लेले, उमा : (२८ ऑगस्ट १९४१ – ) उमा लेले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे झाला. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. केले व पुढे अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठातून एम.एस. केले. त्यानंतर त्यांनी कोर्नेल विद्यापीठातून कृषी अर्थशास्त्र विषयात पीएच्.डी. केली. तेथून पीएच्.डी. करणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. सध्या त्या याच विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक आहेत.
जागतिक बँक, अनेक अमेरिकन व युरोपियन विद्यापीठे आणि आंतरराष्ट्रीय संस्था यातील ऑपरेशन्स, संशोधन, धोरण विश्लेषण आणि मूल्यमापन या विषयातील पाच दशकांचा अनुभव त्यांच्या पदरी आहे. कोर्नेल विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक आणि फ्लॉरिडा विद्यापीठात पदव्युत्तर संशोधन प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास संचालक म्हणून त्या कार्यरत होत्या. जागतिक बँकेत त्यांनी ३० वर्षे अनेक विभागात संशोधन आणि व्यवस्थापनाची विविध पदे भूषवली आहेत.जागतिक बँकेच्या ऑपरेशन्स आणि मूल्यांकन विभागाच्या वरिष्ठ सल्लागार पदावर असताना जागतिक बँकेचे वन धोरण त्यांनी ठरवले. कन्सल्टेटिव्ह ग्रूप ऑन इंटरनॅशनल ॲग्रीकल्चर रिसर्च (सीजीआयए) आणि जागतिक कार्यक्रम हाताळण्याचा जागतिक बँकेचा दृष्टीकोन यांचे मूल्यांकन लेले यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडले. जागतिक बँकेतील ऑपरेशन्स मूल्यांकन विभागाच्या त्या वरिष्ठ सल्लागार पदावर असताना निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर आता त्या विकास अर्थशास्त्र अभ्यासक्रम या विषयावर काम करीत आहेत.
सासाकावा-२००० कार्यक्रम, जागतिक अन्न पुरस्कार आणि मॅकआर्थर फाउंडेशन यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सल्लागार तज्ञ आणि पुरस्कार पॅनल्सवर त्यांनी काम केले आहे. फ्लॉरिडा विद्यापीठात असताना ग्लोबल रिसर्च ऑन द एंव्हायर्नमेंटल अँड ॲग्रीकल्चर नेक्सस (GREAN) या आंतरराष्ट्रीय टास्कफोर्सच्या त्या सह-अध्यक्ष होत्या. त्यांनी ग्लोबल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह, द कार्टर सेंटरचे संचालकपद भूषवले. त्या चायना काउन्सिल ऑन द एंव्हायर्नमेंटल अँड डेव्हलपमेंट ऑन फॉरेस्ट अँड ग्रासलँड इंटरनॅशनल टास्कफोर्सच्या सह-अध्यक्ष होत्या. अन्न व कृषी संघटनेच्या बाह्य मूल्यांकनासाठी नेमलेल्या पॅनवर त्यांनी काम केले. ग्लोबल कॉन्फरन्स ऑन ॲग्रीकल्चर रिसर्च फॉर डेव्हलपमेंट (जीसीएआरडी) या विषयावरील पहिला पेपर लिहिणाऱ्या गटाचे नेतृत्त्व लेले यांनी केले आहे. त्यामुळे त्या विषयाचा आराखडा तयार झाला.
अनेक मान्यवर शास्त्रीय संस्थांनी त्यांना आपले सदस्य करून घेतले. त्या ग्लोबल वॉटर पार्टनरशिप, डॉ. गर्टी वॉटर फॉर फूड इन्स्टिट्यूट (डीब्ल्यूएफआय) आणि नेब्रास्का वॉटर सेंटर, नेब्रास्का विद्यापीठाच्या वरिष्ठ सल्लागार आहेत. त्या कॉर्नेल विद्यापीठाच्या अध्यक्षीय सल्लागार परिषदेच्या, युनेस्कोच्या अन्न संघटनेच्या बाह्य मूल्यमापन पॅनलच्या व आंतरराष्ट्रीय वनीकरण संशोधन केंद्राच्या संचालक मंडळाच्या सदस्य राहिल्या आहेत. त्या कन्सल्टेटिव्ह ग्रूप ऑन इंटरनॅशनल ॲग्रीकल्चर रिसर्च (सीजीआयएआर)या संस्थेच्या संचालक मंडळावर होत्या.तसेच तेथील तांत्रिक सल्लागार समितीच्याही त्या सल्लागार होत्या. अन्न सुरक्षेचा मुद्दा जागतिक स्तरावर अती महत्त्वाचा असल्याने अन्न सुरक्षेच्या शाश्वत प्रणाली शोधण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत एक समिती नेमली, त्याच्याही त्या सदस्य होत्या. त्या अमेरिकन ॲग्रीकल्चर अँड अप्लाइड इकनॉमिक असोसिएशन ॲग्रीकल्चर इकनॉमिस्ट व आफ्रिकन असोसिएशन ऑफ ॲग्रीकल्चर इकनॉमिस्ट इत्यादी संस्थांच्या फेलो आहेत. त्या भारतातील अकॅडेमी ऑफ ॲग्रीकल्चर सायन्सेसच्यादेखील फेलो आहेत.
