मुखर्जी, अदिती : (१२ नोव्हेंबर १९७६). अदिती मुखर्जी यांचा जन्म कोलकता येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण नवी दिल्ली तर  उच्च माध्यमिक शिक्षण कोलकता येथे झाले. कोलकात्यातील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी मिळवली.

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतून भूगोल विषयातील पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर त्यांनी आय.आय.टी., मुंबई येथे प्लानिंग अँड डेव्हलपमेंट विषयातील एम.फिल. व प्रतिष्ठित केंब्रिज युनिव्हार्सिटीतून भूगोल विषयात पीएच्.डी. पूर्ण केले. ‘पश्चिम बंगालमधील भूजल व बाजारपेठेची राजकीय अर्थव्यवस्था’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.

अदिती यांना जलसंपदा व्यवस्थापनाच्या संस्था आणि नीती धोरणांवर काम करण्याचा २० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी हैदराबादच्या पतनचेरू येथील इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमीॲरिड ट्रॉपिक्स (इक्रिसॅट) येथे वैज्ञानिक अधिकारी म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली.

अदिती यांनी आंतरराष्ट्रीय जल व्यवस्थापन संस्था (आय.डब्ल्यू.एम.आय.) टाटा कार्यालय, गुजराथमधील आणंद आणि आय.डब्ल्यू.एम.आय., कोलंबो, श्रीलंका, आय.डब्ल्यू.एम.आय., नवी दिल्ली येथे अनुक्रमे संशोधन सल्लागार, संशोधक आणि पोस्ट-डॉक्टोरियल फेलो व जेष्ठ संशोधक सामाजिक वैज्ञानिक अशा पदांवर काम केले. तसेच त्यांनी  इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट नेपाळ येथे ‘वाटर अँड एअर’ थिम गटाचे नेतृत्व केले.

अदिती मुखर्जी जानेवारी २०१९ पासून आंतरराष्ट्रीय जल व्यवस्थापन संस्था (IWMI- International Water Management Institute) येथे प्रमुख सल्लागार या पदावर पुन्हा रुजू झाल्या. सध्या त्या नवी दिल्ली येथील कार्यालयात प्रधान संशोधक आहेत. या संस्थेत ‘क्लाइमेट चेंज अ‍ॅडॉप्टेशन अ‍ॅण्ड रेझिलिएन्स’ संशोधक, हवामान बदल आणि अनुकूलन, या संदर्भात पाणी आणि पाण्याशी संबंधित जीवनमानावर हवामान बदलाचे परिणाम व जोखीम यावर संशोधन केले जाते. अदिती मुखर्जी यांनी पूर्व-भारतातील विपुल पाणी असलेल्या ४००० पेक्षा अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रखरतेने क्षेत्रिय सर्वेक्षण केले. पाणी उपलब्ध असूनही की पाणी वापराच्या विशिष्ट नियमामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना पिकासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून त्यांनी पाणी वापरकर्त्याच्या समस्यांची नोंदणी केली.

अदिती यांनी त्यांच्या संशोधनाचा अहवाल नीती आयोगाच्या प्रमुखांसमोर ठेवला. अदिती यांच्या  संशोधनामुळे पूर्व-भारतातील पाणी धोरणात दोन प्रमुख बदल केले गेले – पहिला, सिंचन पंप चालविण्यासाठी आवश्यक परवान्याची अट काढून टाकण्यात आली आणि दुसरा, पंपासाठी विद्युतीकरणाचा खर्च कमी करण्यात आला. परिणामी, कोणालाही सिंचनासाठी भूजल सहज मिळणे शक्य झाले. उत्पादन सुधारले दारिद्र्य रेषेबाहेर येण्याची क्षमता वाढली. मुखर्जी यांनी दाखवून दिले की जुन्या धोरणांनी भूजल वाहिन्यांवर लावलेली बंदी शेतकऱ्यांच्या प्रगतीस बाधक होती आणि विश्वसनीय, स्वस्त व वेळेवर सिंचन उपलब्धता हे दारिद्र्य निर्मूलनाचे अत्यंत प्रभावी साधन बनविता येते.

अदिती नेब्रास्का विद्यापीठातील ‘रॉबर्ट बी डॉघर्टी वाटर फॉर फूड ग्लोबल इन्स्टिट्यूट’च्या ग्लोबल फेलो आहेत. या व्यतिरिक्त त्या शिव नादर विद्यापीठाच्या जलविज्ञान आणि धोरणविद्या शाखेत, ‘दक्षिण आशियातील भूजल व्यवस्थापन आणि राजकारण’  या विषयाच्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत.

तीन पुस्तकांच्या लिखाणासह, त्यांच्या विषयातील इतरांच्या पुस्तकासाठी १६ प्रकरणे व अहवाल लेखनासह शोधपत्रिकांमधून ५० हून अधिक शोधनिबंध त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. त्या ‘क्लायमेट अँड डेव्हलपमेंट जर्नल’च्या सहयोगी संपादक आणि ‘वाटर सिक्युरिटी  जर्नल’च्या संपादकीय मंडळाच्या  सदस्या आहेत.

त्यांनी अमेरिका, इंग्लंड, म्यानमार, ब्राझिल, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, स्वीडन, जर्मनी इत्यादी देशांतील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन शोधनिबंध सादर केले. त्यांनी २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या ‘ऊर्जा धोरणाचा भूजल व्यवस्थापनावरील परिणाम’ या शोधनिबंधास ‘नैसर्गिक संसाधनांवरील संशोधनासाठीचे पदक’ या श्रेणीतील पहिला पुरस्कार मिळाला .

मुखर्जी यांना २०१२ सालचा ‘नॉर्मन बोरलॉग अवार्ड फॉर फील्ड रिसर्च अ‍ॅण्ड ॲप्लिकेशन’ हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय तरुण वैज्ञानिक आहेत. हा पुरस्कार ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या, तरुण वैज्ञानिकास आंतरराष्ट्रीय कृषी आणि अन्न उत्पादनातील, विज्ञानाधारित, अपवादात्मक उपलब्धीसाठी रॉकफेलर फाउंडेशनतर्फे दिला जातो.

संदर्भ:

समीक्षक: मोहन मद्वाण्णा