गारे, गोविंद मोघाजी  : (४ मार्च १९३९-२४ एप्रिल २००६). आदिवासी संस्कृती, आदिवासी साहित्य, आदिवासी कला यांचे गाढे अभ्यासक, गोविंद गारे यांनी केलेल्या संशोधनात्मक कार्यामुळे भारतीय आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील निमगिरी या गावी झाला. आई हिराबाई आणि वडिल मोघाजी या दाम्पत्यांचे हे सहावे अपत्य. या भावंडांचे पितृछत्र लहानपणीच हरपले; पण हिराबाई यांनी सहाही भावंडांचं प्राथमिक शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी यथायोग्य पार पाडली. चौथीपर्यंतचे शिक्षण निमगिरी येथे झाल्यावर पुढील शिक्षण जुन्नर येथे झाले. पुणे येथे संत ज्ञानेश्वर वसतिगृहात राहून फर्ग्युसन कॉलेजमध्ये पदवीचा अभ्यास त्यांनी केेला.१९६८ साली गोविंद गारे यांचा पुणे येथील पार्वती साबळे या होम सायन्स शिक्षित मुलीशी विवाह झाला.

अनंतराव पाटील आणि शंकरराव खरात यांचे आग्रहास्तव सह्याद्रीतील आदिवासींच्या जीवनावर ‘मावळची मुशाफिरी’ या नावाची लेखमाला सुरू करून दै. विशाल सह्याद्रीतून त्यांंच्या लेखनाला सुरूवात झाली. सह्याद्रीतील आदिवासींच्या ऐतिहासिक, सामाजिक व आर्थिक जीवनाचे समग्रचित्र या लेखमालेने वाचकांसमोर उभे केले. ही ‘मावळची मुशाफिरी’ आणि गोविंद गारे यांना भरघोस प्रसिद्धी मिळाली, वाचकांनी त्यांचे जोरदार स्वागत केेले.

पुण्यातील अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संशोधन संस्थेचे संचालक धनंजयराव गाडगीळ आणि  वि. म. दांडेकर यांचे मार्गदर्शनाखाली “TRIBALS IN AN URBAN SETTINGS : A STUDY OF MAHADEO KOLIS” या विषयावर चार-पाच वर्षे अभ्यास करून प्रबंध सादर केला आणि पीएचडी मिळवली. प्रबंधासाठी जमवलेल्या माहितीच्या आधारे आदिवासींच्या जीवनावर मराठीत पुस्तक लिहले. सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी  हे त्यांचे पहिले पुस्तक १९७४ ला प्रकाशित झाले. या पुस्तकाला १९७४-७५ या वर्षातील ‘उत्कृष्ट मराठी वाड़मयनिर्मिती’ बद्दलचे महाराष्ट्र शासनाचे समाजशास्त्र विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले. महाराष्ट्रतील आदिवासींचे प्रश्न आणि समस्या, दु:ख आणि गरीबी शब्दरूप करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. यानंतर आदिवासी समाजावर सातत्याने अभ्यास आणि लिखाण हेच त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले. आदिवासी समाजाच्या अभ्यासासाठी ब्रिटिश कौन्सिलची फेलोशिप त्यांंना मिळाली होती. अशाप्रकारे इंग्लंडला एक वर्ष अभ्यास करून पदवी संपादन करणारे गोविंद गारे प्रथम नागरिक होते.

अभ्यासू आणि संशोधक वृत्तीमुळे इग्लंडहून भारतात परतल्यानंतर त्यांची नियुक्ती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे संचालक पदी झाली. या संस्थेतील तेरा वर्षांच्या कारकिर्दीत ‘आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय, पुणे’ उभारणीचे अभिमानास्पद काम गारे यांनी पार पाडले. आदिवासी समाजाचे राहणीमान, भाषा, चालीरीती, लोकसंस्कृती यांचे जतन याठिकाणी केले आहे, देशविदेशातील पर्यटक आजही येथे आवर्जून भेट देतात. यामुळे ‘आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक’ असेही त्यांना संबोधले जाते. त्यांच्याच काळात सर्वाधिक संशोधन अहवाल तयार झाले, शासनाकडे अनेक शिफारशी केल्या गेल्या. येथील प्रत्येक क्षणाचा उपयोग आदिवासींच्या संरक्षणासाठी, हितासाठी त्यांनी केला. प्रामुख्याने आदिवासी भागात होणारी घुसखोरी थांबविण्यासाठी माहिती व बोगस जमात प्रमाणपत्र प्रतिबंध कायदा एकमताने पास करून घेतला.

उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीमुळे महाराष्ट्र शासनाने गोविंद गारे यांची भारतीय प्रशासन सेवेसाठी ( IAS ) शिफारस केली आणि १९८७ साली त्यांची भारतीय प्रशासन सेवेत निवड झाली. लातूर जिल्हा परिषदेमध्ये ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ आणि औरंगाबाद येथे ‘महानगरपालिका आयुक्त’ ही महत्वपूर्ण जबाबदारी त्यांनी सांभाळली. या सर्व कालावधीत अनेक पुस्तकांचे प्रकाशन झाले. परंतु प्रशासकीय सेवेचे बंधन असल्याने काही पुस्तकांचे प्रकाशन करणे अडचणीचे झाले. ३१ मार्च १९९७ रोजी गोविंद गारे, अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे जिल्हा या पदावरून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी अहोरात्र लिखाण केले, सहा-सहा तास त्यांचे लेखन सुरू असे, खाण्यापिण्याची सुद्धा त्यांना आठवण राहत नसे. आदिवासी समाजाच्या संशोधनासाठी ते नेहमीच आदिवासी पाड्यांवर रमलेले दिसत. आदिवासींबाबत सरकारच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले. आदिवासींचे हित साधले जाईल अशा प्रत्येक कामात गोविंद गारे यांनी स्वतःला गुंतवून घेतले होते.

गोविंद गारे हे स्वत: महादेव कोळी समाजाचे असल्याने आदिवासी समाजाचे ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब त्यांचे लेखनात उमटले आहे. सावकार आणि जमीनदांराविरूद्ध या समाजाने केलेला संघर्ष त्यांनी पाहिला होता. आदिवासींचा प्रदेश, जीवन, संस्कृती या विषयातील तज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. सुमारे ४५ वर्षे आदिवासींच्या संशोधनात व्यतीत केलेल्या गारे यांची पन्नासहून आधिक मराठी, इंग्रजी पुस्तके प्रकाशित आहेत. कविता संग्रह आणि बालसाहित्य हे साहित्य प्रकारही यांनी यशस्वीपणे हाताळले.  त्यांची लेखनशैली ही चित्रशैली असून ती आदिवासी जीवनशैली जशीच्या तशी आपल्यासमोर उभी करते.

गोविंद गारे यांची सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी, भारतीय आदिवासी : समाज आणि संस्कृती, महाराष्ट्रातील आदिवासी : संस्कृती, साहित्य आणि विकास, आदिवासी विकासाचे शिल्पकार, आदिवासी कला, सातपुड्यातील भिल्ल, आदिवासी विकासातील दिपस्तंभ, वारली चित्र – संस्कृती इत्यादी गाजलेली पुस्तके होत.

ते आदिवासी समाज हेच आपले कुटुंब आहे’ असे ते म्हणत. आदिवासी समाजासाठी गोविंद गारे यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने ‘बिरसा मुण्डा राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. किनवट येथे १९८७ साली झालेले ‘आदिवासी साहित्य संमेलन’ अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान त्यांना मिळाला. सरकारने आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय, पुणे येथे डाॅ. गोविंद गारे यांचे नावाने एक विशेष दालन सुरू करून त्यांना सन्मानित केले. संशोधन, लेखन यासाठी तब्बल १४ पारितोषिके गोविंद गारे यांना मिळाली.जुन्नर तालुक्यातील सर्वोच्च महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त ‘शिवनेरीभूषण पुरस्कार’ कै. डाॅ. गोविंद गारे यांना १९ फेब्रुवारी २०१९ रोजी मरणोत्तर बहाल केला गेला. त्यांना ‘सह्याद्रीभूषण’, ‘आदिवासीभूषण’ अशी लोकभुषणे त्यांना  मिळाली.

संदर्भ :