भगवानलाल इंद्रजी : (७ नोव्हेंबर १८३९ – १६ मार्च १८८८) प्रख्यात भारतविद्याविशारद, प्राचीन भारतीय इतिहास संशोधनामध्ये ज्या संशोधकांनी बहुमोल कामगिरी केली, त्यांत पंडित भगवानलाल इंद्रजी यांचा क्रम फार वरचा लागतो. भगवानलाल यांचा जन्म जुनागढ (गुजरात) येथे झाला. तत्कालीन रीतीनुसार वेद, पुराणे, धर्मशास्त्र यांचा अभ्यास पाठशाळेत त्यांनी पुरा केला. वडिलांजवळ संस्कृत आणि आयुर्वेद याचां सखोल अभ्यास केला. जुनागढला इंग्रजी शाळा नसल्यामुळे त्यांना इंग्रजी शिकता आले नाही. प्राचीन इतिहास आणि नाणी या विषयांवर विचार मांडताना त्यांना ही उणीव प्रकर्षाने जाणवे.

भगवानलाल इतिहास संशोधनाकडे वळण्यास एक प्रसंग कारणी भूत ठरला. जुनागढ संस्थानचे राजकीय प्रतिनिधी कर्नल लाँग यांनी लिपिशास्त्रज्ञ जेम्स प्रिन्सेप (१७९९-१८४०) यांना जुनागढ येथील अशोकाच्या आणि रूद्रदामनाच्या लेखांचे ठसे पुरविले होते. प्रिन्सेप यानी आपल्या नियतकालिकात – एप्रिल, १८३८- रूद्रदामनाच्या लेखाचा ठसा छपला होता. १८५४ च्या सुमारास लँग यांनी रूद्रदामनाच्या लेखाचा ठसा जुनागढचे प्रतिष्ठित नागरिक मणिशंकर जटाशंकर यांचेकडे दिला होता. तो ठसा भगवानलाल यांच्या पाहण्यात आला. त्या ठश्यावरील अक्षरे त्यांनी नकलून घेतली, रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई, रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल, रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन या संस्थांच्या नियतकालिकांवरून लिपिशास्त्राचा आणि इतिहास संशोधन पद्धतीचा त्यांनी कसून अभ्यात केला. या मिळालेल्या तुटपुंज्या ज्ञानावर अहोरात्र परिश्रम करून त्यांनी रूद्रदामनाचा लेख वाचला. या लेखातील राजाचे नाव ‘रूद्रदामन’ आणि तलावाचे नाव ‘सुदर्शंन’ असल्याचे त्यांनीच प्रथम दाखवून दिले.

भगवानलाल याच्यां काळात भारतीय इतिहास संशोधन क्षेत्रामध्ये मुंबईस  बाळशास्त्री जांभेकर (१८१२-४६) व  भाऊ दाजी लाड (१८२१-७४) ही कतृत्ववान मंडळी होती. भाऊ दाजींचा प्राचीन भारतीय इतिहास हा विशेष संशोधनाचा आणि आवडीचा विषय होता. त्यांनी भगवानलाल यांना मुंबईस बोलावून घेतले व नोकरीस ठेवले. भगवानलाल १८६२ मध्ये मुंबईस आले. त्यानंतर त्यांनी नासिक, कार्ले, भाजे, जुन्नरजवळील नाणेघाट या ठिकाणाच्या शिलालेखांचे नवे ठसे घेऊन त्यांचा अभ्यास व वाचन केले. अजिंठ्याच्या लेखांचेही त्यांनी जेम्स बर्जेस (१८३२-१९१६) यांच्याबरोबर वाचन केले.