लेले यांना त्यांच्या कारकीर्दीत अमेरिकन असोसिएशन ऑफ ॲग्रीकल्चरल सायन्टिस्टतर्फे आउटस्टन्डींग सायन्टिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन पुरस्कार, बी.पी.पाल मेमोरियल पुरस्कार, भारतीय कृषी अर्थशास्त्र पुरस्कार, एम.एस.स्वामिनाथन पुरस्कार, क्लिफ्टन वॉर्टन पुरस्कार, भारतीय कृषी अर्थशास्त्र संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले. दक्षिण आफ्रिकेतील स्टेलेनबॉश विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली. कृषी अर्थशास्त्र आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील आयुष्यभराच्या योगदानाबद्दल इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रीकल्चरल इकनॉमिक्सने त्यांना पुरस्कार प्रदान केला.
विद्यापीठात अध्ययनाचे काम करीत असताना अनेक पदवीधर विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे. त्यांनी कृषी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संशोधनाचा पुरस्कार इंटरनॅशनल ॲग्रीकल्चर इकनॉमिक असोसिएशनमध्ये विकसनशील देशातील विद्यार्थ्यांसाठी उमा लेले मेंटरशीप प्रोग्रॅमची स्थापना केली.
त्यांच्या लेखन साहित्यातील अठरा पुस्तकांपैकी ‘मॅनेजिंग ग्लोबल रिसोर्सेस-चॅलेंजेस ऑफ फॉरेस्ट कॉंझर्वेशन अँड डेव्हलपमेंट’; ‘फूड ग्रेन मार्केटिंग इन इंडिया-प्रायव्हेट परफॉर्मन्स अँड पब्लिक पॉलिसी’; ‘डिझाईन ऑफ रुरल डेव्हलपमेंट-लेसन्स फ्रॉम आफ्रिका’; ‘ट्रान्झिशन इन डेव्हलपमेंट-फ्रॉम एड टू कॅपिटल फ्लोज’; ‘इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी इन ॲग्रीकल्चर’; ‘द वर्ल्ड बँक्स रोल इन असिस्टिंग बॉरोअर अँड मेंबर कंट्रीज’ ही पुस्तके उल्लेखनीय आहेत. कृषी उत्पादकता वाढ व संरचनात्मक परिवर्तन, आर्थिक विकासात वने आणि पाणी यांच्या बदलत्या भूमिका याबाबत त्यांनी शोधनिबंध सादर केले. सध्या त्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स-फूड फॉर ऑल आणि अँड द ट्रान्सफार्मेशन ऑफ ॲग्रीकल्चर या पुस्तकावर काम करीत आहेत.
लेले यांची इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲग्रीकल्चर इकनॉमिस्ट या संस्थेच्या अध्यक्षपदी तीन वर्षासाठी निवड झाली. दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इकनॉमिक ग्रोथ या संस्थेच्या त्या सल्लागार असून सहयोगी संशोधक म्हणून संलग्न आहेत. ऑगस्ट, २०२१ मध्ये दिल्लीत होणाऱ्या कृषी अर्थतज्ञांची पुढील त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय (इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ॲग्रीकल्चर इकनॉमिस्ट) आयोजित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
संदर्भ :
- http://ceres2030.org/uma-lele-biography
- http://umalele.org/index.php/about-uma
- http://naasindia.org/detail.php?id=268
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.