भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत या दोन्हीही संगीतप्रकारांत गीत या संज्ञेचा अंतर्भाव होतो. मात्र दोन्हीची उत्पत्ती आणि व्याख्या स्वतंत्र आहे. येथे भारतीय संगीतातील गीत या प्रकाराचा उहापोह केलेला आहे.  ‘गीत’ या संज्ञेचा सर्वसामान्य अर्थ जरी ‘स्वर-तालामध्ये गुंफलेली शब्दरचना’ असा असला, तरी प्राचीन ग्रंथकारांनी याची व्याख्या “स्वरांचा मनोरंजन करणारा समुदाय” अशी केलेली आहे. म्हणजेच, निरर्थक वाटणाऱ्या शब्दांना किंवा शब्दरचनेला गीता मध्ये स्थान आहे. ही व्याख्या अधिक स्पष्ट करण्यासाठी राग ताल युक्त स्वररचना, जी मनोरंजन करते, ते गीत असेही म्हणता येईल. याचाच अर्थ ते वाद्यावर वाजविलेही जाऊ शकते. म्हणजेच आज प्रचारात असलेली सरगम, तराना, गत (वाद्यावरील) हे देखील गीत या प्रकारात यावेत. हे एका विशिष्ट तालात, स्वरात रचलेले असते त्यामुळे त्याला “प्रबंध” असेही म्हणतात. या गीत प्रकाराचे दोन प्रकार सांगितले आहेत. ते पुढीलप्रमाणे –

१. गांधर्व – जे संगीत अनादी कालापासून प्रचलित आहे आणि वेदतुल्य असून ज्याचा वापर गंधर्व करीत असत आणि मोक्षप्राप्ती हाच ज्याचा हेतू होता.

२. गान – जे संगीत विद्वानांनी निर्माण केले आणि लौकिक दृष्ट्या लोकरंजन हाच ज्याचा हेतू होता.

यांनाच अनुक्रमे मार्गी आणि देशी संगीत असेही मानले गेले. परिणामकारक आणि सुंदर गीतामध्ये अलंकारयुक्त स्वररचना, राग नियोजन, तालमयता, सौंदर्यपूर्ण आणि अर्थपूर्ण साहित्य आदी बाबींची आवश्यकता असते आणि हे गीत सिद्ध होण्यासाठी काही नियम देखील सांगितले गेले आहेत. ते पुढीलप्रमाणे – सरलता, रागस्वरूप, प्रारंभ आणि मर्यादा, विश्रांतीस्थाने, ताल विचार, स्वरसंगती, रसनिष्पत्ती इत्यादी.

संदर्भ :

  • पुरोहित, बाळ,  हिंदुस्थानी संगीत पद्धती :मूलतत्वे आणि सिद्धांत

समीक्षक : श्रीकांत डिग्रजकर