जयकांतन, दंडपाणी : (२४ एप्रिल १९३४ – ८ एप्रिल २०१५). डी. जयकांतन. सुप्रसिद्ध तमिळ साहित्यिक. त्यांचा जन्म कडडल्लूर (तमिळनाडू) इथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. जयकांतन यांनी १९४६ मध्ये वयाच्या १२ व्या वर्षी घर सोडले होते आणि ते काकांच्या घरी राहायला गेले होते. त्यानंतर ते तत्कालीन अविभाजित भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयात गेले. पार्टी हेच त्यांचे घर आणि शाळा बनले बनले होते. पक्षाने त्यांना प्रचारासाठी आवश्यक संसाधने निर्माण करण्याची जबाबदारी दिली होती. पोस्टर चिकटवणे, सभांचे आणि मोर्च्यांचे आयोजन करणे या सारखी कामे ते पार्टीच्या कार्यालयात राहूनच शिकले होते. जीवानंदम्, मोहन कुमार मंगलम्, बलदण्डायुतम् या सारख्या राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी त्यांना नवी दृष्टी दिली.
त्यांचे औपचारिक शिक्षण जरी झाले नसले तरी बी. सी. लिंगम् यांच्या सारख्या विद्वानांनी त्यांना अनौपचारिक रीत्या खूप शिकवले होते. त्यांनी जयकांतन यांना तमिळ भाषा शिकवली होती. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ वाचून त्यांनी इंग्रजीचे ज्ञान मिळवले होते. त्यामुळे ते जवाहरलाल नेहरू यांना इंग्रजीचे आणि इतिहासाचे गुरू मानत होते. जयकांतन यांना गांधी आणि नेहरू यांच्या राष्ट्रीय आदर्शांचे आकर्षण होते. त्यांचा असा विश्वास होता की, सुब्रम्हण्यम् भारती यांचे विचार नेहरू यांच्या विचारांच्या जवळ जाणारे आहेत आणि नेहरू यांचे विचार बुध्दाच्या जवळ जाणारे आहेत. या महान लोकांनी जयकांतन यांचा बौद्धिक दृष्टीकोन आकाराला आणला. पक्षाचे काम करीत असतानाच ते ग्रामीण लेखक म्हणून पुढे आले होते.
प्रसिद्ध कथाकार पुदुमैपित्तन आणि कु. अलगिरीस्वामी यांच्या शैलीने जयकांतन यांना प्रभावित केले होते. ते दोघेही त्या वेळेपर्यंत तमिळ साहित्यातील स्वातंत्र्योत्तर काळातील निर्विवाद साहित्यिक बनलेले होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात क्रांतिदर्शी कवी भारती यांनी राष्ट्रप्रेम आणि सामाजिक परिवर्तन हा साहित्याचा उद्देश मानून जो यज्ञ सुरु केला होता, जयकांतन यांनी या शतकाच्या उत्तरार्धात त्या कामाला जबाबदारीने पुढे घेवून जाण्याचे काम केले होते. या अनुष्ठानासाठी जयकांतन यांनी कथेला आपले अस्त्र या स्वरूपात निवडले होते. जयकांतन यांनी कथानकातील वैविध्य, समस्यांचे यथार्थ चित्रण आणि सादरीकरणाचे तंत्र यांच्या सहाय्याने कथेला एका उंचीवर नेऊन पोहोचवले होते. तेराव्या वर्षीच वामपंथी शिबिरामध्ये जयकांतन यांनी मानवाच्या उन्नतीसाठी जी आदर्श वाट निवडली होती, त्यावरून चालताना ते इतके ठाम राहिले की, प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी आपल्या ध्येयाला आणि आदर्शांना तिलांजली दिली नव्हती. ते तडजोड न करता पन्नास वर्ष आपले धर्मयुद्ध लढत राहिले होते. मानवाच्या विजयाची त्याना प्रचंड आस्था होती.
जयकांतन यांच्या ४० कादंबऱ्या, जवळजवळ २०० कथा, आणि १५ निबंधसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.या व्यतिरिक्त त्यांनी काही अनुवादही केले होते. रोमां रोला कृत महात्मा गांधींच्या चरित्राचा त्यांनी तमिळमध्ये अनुवाद केला होता. आपल्या दोन खंडांच्या आत्मचरित्रात त्यांनी राजकारण आणि कलाक्षेत्रासंबंधित आपले अनुभव कथन केलेले आहेत. त्यांच्या गैर-पारंपारिक कथांनी आणि लघुकादंबऱ्यांनी त्या काळात तमिळमध्ये खळबळ माजवली होती. त्यांनी आपल्या साहित्यातून महिलांच्या समस्या धाडसाने मांडल्या. गरीब आणि श्रीमंत यातील अंतराचे वर्णन करण्यात ते निष्णात होते.
