गुस्ताव्ह डालेन : (३० नोव्हेंबर १८६९ – ९ डिसेंबर १९३७) एका प्रथितयश जागतिक दर्जाच्या उद्योगाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि उद्योजक म्हणून ज्यांनी आपले आयुष्य व्यतीत केले असे नोबेल पुरस्कार विजेते स्विडीश अभियंता संशोधक म्हणजे गुस्ताव्ह डालेन. पश्चिम स्वीडनमधील स्टेनस्टॉर्प या लहानशा खेड्यात गुस्ताव्ह यांचा जन्म झाला. आपल्या मुलांनी भरपूर अणि विविध विषय शिकावेत म्हणून त्यांची आई लोविजा या फार आग्रही होत्या. गुस्ताव्ह यांच्यावर आईचा प्रभाव इतका होता की त्यांनी आईचे पूर्वाश्रमीचे डालेन हेच नाव स्वीकारले. सुरुवातीला गुस्ताव्ह यांनी घरचाच शेतीव्यवसाय सांभाळला आणि त्याचा विस्तार करून बियाणे विक्री, दूधविक्री सुरू केली. तसे पाहिले तर गुस्ताव्ह हे अजिबात हुशार विद्यार्थी नव्हते. त्यांचे शिक्षक त्यांना बिनकामाचा मुलगा म्हणत. याचे कारण म्हणजे गुस्ताव्ह हे सतत इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा, नवीन शोधून काढायचा प्रयत्न करीत असत. सकाळी लवकर उठायचा कंटाळा असणाऱ्या या मुलाने एक असे उपकरण बनविले जे अंथरुणातूनच पडल्या पडल्या कॉफी बनवेल आणि दिवा लावेल. त्या उपकरणाला त्यांनी बेड रोलर असे नाव दिले होते. यामुळे गुस्ताव्ह यांचे नाव सर्वदूर पसरले. पुढे गुस्ताव्ह यांनी दुधातील स्निग्धांश मोजण्याचे एक उपकरण तयार केले. ते त्यांनी स्टॉकहोम येथे जाऊन त्यावेळच्या अतिशय नावाजलेल्या गुस्ताव्ह द लावल या स्वीडीश संशोधकाला दाखविले. गुस्ताव्हच्या या संशोधनामुळे लावल हे अतिशय प्रभावित झाले आणि त्यांनी स्वतंत्रपणे काम करणाऱ्या या धडपड्या मुलाला पुढे शिकण्यासाठी प्रेरित केले. गुस्ताव्हने तांत्रिक शिक्षण घ्यावे असे त्यांनी सुचविले.

या सूचनेप्रमाणे गुस्ताव्ह यांनी गोथेनबुर्ग येथील चामर्स युनिव्हार्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. येथेच त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून पीएच्.डी. सुद्धा मिळविली. येथून बाहेर पडल्यावर आणखी एक वर्ष त्यांनी झ्युरीच येथील स्वीस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (ईटीएच) या संस्थेत पुढील अभ्यास केला. स्वीडनला परतल्यावर गुस्ताव्ह यांनी स्टॉकहोम येथील एका कारखान्यात आरेखक (designer) म्हणून काम करायला सुरुवात केली.

याच वेळेस गुस्ताव्ह यांनी आपल्या हेन्रिक सेल्सिंग या श्रीमंत मित्राबरोबर डालेन-सेल्सिंग या नावाने एक उद्योग सुरू केला. हे करत असतानाच सेवेन्स्का कार्बाईड अँड ॲसिटिलीन या कारखान्यासाठी काम करायला सुरुवात केली. हाच उद्योग पुढे ‘एजीए’ या नावाने जगप्रसिद्ध झाला. येथे ॲसिटिलीन या वायूची निर्मिती आणि त्याचा मुख्यत्वे प्रकाशस्रोत म्हणून उपयोग यावर काम चालत असे. येथेच गुस्ताव्ह यांनी ॲसिटिलीन वायू वापरून वेल्डिंग करण्याची प्रक्रिया सर्वप्रथम दाखविली.

ॲसिटिलीन वायूचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या गॅस ॲक्युम्युलेटर कंपनी या उद्योगात गुस्ताव्ह यांची मुख्य अभियंता म्हणून नेमणूक झाली. पुढे एजीए या उद्योगाची स्थापना झाल्यावर कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांच्या कार्यकाळात प्रत्येक वर्षी अनेक नवनवीन उत्पादनांची भर घालत हा उद्योग सर्वच दृष्टीने बहरला आणि जगभरात मान्यता पावला.

