मोबाइल परिचालन प्रणाली. विशेषत: सेल्युलर फोन आणि टॅबलेट संगणक यांकरिता ही परिचालन प्रणाली (Mobile Operating System) वापरण्यात येते. अमेरिकन टेक्नॉलॉजी कंपनी अँड्रॉइड इनकॉ. या कंपनीचा एक प्रकल्प म्हणून २००३ सालापासून यांची सुरवात झाली. अंकीय कॅमेऱ्याची परिचालन प्रणाली विकसित करण्याकरिता तिला तयार करण्यात आले होते, परंतु प्रकल्पाचा हेतू बदलवून २००४ साली स्मार्टफोनकरिता तिला तयार करण्यात आले. त्यानंतर अमेरिकेतील सर्च इंजिन कंपनी असणारी गुगल इनकॉ. यांनी २००५ साली अँड्रॉइड इनकॉ.ला विकत घेतले. गुगलमध्ये अँड्रॉइड परिचालन प्रणालीवर काम करणाऱ्या संघाने वैयक्तिक संगणकाकरिता मुक्त स्रोत परिचालन प्रणाली असणारी लिनक्सप्रमाणे आधारित प्रकल्प तयार करण्याचा निर्णय केला.
गुगलने ५ नोव्हेंबर, २००७ साली इंटेल कॉर्पोरेशन, मोटोरोल इंक., एनव्हीआयडीए कॉर्पोरेशन, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स इन्कॉर्पोरेटेड, एलजी इलेक्ट्रॉनिक्स इन्क., सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, स्प्रिंट नेक्स्टेल कॉर्पोरेशन आणि टी-मोबाइल (डच टेलिकॉम) यांसारख्या डझनभर तंत्रज्ञान आणि मोबाइल टेलिफोन कंपन्यांचा एक समूह असलेला ओपन हँडसेट अलायन्सची स्थापना करण्याची घोषणा केली. तृतीय-पक्ष अनुप्रयोगांना समर्थन देणारी एक मुक्त स्रोत परिचालन प्रणाली म्हणून अँड्रॉइडला विकसित आणि प्रोत्साहन देण्यासाठी हा समूह तयार करण्यात आला.
एक-स्पर्श गुगल शोध, गुगल डॉक (उदा. वर्ड एडिटर, स्प्रेडशीट्स) आणि गुगल अर्थ (उपग्रह मॅपिंग सॉफ्टवेअर) यांसारख्या वैशिष्ट्यांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी अँड्रॉइड आधारित उपकरणे वायरलेस नेटवर्क वापरतात.
नवीन परिचालन प्रणालीचे वैशिष्ट्य दर्शविणारा पहिला सेल्युलर टेलिफोन टी- मोबाइल जी1 (T-Mobile G1) याला 22, ऑक्टोबर, 2008 मध्ये बाजारात आणले गेले. 2012 साली ॲपलच्या आयओएस परिचालन प्रणालीला मागे टाकत अँड्रॉइड मोबाइल उपकरणांसाठी सर्वात लोकप्रिय परिचालन प्रणाली बनली. जवळजवळ 75 टक्के मोबाइल उपकरणे अँड्रॉइड या परिचालन प्रणालीवर चालतात.
पहा : मोबाइल परिचालन प्रणाली.
कळीचे शब्द : # मोबाइलटेलिफोन #परिचालनप्रणाली #लिनक्स
संदर्भ :
भाषांतर : स्नेहा खोब्रागडे
समीक्षक : रत्नदीप देशमुख