नागबारी : नागपुजेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भात गायले जाणारे लोकगीत. मानवी क्षमतेला आवाहन देणाऱ्या, मानवाच्या अस्तित्वावर नकारात्मक वा सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या निसर्गभूत घटकांना दैवतस्वरूप मानून त्यांची पूजा करण्याचे लोकमानस आदिम काळापासून आढळते. त्यामध्ये कृषीसंस्कृतीत जगणाऱ्या लोकांसाठी नाग हा त्याच्या प्रभावामुळे दैवतरूप असल्याचे आढळतो. सर्पदोष दूर होते ही बाब अधोरेखित केलेले नागपुजेचे उल्लेख प्राचीन साहित्यात आढळतात. तैतरीय संहितेत अश्वमेधप्रसंगी नागांचे पूजन करावे असे वर्णन आहे. शतपथ ब्राह्मणात नागमाता कद्रू हिला पृथ्वीचे प्रतिक मानून पूजनीय ठरविले आहे. संस्कृत साहित्य असो वा प्राकृत साहित्य असो, याशिवाय बौद्ध आणि जैन साहित्यातही नागपुजेची वर्णने आली आहेत. यातील वर्णनाप्रमाणे श्रावण महिन्यातील पंचमीला म्हणजेच नागपंचमीला अनंत, वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते. नागाचे हे दैवतस्वरूप प्रमाण मानून भारतातीलच नव्हे तर जगभरातील अनेक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नागाची पूजा आराधना केली जाते.
नागाच्या विषाच्या भीतीपोटी त्याला पुजनियत्व प्राप्त झाले असले तरीही नागाला शेतकरी क्षेत्रपाळ देव मानतात. त्याला धनरक्षक देवता मानले जाते. शिवाय त्याला अनेक संस्कृतीत कुळपुरुष म्हणून मान्यता आहे. त्यामुळे नागपंचमी आणि इतर प्रसंगी नागाची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते. कुठे वारूळ हे सापाचे निवास समजून वारुळाची पूजा केली जाते, कुठे जिवंत सापाला दुध पाजून पूजा केली जाते. दक्षिण भारतात नागमंडल हा नृत्यप्रकार असून त्याद्वारा नागाची आराधना केली जाते. शिवाय अनेक प्रांतांमध्ये नागगीते गाऊनही पूजा केली जाते. त्यामध्येच विदर्भातील पश्चिम विभागात गायल्या जाणाऱ्या नागबाऱ्या प्रसिद्ध आहेत.
नागबाऱ्या यांना ठावागीते, नागगीते, बाऱ्याची भजने असेही संबोधिले जाते. बारी म्हणजे खेप वा पुढची संधी. नागबारीचे गायन काही जोड्यांमध्ये होत असते. प्रत्येक जोडीला एक एक संधी म्हणजेच बारी समजून हे लोकगीत गायचे असते त्यामुळे त्याला नागबारी म्हटले जाते असा एक समज आहे. मात्र नागबाऱ्या ह्या शब्दाला सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भही आहेत. बारी हा समाज महाराष्ट्रातील विळ्याची पाने पिकविणारा समाज आहे. इतर पिकांच्या तुलनेत चंदन आणि विळ्याच्या नागिलीच्या वेलीवर सापांचा वावर जास्त असतो असा समज वा अनुभव या समाजात आहे. पानमळ्यात काम करणाऱ्या या बारी लोकांना सर्पदंशाची जास्त भीती राहते. त्यामुळे या समाजात नागमंत्री म्हणून काही व्यक्ती काम करतात. हे नागमंत्री अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने नागाचे भजन गातात. या गायनाने सर्पदंश झाल्यास त्याचा प्रभाव दूर होतो असा समज आहे. त्यामुळेच नाग आणि बारी हा समाज यातून ह्या भजनाला नागबारी असे नाव प्राप्त झाल्याचे अभ्यासक सांगतात.