या कंपनीत गुस्ताव्ह यांनी दीपस्तंभासंबंधी महत्त्वपूर्ण शोध लावले. दीपस्तंभासाठी ॲसिटिलीन म्हणजेच इथेन या ज्वलनशील वायूचा वापर करून डालेन लाईट (Dalén Light) या अतिशय प्रखर प्रकाशस्रोताची निर्मिती केली. त्यांनी बनविलेला असा पहिला प्रकाशस्रोत स्टॉकहोम जवळच्या दीपस्तंभात बसविला गेला तो त्याचे विद्युतीकरण होईपर्यंत सत्तर वर्षे विनातक्रार चालू होता. यामध्ये महागडा ॲसिटिलीन वायू जरूर तेव्हढाच वापरला जायचा. त्यासाठी एका सौर व्हाल्वची निर्मितीही गुस्ताव्ह यांनी केली. या व्हाल्व्हमुळे संध्याकाळी अंधार पडू लागल्यावरच प्रकाशस्रोत सुरू होत असे आणि सकाळी पुरेसा उजेड पडल्यावर बंद होत असे. याचबरोबर त्यांनी क्षणदीपन (flashing) तंत्रज्ञान वापरून वायूचा वापर दहा टक्क्यांपर्यंत कमी केला. यालाच डालेन क्षणदीपक (Dalén Flasher) असे म्हणतात. असे विश्वासार्ह, कमी ऊर्जेवर आणि मानवी देखरेखीविना चालणारे दीपस्तंभ आणि धोक्याची सूचना देणाऱ्या तरंगत्या खुणा (buoys) यामुळे समुद्री प्रवास सुरक्षित झाला. हे सर्व नवशोध करत असताना गुस्ताव्ह यांनी एका सच्छिद्र पदार्थाची निर्मिती केली. त्याचा उपयोग करून ॲसिटिलीन या ज्वलनशील आणि काहीशा स्फोटक वायूला शोषून घेऊन सुरक्षित साठवण करणे आणि त्याची वाहतूक करणे शक्य झाले. हा सच्छिद्र पदार्थ अगमासन (Agamassan- the AGA compound) या नावाने ओळखला जातो.

या शोधकार्यात आरेखनापासून चाचण्या घेण्यापर्यंत सर्व प्रक्रियेमध्ये गुस्ताव्ह स्वत: जातीने पुढाकार घेत असत. अशाच एका चाचणीच्या वेळी १९१२ साली ॲसिटिलीन वायूचा स्फोट होऊन दुर्दैवाने गुस्ताव्ह यांना अंधत्व आले. योगायोग असा की त्याच वर्षी त्यांना त्यांच्या दीपस्तंभांसंबंधीच्या कामासाठी भौतिकीचा सुप्रसिद्ध नोबेल पुरस्कार जाहीर झाला. दुर्दैवाने या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी गुस्ताव्ह उपस्थित राहू शकले नाहीत. कॅरोलीन इन्स्टिट्यूट येथे नेत्रतज्ञ असलेल्या अल्बिन डालेन या त्यांच्या भावाने त्यांच्यावतीने पुरस्कार स्वीकारला. वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात घालून शास्त्रीय प्रयोग करण्याच्या गुस्ताव्ह यांच्या जिद्दीचे या समारंभात खूप कौतुक झालेच आणि या बाबतीत त्यांची तुलना प्रत्यक्ष आल्फ्रेड नोबेल यांच्याशी केली गेली. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे नोबेल पुरस्काराची काही रक्कम गुस्ताव्ह यांनी एजीए उद्योगाच्या कामगारांमध्ये वाटली. उर्वरीत रक्कम त्यांनी जेथे शिक्षण घेतले त्या चामर्स युनिव्हार्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीला शिष्यवृत्ती देण्यासाठी देणगी म्हणून दिली.

अंधत्व येऊनही गुस्ताव्ह यांनी एजीए या उद्योगाची धुरा अगदी मृत्यू येईपर्यंत सांभाळली. नुसतीच सांभाळली असे नव्हे तर एजीए कुकर या नावाने एक ओतीव लोखंडाचे अन्न शिजवू शकेल असे पाचकपात्र (Cooker) बनविले. विशेष म्हणजे या पात्राच्या सर्व चाचण्या त्यांच्या स्वत:च्या स्वयंपाकघरात घेतल्या गेल्या.

गुस्ताव्ह डालेन यांना रॉयल स्वीडीश ॲकॅडमीचे सदस्यत्व बहाल केले गेले. तसेच लुंड विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट दिली. गुस्ताव्ह यांच्या नावाने सुमारे शंभर शोधांचे स्वामित्व हक्क नोंदले आहेत.

अशा या धाडसी संशोधकाचा स्टॉकहोम जवळच्या लिडिंगो येथे मृत्यू झाला.

उद्योगातील आपले सहकारी आणि कामगार यांच्याबद्दल आस्था आणि प्रेम असणाऱ्या गुस्ताव्ह यांच्यावर एजीए उद्योगाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘व्हिक्टरी इन द डार्कनेस’ या नावाने एक चित्रपट काढला गेला. तसेच स्टेनस्टॉर्प येथे त्यांचे जीवन आणि कार्य दाखविणारे डालेन संग्रहालय उभे राहीले आहे.

संदर्भ :

समीक्षक : हेमचंद्र प्रधान