लोकगाथा : मौखिक परंपरेने चालत आलेला प्रदीर्घ कथनपर गीतकाव्याचा प्रकार. त्यात एखादी पारंपरिक लोकप्रिय कथा गीतांमध्ये गुंफलेली असते. गेयता हा त्याचा अनिवार्य घटक असतो. स्त्रीरचित आख्यानकाव्येही मराठीत भरपूर आहेत.प्राचीन भारतीय लोकगाथांमध्ये गीतांच्या साथीने नृत्येही केली जात. अजूनही ग्रामीण भागात क्वचित कथागीत-नृत्ये आढळतात. इंग्रजीतील वॅलड वा मराठीतील पोवाडा ह्या वीरगाथा−लोकगाथाच म्हणता येतील, गुजरातीमध्ये ‘कथागीत’ व राजस्थानीमध्ये ‘गीतकथा’ हे असे प्रकार आहेत. स्थूलमानाने प्रेमकथात्मक गाथा, वीरगाथा, रोमांचकारी गाथा असे त्यांचे विषयानुसारी प्रकार मानले जातात. प्रणयपर लोकगाथांमध्ये राजस्थानी घोला−मारू, पंजाबी हीर−रांझा, सोहनी−महिवाल इ. लोकप्रिय आहेत. वीरगाथा ह्या एखाद्या प्रसिद्ध वीरपुरूषास नायक कल्पून त्याच्या चरित्राभोवती गुंफलेल्या असतात व त्यांत त्याच्या शौर्यसाहसाची प्रशंसा असते. भोजपुरीमध्ये लोरकी, विजयमल, नथकवा, बनजारा, राज भरथरी (भर्तृ हरी), राजा गोपीचंद व आल्हा ह्या लोकगाथा प्रचलित आहेत. ह्यांपैकी आल्हा सर्वाधिक लोकप्रिय आहे. तद्वतच शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या वीरनायक बाबू कुँवरसिंहवर रचलेल्या भोजपुरी लोकगाथाही प्रसिद्ध आहेत. रोमांचकारी लोकगाथा बव्हंशी नायिकाप्रधान असतात. त्यांत नायिकेच्या जीवनातील रोमहर्षक घटनांचे चित्रण असते. राजस्थानी ‘सोरठी’ नामक प्रेमगाथा प्रसिद्ध आहेत. ‘बिहुला’ नामक भोजपुरी लोकगाथेत स्त्रीच्या पातिव्रत्याचे प्रभावी चित्रण आढळते. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये तेथील प्रदेशविशिष्ट संस्कृतीचे व लोकाचारांचे दर्शन घडवणारी लोकगीते विपुल आहेत व त्यांत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार दिसून येतात. व्यक्तिजीवनाशी संबद्ध अशी संस्कारगीते, ऋतुगीते, श्रमगीते, नृत्यसंबद्ध गीते, विविध सण-उत्सवप्रसंगी गायिली जाणारी गाणी, जाति-व्यवसायसंबद्ध गीते अशी अनेकविध प्रकारची लोकगीते सर्वत्र विपुलतेने आढळतात.
संदर्भ :
- भागवत, दुर्गा, लोकसाहित्याची रुपरेखा, पुणे, १९७७.