सेल्व्हराज, डी. : (१४ जानेवारी १९३८- २० डिसेंबर २०१९). तमिळ कादंबरीकार, कथाकार व नाटककार. तमिळनाडूमधील मावदी (जिल्हा तिरुनेलवेली) येथे जन्म. त्यांच्या वडिलांचे नाव डॅनिएल व आईचे नाव गणनम् अम्माळ. केरळ-तमिळनाडू राज्याच्या सरहद्दीवरील मुन्नर या गावी चहाच्या मळ्यात ते कामगार होते. सेल्व्हराज यांनी तिरुनेलवेली येथील हिंदू महाविद्यालयातून बी.ए. (१९५९) व मद्रास विधी महाविद्यालय, मद्रास मधून कायद्याची पदवी संपादन केली. दिंडीगल येथे त्यांचे वास्तव्य असून सध्या ते वकिलीचा व्यवसाय करतात. त्यांच्या पत्नीचे नाव भारतपुत्री. त्यांना तीन मुले आहेत. तमिळनाडूतील साम्यवादी पक्षाचे नेते पी. जीवनानंद तथा ‘जीव’ (१९०७ – ६३) यांच्या कार्याचा त्यांच्यावर विशेष प्रभाव असून सध्या ते साम्यवादी पक्षाच्या कार्यात सक्रिय आहेत.

फ्रेंच साहित्यिक  गी द मोपासां तसेच इंग्रजी साहित्यिक  चार्लस डिकिन्झ व टॉमस हार्डी यांच्या साहित्यामुळे त्यांच्या लेखनास स्फूर्ती मिळाली. भारतीय साम्यवादी पक्षाच्या (सीपीआय) जनशक्ती या मासिकात त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यांच्या बहुतेक कथा व कादंबऱ्या नीती, सेम्मालर, कन्नडासन,थामाराई या नियतकालिकांमध्ये तसेच टी. एम्. चिदंबर रघुनाथन् यांनी चालविलेल्या शांती या वाङ्मयीन नियतकालिकातून क्रमश: प्रसिद्ध होत.

मलरम् सरगम् (१९६७, इं.शी. ‘फ्लॉवर ॲण्ड विदर्ड लीफ’), थीनीर (१९७३, इं.शी. ‘टी’), मूलनाथम् (१९७७, इं.शी. ‘कॅपिटल’), अग्निकंदन (१९८०, इं.शी. ‘फायर पिट’), थोल (२०१०, इं.शी. ‘स्किन’) या त्यांच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या. कातडी कमावणाऱ्या कामगारांच्या जीवनावर आधारलेली थोल ही त्यांची संशोधनपर कादंबरी. शेतकरी, चहाच्या मळ्यातील कामगार, त्यांचे जीवन, त्यांच्या व्यथा यांचे मनोवेधक चित्रण त्यांनी मुख्यत: आपल्या कादंबऱ्यांतून केले. सेल्व्हराज यांच्या नाटकांमध्ये युगसंगमम् (१९८८), पाट्टु मुदियम् मुन्नेई या दर्जेदार नाटकांचा समावेश होतो. दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये युगसंगमम् नाटक समाविष्ट आहे. पाट्टु मुदियम् मुन्नेई या नाटकाचे तमिळनाडूमधील रंगभूमीवर टी. के. बालचंदर या नाट्यसंस्थेच्या वतीने अनेक प्रयोग झाले. पाट्टु कोट्टई कल्याण सुंदरम् यांनी या नाटकासाठी काही गीते लिहिली आहेत. जीव (जीवनानंदनम् यांचे चरित्र) सामीचिदंबरनार (काही तमिळ साहित्यिकांची व्यक्तिचित्रे), प्रदोषम् (२००७) या त्यांच्या अन्य उल्लेखनीय साहित्यकृती.

सेल्व्हराज यांच्या पुढील तीन साहित्यकृतींस साहित्य अकादेमी पुरस्कार लाभले : जीव (२००५) सामीचिदंबरनार (२००६), थोल (२०१२). याशिवाय थोल या कादंबरीस तमिळनाडू शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही प्राप्त झाला (२०१०). तमिळनाडू येथील प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचे ते कार्यकारी सदस्य होते.

मदुरै येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : Datta, Amresh (Edi.), Encyclopaedia of Indian Literature, Sahitya Akademi, New Dehli.