वर्मा, सिद्धेश्वर : (३ नोव्हेंबर १८८७ – १७ ऑगस्ट १९८५). भारतीय भाषावैज्ञानिक. त्यांचा जन्म रावळपिंडीमध्ये (पाकिस्तान) झाल्यामुळे त्यांचे लहानपणीच नाव पिंडीदास होते. त्यांचे वडील रामदास नंदा व आई जमनादेवी. त्यांनी रावळपिंडी येथे उर्दूमधून शालेय शिक्षण आणि नंतर बी. ए.पर्यंतचे शिक्षण घेतल्यावर, ते पंजाब विश्वविद्यालय, लाहोर येथून १९११ मध्ये इतिहास विषय घेऊन एम्.ए. झाले. १९१३ मध्ये ते ‘शास्त्री’ झाले आणि नंतर १९२७ मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठाची डी.लिट्. पदवी मिळविली. १९०६ मध्ये केशवदेव शास्त्रींकडून त्यांनी संस्कृतचे ज्ञान संपादन केले व १९२४ मध्ये लंडन येथे राल्फ लिली टर्नर व डॅनियल जोन्स, तसेच पॅरिसमध्ये झ्यूल ब्लॉक यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनिविद्येचा अभ्यास केला. तमिळ व भोट या भाषांचा अभ्यास त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी केला. त्यांनी १९१५ मध्ये हिंदू हायस्कूल, गुजराणवाला (पाकिस्तान) येथे काही काळ अध्यापन केले. नंतर त्यांनी १९४३ पर्यंत प्रिन्स ऑफ वेल्स कॉलेज (सध्याचे गांधी मेमोरियल कॉलेज), जम्मू येथे अध्यापन केले. पुढे १९४३ व १९८५ या काळात विश्वेश्वरानंद वैदिक शोध संस्थान, होशियारपूर येथे विनावेतन सल्लागार म्हणून काम केले. १९५२ पासून १९६० पर्यंत केंद्रीय हिंदी निदेशालय, दिल्ली येथे बृहद् पारिभाषिक शब्दसंग्रहाचे मूळ संपादक, तसेच १९६० ते १९७२ पर्यंत चंडीगढमधील शब्दब्रह्म परिषद व संमनन मंडळाचे ते संस्थापक होते. हैदराबादहून निघालेल्या उर्दू इन्सायक्लोपीडियाचे ते एक मानद संपादक होते.
त्यांनी आपल्या आयुष्यातील जवळजवळ साठ वर्षे शब्दब्रह्माची उपासना केली. वैदिक, संस्कृत व आधुनिक भारतीय भाषांच्या बरोबरच प्राचीन आणि अर्वाचीन यूरोपीय भाषांचे ज्ञानही संपादन केले. शिक्षा व प्रातिशाख्य ग्रंथांचा व वेदांची भाषा व भाषाशैली यांचा त्यांनी विशेष सखोल अभ्यास केला. आपल्या स्वाध्यायात ते व्याकरणकार पाणिनी, नाट्यशास्त्रकार भरत आणि आयुर्वेदकार चरक यांना मुनित्रय मानत. या तिघांविषयी त्यांनी शोधनिबंध लिहिलेले आहेत. आपल्या अद्भुत श्रवणशक्तीच्या साहाय्याने ते सूक्ष्म ध्वनिपरीक्षण करीत. जम्मूमध्ये अध्यापन करीत असता त्यांनी उन्हाळ्याच्या सुटीत काश्मीरच्या आणि हिमाचल प्रदेशातील दऱ्याखोऱ्यांतून हिंडून तेथील वेगवेगळ्या २७ बोलींचा भाषावैज्ञानिक अभ्यास केला. अखंड विद्यार्थी असल्याच्या भावनेने त्यांनी आधुनिक संरचनात्मक भाषाविश्लेषण अवगत करून घेतले.
