ॲस्परजिलस ही हवेमध्ये सहज सापडणारी एक कवकाची प्रजाती आहे. ॲस्परजिलस ही प्रजाती कवकाच्या ॲस्कोमायकोटा (Ascomycota) या गटामध्ये मोडते. ॲस्परजिलस या प्रजातीमध्ये आजवर एकूण २५० प्रकार ज्ञात झालेले आहेत व आणखी शोधकार्य जगभरात निरंतर सुरू आहे. ॲस्परजिलस या कवकाच्या ॲस्परजिलस नायजर (Aspergillus niger), ॲस्परजिलस फ्युमिगेट्स (A. fumigatus), ॲस्परजिलस फ्लाव्हस (A. flavus) या अतिशय सामान्यपणे आढळणाऱ्या प्रजाती आहेत.
![](https://marathivishwakosh.org/wp-content/uploads/2021/06/ॲस्परजिलस-300x217.jpg?x51018)
ॲस्परजिलस व विविध आजार : ॲस्परजिलस हे कवक रोगप्रतिकारशक्ती क्षीण असणाऱ्या व्यक्तींमध्ये दम्याचे आजार उत्पन्न करण्याबद्दल कुप्रसिद्ध आहे. वातावरणामधील ॲस्परजिलसचे जननकण (Spores) उत्तम रोगप्रतिकारकशक्ती असणाऱ्या व्यक्तींस कोणतीही बाधा पोहोचवत नाहीत, मात्र क्षीण रोगप्रतिकारकशक्ती असणाऱ्या रुग्णांमध्ये श्वसनविकार उत्पन्न करतात. कचरा क्षेपणभूमीच्या आजूबाजूच्या भागातील हवेमध्ये सापडणारे ॲस्परजिलसचे जननकण व त्यांच्यामुळे होणारे श्वसन विकार हा अभ्यासाचा विषय आहे.
ॲस्परजिलस व त्याचे उपयोग : ॲस्परजिलस या कवकाच्या ॲस्परजिलस नायगर या प्रजातीचा उपयोग सायट्रिक अम्ल निर्मितीसाठी १९१७ मध्ये प्रथम जेम्स क्युरी या संशोधकाने केला. यानंतर औद्योगिक जैवतंत्रज्ञानामध्ये (Industrial biotechnology) या कवकाचा वापर विविध कारणांसाठी केला गेला. १९७० च्या सुमारास ॲस्परजिलसपासून ग्लुकोमायलेज (Glucoamylase) हे विकर मिळविण्यात यश आले. या विकराचा उपयोग अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. हे विकर स्टार्चचे रूपांतर ग्लुकोज या शर्करेमध्ये करते. ॲस्परजिलस नायगरपासून मिळणारी प्रथिन विघटक (Protease) विकरे सांप्रत मोठ्या प्रमाणावर अन्नप्रक्रिया, औषधे इत्यादी व्यवसाय क्षेत्रात महत्त्वाचे काम करीत आहेत.
रंगद्रव्यांचे निर्मूलन : ॲस्परजिलस हे कवक रंगद्रव्यांचे (Dyes) निर्मूलन करण्यासाठीही उपयुक्त आहे. अझो रंगद्रव्यांचे निर्मूलन करण्यासाठी ॲस्परजिलस प्रजाती बऱ्याच अभ्यासकांनी आजवर वापरलेली आहे.
संदर्भ :
- Asses, N., Ayed, L., Hkiri, N., Hamdi, M. Congo red decolorization and detoxification by Aspergillus niger: Removal mechanisms and dye degradation pathway, BioMed Research International, https://doi.org/10.1155/2018/3049686, 2018.
- Sabrien A. O. Decolorization of Different Textile Dyes by Isolated Aspergillus niger. Journal of Environmental Science and Technology, 9: 149-156,2016.
समीक्षक : शरद चाफेकर