नदीच्या झीज (क्षरण) कार्यामुळे निर्माण होणारे भूमिस्वरूप. नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकांचे थर जवळजवळ असतील तर, त्यांतील मृदू खडकस्तर जास्त झिजतात आणि क्षरणरोधक कठीण खडक कमी प्रमाणात झिजतात. त्यामुळे या दोन प्रकारच्या खडकस्तरांच्या उंचीत फरक पडतो व नदीचे पात्र ओबडधोबड, कमी-जास्त उंचीचे बनते. नदीच्या पात्रात अशा पायऱ्यापायऱ्यांसारख्या उंच-सखल भागांमुळे प्रवाहात लाटांसारखी व लहानलहान जलप्रपातांसारखी परिस्थिती निर्माण होते; मात्र या खडकस्तरांचा उतार उभ्या कड्यांसारखा तीव्र नसतो. या काहीशा तिरप्या उतारावरून पाणी वेगाने, खळखळाट करीत पुढे धावते, त्यांना धावत्या किंवा क्षिप्रिका किंवा द्रुतवाह असे म्हणतात. द्रुतवाहांच्या भागांत नदीपात्राचे ढाळमान अधिक असल्यामुळे आणि नदी खळखळाट करीत वेगाने वाहत असल्यामुळे तेथे फेसाळलेले पांढरेशुभ्र पाणी दिसते. सामान्यपणे नदीच्या वरच्या टप्प्यात द्रुतवाह आढळतात.
धबधब्याच्या पायथ्याच्या भागात पाण्याच्या आघातामुळे खड्ड्यांची निर्मिती होते. कालांतराने ऊर्ध्व खडकांची झीज होऊन धबधब्याचा खालचा खडक कोसळतो व धबधबा मागेमागे सरकतो. अशा धबधब्यांच्या पायथ्यालगतच्या भागात द्रुतवाह निर्माण झालेले दिसतात. द्रुतवाह नद्यांच्या पुनरुज्जीवनच्या इतर विभागांमध्ये, तसेच नदीच्या पात्रातील गिरिजनक हालचालीच्या बिंदुजवळदेखील निर्माण होतात.
द्रुतवाह हे नदीपात्राच्या दोन्हीही तीरांपर्यंत असू शकतात किंवा पात्राच्या काही भागातच असू शकतात. द्रुतवाह साधारणपणे ३ ते ३० मी. लांबीचे असतात. अशा ठिकाणी अतिशय धोकादायक असे भोवरे निर्माण झालेले आढळतात. द्रुतवाह हे जलवाहतुकीतील प्रमुख अडथळे ठरतात. काँगो प्रजासत्ताकातील इंगा द्रुतवाह हा जगातील सर्वांत मोठ्या द्रुतवाहांपैकी एक आहे. या द्रुतवाहामध्ये सुमारे १२ मी. खोल भोवरे आणि ६ मी. उंच तरंग लाटा निर्माण होतात. अनेक द्रुतवाहांच्या भागांत ‘व्हाइट वॉटर राफ्टिंग’ स्पर्धा घेतल्या जातात.
जगातील अनेक नद्यांच्या मार्गात द्रुतवाह आढळतात. भारतात हिमालयात तसेच सह्याद्रीत उगम पावणाऱ्या असंख्य नद्यांच्या पात्रात द्रुतवाह निर्माण झालेले आहेत.
समीक्षक : वसंत चौधरी