बनसोडे, मंगला : (१२ सप्टेंबर १९५१). ढोलकी फडाच्या तमाशातील कलावती. तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या कन्या. ढोलकी फडाच्या तमाशात गायिका, नर्तिका, अभिनेत्री अशा विविध भूमिका त्यांनी आजवर साकार केल्या आहेत. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील तमाशाची पंढरी समजल्या जाणाऱ्या नारायणगाव येथे झाला. वयाच्या सातव्या वर्षी आपली आई विठाबाई नारायणगावकर यांच्या ढोलकी फडाच्या तमाशात त्यांनी कलेचा प्रारंभ केला. त्यांचे शिक्षण चौथी उत्तीर्ण असे आहे. मंगला बनसोडे यांनी विठाबाई सोबत प्रथम नृत्यास सुरुवात केली.

कालांतराने मुजरा, गौळण, लावण्या, फार्स आणि वगनाट्यात त्या काम करू लागल्या. त्या आपल्या मातोश्रीनाच गुरुस्थानी मानतात. विठाबाईंकडूनच त्यांनी वगनाट्यातील विविध भूमिकांच्या अभिनयाचे धडे घेतले. मंगल दिनकर पवार असे मंगला बनसोडे यांचे लग्नापूर्वीचे नाव आहे. १९६६ साली त्यांचे रामचंद्र लक्ष्मण बनसोडे, करवडी ता . कराड जिल्हा सातारा यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यांचे पती रामचंद्र बनसोडे हे विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या ढोलकी फडाच्या तमाशात वगनाट्य लेखक तसेच नट म्हणून काम करीत असत. १९८०-८१ सालात मंगला बनसोडे यांनी आईच्या तमाशा ऐवजी गणपत व्ही.माने चिंचणीकर यांच्या सोबत स्वतंत्र तमाशा संचाची स्थापना केली. कालांतराने मंगला बनसोडे पुन्हा आपल्या मातोश्री यांच्यासोबत काम करू लागल्या. माय – लेकींचा स्वतंत्र तमाशा फड सुरू झाला. १९८३ – ८४ साली पुन्हा मंगला बनसोडे यांनी स्वतंत्र तमाशा फड सुरू केला.

मंगला बनसोडे यांच्या माहेरच्या घरी ढोलकी फडाच्या तमाशाची मोठी परंपरा होती. मंगला बनसोडे यांचे पणजोबा नारायण खुडे नारायणगावकर यांचा ढोलकी तमाशाचा फड होता. त्यानंतर त्यांचे आजोबा भाऊ बापू नारायणगावकर यांचा ढोलकी फडाचा तमाशा होता. ते पट्ठे बापूरावांचे शिष्य होते. ते कलगी संप्रदायाचे तमाशा कलावंत होते. भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास भाऊ बापूंना लाभला होता. त्यानंतर मंगला बनसोडे यांच्या मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांचा ढोलकी फडाचा तमाशा प्रसिद्धीस आला. मंगला बनसोडे यांच्या भगिनी संध्या माने, भारती सोनावणे, विद्या वाव्हळ, मालती इनामदार या ढोलकी फडाच्या तमाशात विठाबाईबरोबर काम करीत असत. विजय मारुती सावंत, कैलास मारुती सावंत, राजू मारुती सावंत हे मंगला बनसोडे यांचे बंधू देखील ढोलकी तमाशाच्या परंपरेत मंगला बनसोडे या आपल्या भगिनी सोबत सहभागी झाले. मंगला बनसोडे यांचे पुत्र अनिल रामचंद्र बनसोडे आणि नितीन रामचंद्र बनसोडे हे आपल्या मातोश्रींसोबत तमाशात कार्यरत आहेत. मंगला बनसोडे यांची मुलगी लक्ष्मी विवाहित आहे. त्यांची नातं डॉ. माधुरी कांबळे या प्रसूतीशास्त्रातील सर्जन आहेत. नातू श्लोक नितीन बनसोडे हा इंजिनियर तर दुसरा नातू ओंकार अनिल बनसोडे हा बी. सी. ए. आहे. कलेच्या क्षेत्रात अतिशय खडतर प्रवास करून मंगला बनसोडे यांनी एक चतुरस्त्र कलावंत म्हणून तमाशा क्षेत्रात लौकिक संपादन केला.

वगनाट्यातील नायिका, खलनायिका, विनोदी नायिका अशा विविधांगी भूमिका सादर करून एक अभिनेत्री म्हणून तसेच गायिका म्हणून त्यांनी विलक्षण लोकप्रियता प्राप्त केली आहे. कृष्णाकाठचा फरारी  या वगनाट्यात किरण ही सुनेची भूमिका, मुंबईची केळेवाली  मधील मोहना ही मुलीची भूमिका, रक्तात न्हाली कुह्राड  या वगनाट्यात शेवंता आचारणीची भूमिका, विष्णू बाळा पाटील  या वगनाट्यात शेवंताची विनोदी भूमिका, बापू वीरू वाटेगावकर  या वगनाट्यातील विनोदी भूमिका, जन्मठेप कुंकवाची  या वगनाट्यात सासूची भूमिका, ‘ कारगिलच्या युद्ध ज्वाला  या वगनाट्यामधील कॅप्टनची भूमिका अशा विविध भूमिका त्यांनी साकार केल्या आहेत .

मंगला बनसोडे यांनी अखिल भारतीय लोककला संमेलनात कराड येथे तमाशा सादर केला होता. सन २००१ रोजी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय पुरस्कार, सन २०१० चा शासनाचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायगावकर लोककला जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच सन २०१७ मध्ये भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते वयोश्रेष्ठ राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीवर लोककला समितीचे सदस्यत्व त्यांनी भूषविले आहे.

संदर्भ : क्षेत्र संशोधन