चौगुले, छगन : (१९५७ – २० मे २०२०). महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलावंत. लोकगीते व भक्ती गीते गाणारे म्हणून त्यांना ओळखले जायचे. लोककलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता खड्या आणि बहारदार गाण्याने ते रसिकांच्या कायम ओठावर राहिले. सोलापूर (महाराष्ट्र) जिल्ह्यातील नातेपुते कारुंडे हे त्यांचे गाव. रामचंद्र चौगुले यांच्या घराण्यात छगनराव यांचा जन्म झाला. रामचंद्र चौगुले नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह भिक्षुकीवर अवलंबून होता. कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाच, कधी दुष्काळ तर कधी महामारीने सारे कुटुंब व्यथित होऊन जायचे. परंतु पोटाची भूक भागविण्यासाठी म्हणून कुटुंबाचा काफिला घेऊन रामचंद्र चौगुले मुंबईत दाखल व्हायचे. पत्नी, मुलगा यांना सोबत घेऊन ते अंधेरी (मुंबई) येथील भाईदास मिलच्या परिसरात झोपडी टाकून खंडोबा, यल्लमा, अंबाबाई, आराध्याची गाणे गाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यातच वडिलांच्या मागे राहत कुरळे केस, सरळ नाक,कृष्णवर्णीय रंगाचे, आवाजात नैसर्गिक किनारा लाभलेले छगनराव यांच्यावर वडिलांच्या गुणांची छाप पडली. अतिचंचल स्वभावामुळे अगदी अल्पावधीत छगनरावांनी गोंधळयाची गायकी आत्मसात केली व त्या काळात ते अफाट प्रसिद्धीस आले. त्यातच त्यांना जेष्ठ लावणी कलावंत रोशनबाई सातारकर, छबाताई जेजुरीकर, प्रल्हाद शिंदे या कलावंतांचा सहवास व मार्गदर्शन मिळाले आणि पुढे ते लोककलेच्या क्षेत्रात कायम रुजले.
सन १९८० काळ टेपरेकॉर्डर आणि कॅसेट्सचा होता. विंग्ज कंपनी, कुणाल, टी सिरिज, सरगम या टेपरेकॉर्डर कंपन्यांनी चढाओढीने एकापेक्षा एक दर्जेदार अशा कॅसेट त्यावेळी बाजारात आणल्या. त्याच काळात कथा चांगुनाची, बहीण भावाची कथा, कथा श्रावण बाळाची, आईचे काळीज, अंबाबाई कथा, कथा तुळजापूरच्या भवानीची, कथा देवतारी बाळूमामा यासारखे कार्यक्रम ते दमदार ऊर्जा ठेऊन सादर करायचे. आणि याच काळात या सगळ्या ध्वनिमुद्रिका महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह शहरी भागातही कानाकोपऱ्यात खूप गाजल्या. त्यांची कुलदेवतांची भक्तिगीते आणि लोकगीते विशेष गाजली. आवाजातील दमदारपणा, सादरीकरणाची विविधांगी पद्धत आणि सततच्या नव्या धाटणीमुळे हा कलावंत जनमानसात आवाजाच्या रूपाने प्रसिद्ध होत गेला. ते संबळ,दिमडी आणि पेटी हे वाद्य अतिशय छान वाजवायचे. लोककलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता या कलाकाराची कला सादर करण्याची पद्धत अफलातून होती. त्यांचा पिंड जागरण गोंधळाचा असतानाही त्यांनी तो जपत स्वतःतील विविधांगी केलेला व्याप्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच महाराष्ट्राच्या मातीत या लोककलावंताविषयी एक हाडाचा कलावंत म्हणून प्रतिमा राहिली.
‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली…’ या गाण्याने हा कलावंत रसिक वर्गाला सर्वस्पर्शून गेला. अनेक कार्यक्रमांतून छगनराव हे गाणे हमखास सादर करायचे तेव्हा ताल, लय, सूर यात रममाण होऊन रसिकांनाही डोलायला लावायचे. राजा हरिश्चंद्र , चिल्या बाळ, कथा भीमरायाची, कथा बुद्धाची, अनेक संतांची कथा, गार डोंगराची हवा.., तुळजापूरच्या घाटात, देव मल्हारी रुसून काल घोड्यावर बसला.., अशा अनेक दर्जेदार गाण्यातून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी लोककलेची सेवा करीत शहरी व ग्रामीण भागातील श्रोत्यांची मने कायम जपली.
त्यांनी लोककलेचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये ते विद्यार्थ्यांना जागरण – गोंधळाचे मार्गदर्शन करीत असत. २०१८ मधील लावणी गौरव, बालगंधर्व पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील लोककला आणि लोकसंस्कृतीसाठी प्रचार – प्रसारासाठी छगनरावांनी दिलेले योगदान निश्चितपणे एक एक सांस्कृतिक ठेवा म्हणून कायम राहणार आहे.
संदर्भ : क्षेत्र संशोधन