हिवतापावर मागील सु. ३०० वर्षांपेक्षाही अधिक काळ उपचारांसाठी वापरले जाणारे क्विनीन (कोयनेल) ज्या वृक्षांच्या सालीपासून मिळवतात, त्या सर्व वनस्पतींचा समावेश सिंकोना प्रजातीत करतात. या वनस्पती रुबिएसी कुलातील असून सिंकोना प्रजातीत जगातील सु. २३ जातींचा समावेश होतो. या वनस्पती मूळच्या दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया, व्हेनेझुएला, एक्वादोर, पेरू, बोलिव्हिया, चिली व अर्जेंटिना या देशांच्या अँडीज पर्वतावरील आहेत. त्यांपैकी काही झुडपे, तर काही लहानमोठे वृक्ष आहेत. हिवतापाचे कारण समजण्याआधी सिंकोना प्रजातीच्या सालीतील क्विनीन हिवतापावर गुणकारी असल्याचे लोकांना माहीत होते. याच कारणासाठी या वनस्पतींची लागवड जगाच्या वेगवेगळ्या भागांत करण्यात आली. सिंकोना प्रजातीतील सिंकोना रोबस्टा, सिं. कॅलिसाया, सिं. सक्सिरुब्रा (सिं. पुबेसन्स), सिं. कॉर्डिफोलिया आणि सिं. ऑफिसिनॅलिस या पाच जातींची लागवड व्यापारी उद्देशाने करण्यात येते.
सिंकोना सदाहरित वनस्पती असून त्या ५–१५ मी. उंच व सरळ वाढतात. पाने साधी, समोरासमोर, १०–१४ सेंमी. लांब व अनुपर्णी असतात. फुले स्तबक अर्थात परिमंजरी प्रकारच्या फुलोऱ्यात येत असून ती पंचभागी, लहान, पांढरी किंवा गुलाबी, वर पसरट केसाळ, परंतु खाली नळीसारखी व सुगंधी असतात. फळे बोंड प्रकारची, ८–१७ मिमी. लांब असून खालून वर तडकतात आणि त्यांत अनेक, लहान व सपक्ष (पंखयुक्त) बिया असतात.
सिंकोना वृक्षाची रोपे व बिया १८९४ साली पूर्वेकडील देशांत आणल्या गेल्या आणि त्यांची लागवड करण्यात आली. भारतात सिंकोनाच्या पुढील जाती लागवडीखाली आहेत : (१) सिं. कॅलिसाया : या जातीची लागवड निलगिरी आणि सिक्कीम येथे आहे. तिला कॅलिसाया बार्क, पेरूव्हियन बार्क या व्यापारी नावानेही ओळखले जाते. (२) सिं. कॉर्डिफोलिया (सिं. लेजरियाना) : ही जाती पश्चिम बंगाल, आसाम व दक्षिण भारत येथे लागवडीखाली असून भारतात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली आढळते. तिला लेजर बार्क या व्यापारी नावाने ओळखले जाते. (३) सिं. ऑफिसिनॅलिस : या जातीची लागवड निलगिरी येथे होते. तिला क्राऊन बार्क, लोक्सा बार्क या व्यापारी नावाने ओळखले जाते. (४) सिं. सक्सिरुब्रा : ही जाती सातपुडा, सिक्कीम व दक्षिण भारत येथे लागवडीखाली आहे. तिला ‘रेड बार्क’ या व्यापारी नावाने ओळखले जाते.
सिंकोना वनस्पतींमध्ये क्विनीन हे अल्कलॉइड असते. त्याखेरीज सिंकोनीन, सिंकोनिडीन, क्विनिडीन इत्यादी अल्कलॉइडे असतात. फॉल्सिफेरम हिवतापावर अजूनही क्विनीन हेच प्रभावी औषध मानले जाते. हिवतापाखेरीज आमांश व न्यूमोनिया रोगांवर उपचार करण्यासाठी क्विनीन वापरतात. तसेच संधिवातावरील वेदना कमी करण्यासाठी व गुळण्यांकरिता क्विनीनयुक्त औषधे उपयुक्त ठरली आहेत. मात्र क्विनीन अधिक प्रमाणात घेतल्यास तात्पुरती किंवा कायमची बधिरता येते. तसेच शिसारी, अंधपणा, मळमळ, घेरी इ. लक्षणे उद्भवतात. गरोदर स्त्रियांना व हृदयविकार असलेल्या व्यक्तींना क्विनीन देणे टाळतात. काही कीटकनाशकांमध्येही सिंकोनाची साल वापरतात.