भाऊ दाजी यांच्या प्रयत्नांमुळे तत्कालीन जुनागढ संस्थानातर्फे तसेच ब्रिटिश सरकारतर्फे भगवानलाल यांना आर्थिक मदत मिळाली. या आर्थिक मदतीमुळे ते अफगाणिस्तान, बलुचिस्तान, नेपाळ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या ठिकाणची मंदिरे, प्राचीन अवशेष, नाणी, इस्तलिखिते इत्यादींचा अभ्यास करु लागले. या भ्रंमतीमुळे त्यांच्या जवळ प्राचीन नाणी, मूर्ती, शिलालेख यांचा बराच मोठा संग्रह झाला आणि त्यांचा संशोधनास व्यापकता व खोली प्राप्त झाली. जुन्या शिलालेखांचे त्यांचे वाचन अचूक असल्यामुळे त्यांनी काढलेले त्याबाबतचे निष्कर्ष भक्कम पुराव्यावर आधारित असत. प्राचीन भारतीय इतिहासामध्ये भगवानलाल यांचा नाण्यांचा विशेषतः क्षत्रप राजांच्या नाण्यांचा सखोल अभ्यास होता. रॉयल एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष न्यूटन यांना भगवानलाल यांनी नाग्यांवरील नहपान, रुद्रदामन्, स्कंदगुप्त ही नावे वाचून दाखविली. प्राचीन शिलालेखांतील अंक म्हणजे ब्राह्मी लिपीतील अक्षरे आहेत, हे त्यांनीच सर्वप्रथम प्रतिपादन केले.

जे.जी व्यूलर, बर्जेस, कॉडरिंग्टन, कँपबेलप्रभृत्ती इतिहास संधोधक भगवानलाल यांना विलक्षण मान देत. भगवानलाल यांनी नाणेघाट शिलालेखातील अंक, सातवाहन राजांची नाणी, शिलाहार, त्रैकूटक व राष्ट्रकूट राजांचे ताम्रपट यांवरील लिखाण जर्नल ऑफ द बाँबे ब्रँच आँफ द रॉयल एशियाटिक सोसायटीत प्रसिद्ध केले. बाँबे गॅझेटिअरमधील पुरातत्वविभागामधील लेणी व शिलालेख यांवरील सर्व मजकूर भगवानलाल यांनी लिहिलेला रुद्रदामनाचा लेख आहे. अंक, नेपाळमधील हस्तलिखिते, गुजरातमधील लेख यांवरील त्यांचे लिखाण इंडियन अँटिकेरी या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. शिलालेख व नाणी यांवरील भगवानलाल यांचे जवळजवळ चाळीस लेख इंडियन अँटिकेरी व मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम द केव्ह टेंपल्स आँफ वेस्टर्न इंडिया वुइथ डिस्क्रिप्टिव्ह नोट्स (१८८१) हा जेम्स वर्जेस यांच्यासमवेत लिहिलेला त्यांचा बहुमोल ग्रंथ होय. भगवालनाल यांच्या संशोधनकार्यामुळे रॉंयल एशियाटिक सोसायटीच्या मुबंई शाखेने त्यांना मानद सभासद करुन घेतले. १८८२ मध्ये मुबंई सरकारने त्यांना मुबंई विद्यापीठाचे अधिछात्र नेमले. हेग येथील रॉयल इन्स्टिट्यूट आँफ फायलॉलॉजी, जिऑग्राफी अँड एथ्रॉलॉजी आँफ नेदरलॅँड्स अँड इंडिया या संस्थेने १८८३ मध्ये त्यांना मानद सभासदत्व बहाल केले.रॉयल एशियाटिक सोसायटी आँफ ग्रेट ब्रिटन या संस्थेनेही त्यांची मानद सभासद म्हणून नियुक्ती केली.

भगवानलाल यांनी क्षत्रप वंशीय राजांच्या नाण्यांचा स्वतःचा संग्रह, मथुरा येथील सिंहस्तंभ आणि अनेक शिल्पे ब्रिटिश संग्रहालयास भेट दिली. तसेच आपला हस्तलिखितांचा संग्रह मुबंईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीला दिला.भगवानलाल यांच्या पत्नीचे यांच्या आधीच निधन झाले होते आणि त्यांना पुत्रसंतानही नव्हते. त्यामुळे त्यांनी जिवंतपणीच स्वतःचे श्राद्ध केले होते. भगवानलाल भाऊ दाजी यांना इतके मानीत, की त्यांनी आपली कागदपत्रे रॉयल एशियाटिक सोसायटीच्या वाचनालयात भाऊ दाजी यांच्या कागदपत्राजवळच ठेवावीत असे आपल्या मृत्यूपत्रात नमूद करुन ठेवले.

या थोर संशोधकाचे जलोदराच्या विकाराने मुंबई येथे निधन झाले.

संदर्भ :

  • JournalJournal of Bombay Branch Royal Asiatic Society, :Vol. XVII, Page 20-25, Bombay, 1889.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.