अंगीकृत करणारा स्वयंनिर्देशित अध्ययनार्थी होय. स्वयंनिर्देशित अध्ययनात विविध कृतींचा समावेश असतो. त्या विशिष्ट क्रमाने पायऱ्या पायऱ्यांनी होतात व प्रत्येक पायऱ्यानुसार कृतीचे नियोजन करावे लागते.
स्वयंनिर्देशित अध्ययनाच्या पायऱ्या : स्वयंनिर्देशित अध्ययनाच्या सहा पायऱ्या आहेत.
(१) स्वयंप्रेरणा (सेल्फ मोटिव्हेशन) : अध्ययनार्थीला अध्ययनाची सुरुवात स्वयंप्रेरणेनुसारच करावी लागते. स्वयंप्रेरणा नसेल, तर त्याला शिकण्याची इच्छाच राहणार नाही आणि त्यामुळे अध्ययनार्थी अस्वस्थ होतो. उदा., एकलव्य धनुर्विद्या शिकण्यापूर्वी अस्वस्थ झाला होता; मात्र नंतर स्वयंप्रेरणेने पुढील अध्ययनाची दिशा शोधली.
(२) गरजांची निश्चिती (आयडेंटिफिकेशन ऑफ नीड्स) : स्वअवस्थेतून अध्ययनाच्या गरजा स्पष्ट होऊ लागतात. अध्ययनासाठीच्या विविध गरजा निर्माण झाल्यामुळे त्या गरजांची नेमकी निश्चिती अध्ययनार्थीला करावी लागते. त्यानंतर या गरजांचा तो प्राधान्यक्रम ठरवितो व पुढील अध्ययनाविषयीच्या कृतीकडे वळतो. हीच निश्चिती त्याची शिकण्यामागची स्वतःची वेगळी ध्येये किंवा उद्दिष्टे निर्माण करते.
(३) ध्येय, हेतू व उद्दिष्टे यांची निश्चिती (आयडेंटिफिकेशन ऑफ गोल्स, एम्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह्ज) : ध्येय, हेतू व उद्दिष्टे या तीन संकल्पना वरवर पाहता सारख्याच वाटतात; परंतु यांत सूक्ष्म भेद आहेत; त्यांच्या व्याप्तीत फरक आहे. ध्येय हे व्यापक असते. त्यानंतर हेतू कमी व्यापक व त्यानुसार उद्दिष्टे येतात. अध्ययनार्थी आपली ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित करतो आणि त्यानुसार विविध ज्ञान व कौशल्ये आत्मसात करतो. त्यात सराव, निरीक्षण यांसारख्या कृतींचाही समावेश होतो. अर्थात यासाठी त्याला विविध स्रोतांचा शोध घेणे अपरिहार्य ठरते.
(४) स्रोतांचा शोध (सर्चिंग ऑफ सोर्सेस) : अध्ययनाच्या विविध स्रोतांमध्ये तज्ज्ञ, मार्गदर्शन, संदर्भ पुस्तके, माहिती, सुविधा, साधने, संगणक, व्याख्याने, आंतरजाल इत्यादींचा समावेश होतो. अध्ययनार्थी स्वतःच्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी या स्रोतांचा आवश्यकतेनुसार शोध घेतो आणि अध्ययनाची प्रक्रिया अखंडपणे चालू ठेवतो.
(५) कृतीचे नियोजन (प्लॅनिंग ऑफ ॲक्टिविटीज) : कृतीचे नियोजन स्रोतांच्या शोधानुसार केले जाते. कृती अनेक असू शकतात. अभ्यासाची जागा शोधणे, वेळापत्रक तयार करणे, वाचन करणे, टिप्पणे काढणे, प्रयोग करणे, निरीक्षणे करणे, माहिती मिळविणे यांसारख्या अनेक कृती अभ्यासात येतात. अध्ययनार्थीला सर्व कृतींच्या नियोजनाचा आराखडा तयार करावा लागतो. त्यानुसार स्वयंनिर्देशित अध्ययनाकडे तो पुढील वाटचाल करतो.
(६) स्वयंनिर्देशित अध्ययन (सेल्फ-डायरेक्टेड लर्निंग) : स्वयंनिर्देशित अध्ययनाची ही शेवटची पायरी आहे. ठरविलेल्या नियोजनाप्रमाणे कार्यवाही करणे, येथे अभिप्रेत आहे. यातून अध्ययनार्थीमध्ये स्वयंनिर्देशित अध्ययनार्थीची विविध वैशिष्ट्ये विकसित होतात.
स्वयंनिर्देशित अध्ययनाच्या मर्यादा :
- स्वयंनिर्देशित अध्ययन कौशल्ये शिकण्यासाठी उपयुक्त ठरत नाही.
- ज्या व्यक्तींना अध्यनासाठी बाह्य प्रबलाची आवश्यकता असते, अशांसाठी मर्यादा येतात.
- निम्नस्तरावरील प्रेरणा असणाऱ्यांसाठी हे अध्ययन उपयुक्त ठरत नाही.
- स्वयंशिस्त नसेल, तर स्वयंनिर्देशन अध्ययन शक्य होत नाही.
- स्वयंनिर्देशन अध्ययन हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे.
- स्वयंनिर्देशित अध्ययनाची कौशल्ये जर नसतील, तर व्यक्तीमध्ये स्वयंनिर्देशित अध्ययन होत नाही.
- या अध्ययनात सहाध्यायी, सहकार्यशील अध्ययन होत नाही. (८) सामाजीक अडथळे निर्माण होतात इत्यादी.
संदर्भ :
- Knowles, M., Self-Directed Learning : A Gide for Learners and Teacher’s, New York, 1975.
- Torsten, Hussen; Postlethwaite, T. Neville, The International Encyclopaedia Of Education, Oxford, 1994.
- Tough, A. M., The Adult Learning Projects : A Fresh Approach To Theory and Practice In Adult Learning, Toronto, 1979.
समीक्षक : अनंत जोशी