भाकरे, निरंजन : (१०-०६-१९६५ – २३-०४-२०२१). महाराष्ट्रातील प्रसिद्ध भारूडकार. सर्व संतांची भारूडे गायन, अभ्यासपूर्ण निरूपण आणि बहुआयामी अभिनय कलेतून ते सादर करीत असत. त्यांचा जन्म औरंगाबाद येथे झाला. त्यांचे मूळ गाव रहिमाबाद हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आहे. निरंजन भाकरे सहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. निरंजन आणि मंगल हे बहीण भाई पितृछत्र हरपल्याने इतरांच्या शेतात मोलमजुरी करू लागले. त्यांनी १० वी पर्यंतचे शिक्षण आव्हाना या शेजारच्या गावी घेतले. ८ मार्च १९८५ रोजी त्यांचे लग्न झाले. औरंगाबादमध्ये एका औषधी कंपनीत ते काम करू लागले. पुढे याच शहरात एका टेलरकडे ते शिवणकाम करू लागले. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे त्यांनी शिवणकामाचा व्यवसाय थाटला. त्या गावात त्यांनी व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीचे काम सुरू केले. निरंजन भाकरे यांचे वडील संत तुकडोजी महाराजांची भजने म्हणत हाच वारसा निरंजन भाकरे यांच्याकडे आला. १९९२ साली एका भजन स्पर्धेत त्यांना ढाल बक्षीस मिळाली तेव्हापासून त्यांनी भजन, भारूड कलेला वाहून घेतले. भाकरे कलापथकात हार्मोनियम वाजवित, बँड पथकात कॅशिओ वाजवित. औरंगाबादला लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक अशोक परांजपे यांची भेट भाकरे यांनी घेतली. त्यांनी भारूड कलेविषयी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. १९९८ साली इंडियन नॅशनल थिएटर लोक प्रयोज्य कला संशोधन केंद्रातर्फे भाकरे यांचा भारूडाचा कार्यक्रम मुंबईत अशोक परांजपे यांनी आयोजित केला. त्याचवेळी मुंबई दूरदर्शनवर ही कार्यक्रम प्रसारित झाला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर भाकरे यांच्या भारूड कलेला लोकप्रियता प्राप्त झाली. वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, नाबार्ड,पाणी फौंडेशन, बायप मित्र संस्था अशा संस्थांचे जनजागृतीपर कार्यक्रम भारूडाच्या माध्यमातून भाकरे करू लागले. आकाशवाणी, दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केले. महाराष्ट्र शासनाचे विविध कला महोत्सव, लोकोत्सव, ग्रामोत्सव असे कार्यक्रम त्यांनी केले. शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसार ते भारूडातील निरूपणाच्या माध्यमातून करीत त्यासाठी सातत्याने सादरीकरणात संत वचनांची पेरणी करीत असत. दलित वस्ती सुधार प्रबोधन, पाणलोट व्यवस्थापन, कुष्ठरोग निर्मूलन, अपंगांसाठी प्रबोधन, बालमजुरी निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला सबलीकरण, स्त्रीभ्रूणहत्या अशा अनेक विषयांवर ते भारूडाद्वारे प्रबोधन घडवित असत. अनेक अखिल भारतीय पातळीवरील साहित्य संमेलनात आणि कार्यक्रमात भाकरे यांनी भारूडे सादर केली. ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमात तर बुरगुंडा हे भारूड सादर करीत असत. मुंबई दूरदर्शनवरील धिना धीन धा तसेच अन्य दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून त्यांनी भारूडे सादर केली. बुरगुंडा, शंकराचा नंदी, वासुदेव,जोशी अशी भाकरे यांनी सादर केलेली भारूडे मराठी लोकमानसात विशेष लोकप्रिय होती.

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत ते निमंत्रित व्याख्याने म्हणून पदव्युत्तर पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारूडाचे सैद्धांतिक ज्ञान तसेच प्रत्यक्ष सादरीकरणाचे शिक्षण देत असत. प्रकाश खांडगे,गणेश चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली भाकरे यांचे भारुड अध्यापन सन २००४ पासून मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत सुरू होते. भाकरे आणि त्यांची पत्नी शांता यांना तीन मुली आणि एक मुलगा अशी अपत्ये आहेत. निरंजन भाकरे आणि त्यांच्या पत्नीने देहदानाचा संकल्प सोडला होता. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार भाकरे यांना प्राप्त झाला होता.

औरंगाबाद येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : क्षेत्र संशोधन