त्यांचा क्रिटिकल स्टडीज इन द फोनेटिक ऑब्झर्व्हेशन्स ऑफ इंडियन ग्रॅमॅरियन्स हा डॉक्टरेटचा शोधप्रबंध १९२७ मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटी, लंडन येथून प्रकाशित झाला व १९६१ मध्ये दिल्लीहून त्याचे पुनर्मुद्रणही झाले. त्याचा हिंदी अनुवाद देवीदत्त शर्मा यांची प्राचीन भारतीय व्याकरणोंके ध्वन्यात्मक विचारोंका विवेचनात्मक अध्ययन या नावाने केला (१९७३). या ग्रंथात वैदिक शिक्षा आणि प्रातिशाख्य ग्रंथ यांची चिकित्सा आली आहे. त्यांचे अन्य प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे : द एटिमॉलॉजीज ऑफ यास्क (१९५३) जी. ए. ग्रीअर्सन्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया : अ समरी-३ खंड (१९७२, १९७३, १९७६) वर्णलोप या विषयावरचा पाणिनी अँड एलिझन (१९७८) डिक्शनरी ऑफ ट्वेंटी सेव्हन नॉर्थ-वेस्टर्न हिमालयन डायलेक्ट्स ह्या तीन खंडांतील ग्रंथापैकी अ ग्लॉसरी ऑफ द खासी-अनॉर्थ-वेस्टर्न हिमालयन डायलेक्ट ऑफ जम्मू अँड काश्मीर (१९८९) हा प्रकाशित असून अ कंपॅरेटिव्ह ग्लॉसरी ऑफ डायलेक्ट्स इन द कांग्रा डिस्ट्रिक्ट ऑफ हिमाचल प्रदेश (अप्रकाशित) तसेच अन्य खंडही प्रकाशनाधीन आहेत. ऋग्वेद प्रातिशाख्यावर आधारित शिक्षा लिटरेचर टर्मिनॉलॉजीज हा ग्रंथही अद्याप अप्रकाशित आहे. त्यांचे सु. २०० शोधलेख, ग्रंथभूमिका व समीक्षालेख हे देश-विदेशांतून प्रकाशित होणाऱ्या संस्कृत, हिंदी, पंजाबी, डोग्री, हिमाचली व इंग्रजी पत्रिकांतून प्रकाशित झाले आहेत. त्यांनी ज्या प्रत्येक भाषेचे आणि बोलीचे चिंतन केले, तिच्या शब्दसंग्रहाचा धांडोळा घेतला, त्याबद्दलच्या जवळजवळ २०० टिपण-संचयिका पंजाब विश्वविद्यालयांतर्गत होशियारपूरमधील ‘विश्वेश्वरानंद पुस्तकालया’त त्यांच्या अन्य ग्रंथांबरोबर डॉ. सिद्धेश्वर शर्मा संग्रहमध्ये संग्रहीत आहेत.
त्यांना अनेक मानसन्मान लाभले : पद्मभूषण (१९५७), काश्मीर शासनातर्फे ‘खिलअत’ हे महावस्त्र (१९६४), राष्ट्रपतींद्वारा पौर्वात्य विद्याभूषित प्रशस्तिपत्र (१९६७). १९६७ मध्येच पंजाब विश्वविद्यालय, पतियाळातर्फे व १९८२ मध्ये जम्मू विश्वविद्यालयातर्फे सन्माननीय डी. लिट्. पदव्या त्यांना प्रदान करण्यात आल्या.
त्यांच्या षष्ट्यब्दिपूर्तीनिमित्त सिद्ध भारती – द रोझरी ऑफ इंडॉलॉजी – दोन भाग (१९५०) पंचाहत्तरीनिमित्त डॉ. सिद्धेश्वर वर्मा व्हॉल्यूम (ट्रॅन्झॅक्शन्स ऑफ दि लिंग्विस्टिक सर्कल ऑफ दिल्ली, १९५९ – ६०), ऐंशीपूर्तिनिमित्त डॉ. सिद्धेश्वर वर्मा स्पेशल नंबर (विश्वेश्वरानंद इंडॉलॉजिकल जर्नल, १९६७), डॉ. सिद्धेश्वर वर्मा अभिनंदन अंक (डोग्री रिसर्च इन्स्टिट्यूट, जम्मू, १९६७), नव्वदीनिमित्त डॉ. सिद्धेश्वर वर्मा फिलिसिटेशन नंबर (१९७८), पंचाण्णवीनिमित्त डॉ. सिद्धेश्वर वर्मा अभिनंदन ग्रंथ (डोग्री रिसर्च इन्स्टिट्यूट, जम्मू, १९८३) हे ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. या गौरवग्रंथांतून त्यांच्या लेखनसंपदेची सूची आणि समीक्षा उपलब्ध आहे.
शेवटची बरीच वर्षे त्यांचे वास्तव्य दिल्लीलाच कन्येजवळ होते. नवी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.