नागबारी हे लोकगीत सादर करताना आठ ते दहा लोकगायक आणि ग्रामीण भागातच उपलब्ध असणारी वा तयार करता येवू शकणारी वैशिष्ट्यपूर्ण लोकवाद्ये यांचा समावेश असतो. या लोकगायकांना अरबाळे (अरबाडी) वा नागमंत्री असे संबोधिले जाते. नाग किंवा विंचू यांचा दंश झाल्यास त्याचा विषप्रभाव दूर करणारे मांत्रिक म्हणून विशेषतः अरबाळे यांची ग्रामसंस्कृतीत ओळख असते. परिसरातल्या नागदेवतेचे ते उपासक असतात. लोकवाद्यांमध्ये चिपळ्या, खंजेरी, बासरी, तुणतुणे (चोंढके) यासारखी वाद्ये असतात. मात्र नागबारीसाठी मुख्यतः वापरली जाणारी वाद्ये ही वाद्ये नसतात तर त्यांचा वाद्य म्हणून वापर केला जातो. त्यात पितळेचा गुंड, गुंडाच्या मुखभागावर ठेवायला कासेची परात, गुंडावर ठेवलेली परात वाजविण्यासाठी तांब्याच्या दोन कड्या यांचा समावेश असतो. गुंडाला बैठक लाभावी म्हणून कापडी चुंबळ वापरली जाते. गुंडाच्या या बैठकीलाच ठावा असे म्हणतात. त्यामुळेच या लोकगीतांना ठावागीते असेही म्हटले जाते. श्रावण महिन्यात मुरणारा पाऊस पडत असल्याने माती चिकन झालेली असते. अशा चिकनमातीपासून दोन ओंजळीत मावेल अशा आकाराची बासरी काही कलावंत तयार करतात. या बासरीला पिलमपोया असे म्हटले जाते. नाद माधुर्यासाठी या पिलमपोयाचा वापर नागबारी गायनात केला जातो. नागबारी हे लोकगीत उच्च स्वरात गायचे असते. त्यामुळे यातील वाद्ये ही खुपदा ताल आणि नाद निर्मितीसाठीच उपयोगी असतात.
बारीचे दीर्घ बारी आणि खंड बारी असे दोन प्रमुख प्रकार आहेत. दीर्घ बारीचे गायन हे चार- पाच तास वा कधीकधी रात्रभर केले जाते. खंड बारी ही गायन करणाऱ्या गटांमध्ये गायिली जाते. पाऊस पडल्यानंतर सापाची नैसर्गिक निवासस्थाने नष्ट होतात आणि त्यांचा माणसाशी संपर्क वाढतो. त्यातून सर्पदंश घडून येतात. त्यामुळे सर्पदंश झाल्यावर नागबारीचे गायन केले जाते. हे गायनाचे प्रचलन पावसाच्या आगमन आणि निगमन यांच्याशी बरोबर जोडले गेले आहे. आषाढ हा शेतकऱ्यांच्या शेतीकामाच्या सुरुवातीचा महिना असतो. याच महिन्यात पाऊस पडणे सुरु झालेले असते. याच काळात नागबारीच्या गायनाला प्रारंभ केला जातो. पुढे दोन महिने हे गायन सुरू असते. श्रावण महिन्यातील सोमवारी हे गायन प्राधान्याने केले जाते. पारंपरिक भजन गायनाच्या क्रमानेच नागबारीचे गायन केले जाते. गण (देवाचा धावा), गवळण, बारी, ठावा, पद आणि आरती असा त्याचा क्रम असतो. चंदनशेक, डोम्याशेक ( कालिया नाग), हळद्याशेक, गुलालशेक (अबीरशेक) या ग्रामीण नागदैवतांची मुख्यत्वे यात आराधना केली जाते. नागबारीतील गीतांचे विषय हे वैशिष्ट्यपूर्ण असतात. सूर-असूर युद्ध, दैवत लग्नकथा-जन्मकथा असे प्राचीन संदर्भ या गीतात येतात. शिवाय या गीतांमध्ये अवतीभवतीचा निसर्ग, कृषिजीवन आणि ग्रामसंस्कृतीचे जे काही घटक असतात त्या सर्वांचे यात संदर्भ येतात.
विदर्भातील अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती या आणि इतर जिल्ह्यांमध्ये नागबारी लोकगीतांच्या गायनाचे विशेष प्रचलन आहे. त्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये गायन मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. काही खेड्यांमध्ये नागबारी गायनाच्या स्पर्धाही घेतल्या जातात. अलीकडे पुरुषांसोबत महिलाही या गायनात सहभागी होतात.
संदर्भ :
- भवाळकर तारा, लोकसंचित, राजहंस प्रकाशन, १९८९.