‘नंदनवनत्ति ओरु आंडी’ (बागेत फकीर) या त्यांच्या सुरवातीच्या कथेने त्यांना लेखनाबद्दलचा आत्मविश्वास दिला होता. त्यांची ‘नान इरुक्किन ड्रेन’ (मी जिवंत आहे) सारखी कथा वाचकांच्या पसंतीस उतरली होती. ‘इरुलै तेडी’ (अंधाराच्या शोधात) सारख्या कथेने त्यावेळच्या समाजाला धक्का दिला होता. ‘नान एन्न चेयुट्टम सोल्लुंगो’ (सांगा मी काय करू?) या कथेत त्यांनी लोकांच्या वेड्यासारखे पैसे गोळा करण्याच्या प्रवृतीचे चितारण केले होते. ‘ओरु पकल नेरापैसेंजर वण्डी’ (दिवसा चालणारी पॅसेंजर ट्रेन) मध्ये एक ब्राह्मण धर्मातील स्त्री मरताना आपल्या छोट्या मुलाला एका खालच्या जातीतील म्हाताऱ्याकडे सोपवते आणि आपण मेल्यावर त्या म्हाताऱ्यानेच आपले क्रियाकर्म करावे असे सांगते. तो म्हातारा तसेच करतो. जयकांतन यांना पाळीव प्राणी आवडत नसत. पण त्यांच्या ‘निक्की’ आणि ‘अग्रहरत्तिल पूनै’ ( ब्राह्मण गल्लीतील मांजर) या सारख्या कथांतून त्यांना प्राण्यांबद्दल किती प्रेम होते ते कळते.
अग्निप्रवेशम् (१९५४) या त्यांच्या कादंबरीने तमिळ समाज विश्वात बरीच खळबळ माजविली होती. स्त्री पुरुष संबंधांच्या यथार्थ चित्रणाने हा वाद उत्पन्न झाला होता. या विवादातूनच प्रेरणा घेवून त्यांनी सिल नेरंगलिल सिल मानितरगळ ( काही क्षण,काही व्यक्ती) ही कादंबरी लिहली. गंगै एंगे पोकिराल (गंगा कुठे चाललीय?) ही कादंबरी अग्निप्रवेशम् या कादंबरीची उत्तरकथा आहे. लेखकाने आपले पात्र गंगा हिला या कादंबरीत पुर्नप्रतिष्ठित केले आणि उत्तरदायी महिलेला बनवले आहे. त्यांच्या सुंदर कांडम् या कादंबरी मधील नायिका स्वतःला आर्थिक आणि सामाजिक जीवनाच्या साखळदंडातून मुक्त करण्यासाठी संघर्ष करते.ओरु मनितन,ओरु वीडू,ओरु उलगम् ( एक माणूस,एक घर, एक जग) या कादंबरीमध्ये जयकांतन यांनी सार्वभौम मानवतावादाचा प्रचार केला आहे. त्यांच्या साहित्याचे भारतीय भाषांव्यतिरिक्त इंग्रजी, रशियन, जर्मनी, जपानी, आणि युक्रेन या सारख्या विदेशी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.
१९६४ मध्ये त्यांनी चित्रपट सृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जवळजवळ १० कादंबऱ्यावर चित्रपट बनलेले आहेत. त्यांनी अन्नैपोल ओरुवन ( तुमच्यासारखे कुणी) या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले होते. त्याला राष्ट्रपतींचे उत्कृष्टता प्रमाणपत्र मिळाले होते. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भाग घेतला होता. त्यांना अनेक सन्मान-पुरस्कार मिळाले होते. साहित्य अकादमी पुरस्कार (अग्निप्रवेशम् , १९७२), सोविएत लँड नेहरू पुरस्कार (१९७८), तमिळ विश्वविद्यालयचा ‘राज राजन’ पुरस्कार (सुंदर कांडम्, १९८६), तमिळनाडू सरकारचा उत्तम कादंबरी पुरस्कार (१९८६), भारतीय भाषा परिषद पुरस्कार (१९८८), भारतीय साहित्यातील विशेष योगदानासाठी २००२ चा ज्ञानपीठ पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.
त्यांचे ८ एप्रिल २०१५ रोजी निधन झाले.
संदर्भ :
- http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/jayakanthan.pdf
