गुलाबो सपेरा : (१९७४). आंतरराष्ट्रीय कीर्तीची कालबेलिया नर्तिका. गुलाबो सपेरा ही आंतरराष्ट्रीय कीर्तीची कालबेलिया नर्तिका म्हणून सर्वपरिचित आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी गुलाबोचा जन्म अजमेर येथे झाला. ती आपल्या आई – वडिलांचे सातवे अपत्य आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी जन्म झाल्यामुळे गुलाबोचे नाव धन्वंतरी ठेवण्यात आले. जन्मताच धन्वंतरी खूप आजारी पडली. तिला मृत ठरवून पुरण्यात आले होते. भैरूनाथ यांची अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्यावर अपार श्रद्धा होती. तिच्या वडिलांनी तिला ख्वाजा साहेबच्या दर्ग्यावर नेले. ख्वाजाच्या दरग्याच्या दारात तिला वडिलांनी ठेवले. एक दीड तासात धन्वंतरीच्या डोक्यावर एक गुलाबाचे फुल पडले धन्वंतरी श्वास घेवू लागली. तेव्हापासून भैरूनाथने धन्वंतरीचे नाव गुलाब ठेवले पुढे गुलाबपासून ती गुलाबो नावाने ओळखली जावू लागली. अशी आख्यायिका तिच्याबाबत सांगितली जाते. सात-आठ महिन्याची असतानाच ती सापांना पाहून नाचण्याचा प्रयत्न करू लागली.

१९८१ साली पुष्कर मेळ्यात रेतीच्या ढिगाऱ्यावर उभी राहून ती अन्य स्त्री कलावंतांसोबत नृत्य करीत होती. नृत्य करून चार पैसे मिळावेत अशी तिची त्यामागे भावना होती. गुलाबो नाचत असताना तेथे राजस्थानच्या पर्यटन विभागाचे अधिकारी हिम्मत सिंह आणि तृप्ती पांडे छायाचित्रे काढण्याच्या उद्देशाने तिथे पोहोचले. गुलाबोचा कालबेलिया नृत्यविन्यास पाहून ते थक्क झाले. जणू काही या मुलीच्या शरीरात हाडे नाहीत इतक्या लवचिक व गतिशील पद्धतीने ती नृत्य करीत असल्याचा जणू साक्षात्कार त्यांना झाला. एखाद्या सर्पासारखे चपळाईने ही मुलगी कशी काय नृत्य करते असा त्यांना प्रश्न पडला. संध्याकाळी पुष्कर मेळ्याच्या मुख्य मंचावर नृत्य करण्यासाठी हिम्मत सिंह यांनी गुलाबोला निमंत्रण दिले. तेव्हा प्रथम पायात घुंगरू बांधून तिने जाहीर नृत्याचा कार्यक्रम केला. तेव्हापासून गुलाबो मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकाता अशा मोठ्या शहरातून कार्यक्रम करू लागली. १९८५ साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांस्कृतिक सल्लागार, समन्वयक राजीव सेठी यांनी दिल्लीत गुलाबोच्या कालबेलिया नृत्याचा कार्यक्रम पहिला, ते खूप प्रभावित झाले.

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे आयोजित झालेल्या भारत महोत्सवात कार्यक्रम सादर करण्याची संधी सेठी यांनी गुलाबोला दिली. अमेरिका, लंडन, हॉलंड, बेल्जीयम, रशिया, डेन्मार्क, फ्रांस, न्यूझीलंड, सिंगापूर, चिली, दक्षिण आफ्रिका, सुदान, इजिप्त अशा एकूण १६५ देशात गुलाबोनी कार्यक्रम सादर केले. सन २०१६ साली गुलाबोला तत्कालीन राष्ट्रपती महामहिम प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अजमेर या आपल्या जन्मस्थानी कालबेलिया – सपेरा विद्यालय स्थापन करण्याचा प्रकल्प गुलाबोने हाती घेतला आहे. अमूर्त सांस्कृतिक वारसा या युनेस्कोच्या योजनेअंतर्गत कालबेलिया नृत्याला आंतरराष्ट्रीय मान्यता प्रपात झाली आहे. त्यात गुलाबोचे मोठे योगदान आहे. कालबेलिया जातीचे लोक कबिल्यामध्ये राहतात. कबिल्याचा वयोवृद्ध व्यक्ती त्यांचा नेता असतो. विवाहाच्या वेळी पुरुष कलावंत पुंगी वाजवितात, ढोलक वाजवितात आणि स्त्रिया पायात घुंगरू बांधून नाचतात. सपेरा समाजाचे पारंपरिक नृत्य म्हणून कालबेलिया नृत्य ओळखले जाते. राजस्थानात लोकप्रिय असणाऱ्या या नृत्याला आंतराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम गुलाबोने केले.

संदर्भ : क्षेत्र संशोधन

अनुवादक : प्रकाश खांडगे