व्यावसायिक विकास म्हणजे व्यक्तीने आपली जीवन कारकीर्द सतत उंचावत ठेवण्यासाठी सतत घेत असलेले शिक्षण व प्रशिक्षण होय. भारताचा सांस्कृतिक वारसा खूप श्रीमंत असून पुरातन काळामध्ये भारत हा अर्थव्यवस्था आणि व्यवसायाच्या पातळीवर खूप विकसित असल्याबाबत उत्खनन, साहित्य आणि लेखी कागदपत्रे या ऐतिहासिक पुराव्यांवरून स्पष्ट होते. भारताच्या अफाट संपत्तीमुळे आकर्षित होऊन विवध परदेशी आक्रमणकर्त्यांनी भारतावर वेळो वेळी केलेले हल्ले या वस्तुस्थितीची साक्ष देतात. प्राचीन भारतीय सभ्यता केवळ समृद्धीवर आधारित नव्हती, तर तिची अंतर्गत व बाह्य व्यापार आणि वाणिज्य व्यवस्था ही देखील खूप प्रगत होती. व्यवसायातील विविध क्षेत्रांत भारताचे पूर्वीपासूनच मोठे योगदान आहे. त्या काळातील इतर देशांमध्ये व्यापलेल्या धंद्यांशी तुलना केल्यास भारतीय व्यवसाय एकुलता, गतिशीलता (गतिमान) आणि गुणवत्तेत बराच पुढे होता.

प्राचीन काळापासून भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे कृषीवर आधारित होती. लोक स्वतःच्या वापराच्या वस्तू स्वतः तयार करायचे. त्या वेळी वस्तू विकण्याची किंवा देवाणघेवाण करण्याची गरज नव्हती; परंतु विकासासह लोकांच्या गरजा वाढू लागल्या. ज्यामुळे वस्तुंचे उत्पादनही हळुहळु वाढू लागले. लोक दैनंदिन वापर आणि चैनीच्या विविध वस्तुंच्या उत्पादनांमध्ये तज्ज्ञ होऊ लागले. अशा प्रकारे त्यांच्याकडे व्यवसायाचे स्वरूप व व्याप्ती आणि त्यांच्या वापराच्या इतर वस्तू तयार करण्याची कार्यक्षमता वाढली. म्हणूनच त्यांच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या अत्याधिक उत्पादनाच्या वस्तुंच्या देवाणघेवाणीची प्रणाली विकसित झाली. ही व्यापाराची खरी सुरुवात होती.

स्वातंत्र्यानंतर भारतातील व्यापार आणि व्यापार क्षेत्रात बरीच प्रगती झाली आहे. आज भारत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व वस्तू तयार करण्याइतपत औद्योगिक उत्पादनात सक्षम झाला आहे; परंतु इ. स. पू. ५००० पासूनच भारताने व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात आपल्या प्रवासाची सुरुवात केली होती. त्या काळी भारतीय संस्कृती विकसित किंवा प्रगत होती आणि भारतामध्ये सुव्यवस्थित शहरे होती. भारतीय कपडे, दागिने आणि सुगंधी द्रव्ये इत्यादींसाठी जगभरात आकर्षण होते. भारतीय व्यापार्‍यांमध्ये व्यवसायासाठी चलन वापरण्याची पद्धत रूढ होती. त्या वेळी भारतातील व्यापाऱ्यांनी केवळ मजबूत अंतर्गत व्यापार मार्गांचे जाळे विणलेले नव्हते, तर अरब, मध्य आणि दक्षिणपूर्व आशियाच्या व्यापार्‍यांशी त्यांचे व्यावसायिक संबंधही होते. तांबे, पितळाची भांडी, दागिने व सजावटीच्या वस्तू इत्यादी धातूंच्या विविध प्रकारच्या उत्पादनांमध्येही भारत सक्रिय होता. भारतीय व्यापाऱ्यांनी त्यांची उत्पादने जगातील विविध भागात निर्यात केली आणि तेथून त्यांची उत्पादने आयात केली. व्यापारी, कारागीर आणि उत्पादक यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी व्यापारी संघटना लोकप्रिय करण्यात आल्या. हे भारतातील व्यापार आणि व्यापाराच्या जटिल विकासास सूचित करते.

भारताने जागतिक व्यापार व व्यवसायांत अनेक मार्गांनी योगदान दिले आहे. आज वापरात असलेली गणिताची संख्याप्रणाली आधीपासूनच भारतात विकसित झाली होती. संयुक्त कौटुंबिक सराव आणि व्यवसायातील कामगारांची विभागणी भारतात विकसित झाली, जी आजही प्रचलित आहे. आज वापरले जाणारे ग्राहककेंद्रित व्यवसाय तंत्रज्ञान जुन्या काळापासून भारतीय व्यवसायाचा अविभाज्य अंग होता. म्हणूनच भारताचा स्वतःचा श्रीमंत व्यावसायिक वारसा असून त्याच्या वाढीसाठी भारताने प्राचीन काळापासून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

व्यावसायिक विकास ही एक आजीवन चालणारी प्रक्रिया असून व्यावसायिक कार्यक्षमता विकसित करण्यासाठी तो एक मूलभूत घटक आहे. काळानुसार प्रत्येक व्यावसायिक अथवा सरकारी नोकर हा आपापला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी स्वत:ला अद्ययावत ठेवत असतो, तसेच आपल्या प्रगतीसाठी कौशल्य विकसित करीत असतो. व्यावसायिक विकास म्हणजे जे व्यक्तीस व्यावहारिक क्रियाकलापांवर आधारित नोकरीसाठी व व्यवसायांसाठी तयार करते. जगातील बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे अधिक ज्ञानाधारित अर्थव्यवस्थांमध्ये जगातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या विशिष्ट कौशल्यामध्ये विशेष प्राविण्य मिळविण्याची आवश्यकता आहे. एकविसाव्या शतकात कोणत्याही तांत्रिक क्षेत्रात केवळ तज्ज्ञ लोकांनाच चांगल्या नोकर्‍या मिळू शकतात. त्यामुळे सरकारी आणि खाजगी (व्यवसाय) या दोन्ही क्षेत्रांत कौशल्य मागणीच्या पातळीत वाढ झाली आहे.

व्यवसाय एक कायदेशीर मान्यताप्राप्त व्यवस्था आहे, जी ग्राहकांना उत्पादन किंवा सेवा प्रदान करण्याच्या उद्दिष्टाने तयार केली गेली आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये व्यवसायाला एक प्रमुख स्थान आहे. त्यामध्ये बहुतेक व्यवसाय खाजगी असतात, नफा मिळविण्याच्या उद्देशाने कार्य करतात आणि त्याच बरोबर आपला व्यवसाय वाढवितात; परंतु सहकारी आणि सरकारी संस्था बहुतेक नफ्या मिळविण्याऐवजी सामाजिक हितासाठी व सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या उद्देशाने बनविल्या जातात.

व्यवसाय हा समाजाचा एक आवश्यक भाग आहे. विविध व्यापाऱ्यांद्वारे विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा प्रदान करून नागरिकांच्या गरजा पूर्ण केल्या जातात. म्हणजेच व्यवसाय ही एक व्यवस्था असून ज्यामध्ये उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने मानवी क्रियाचा वापर करून वस्तू किंवा सेवांचे उत्पादन, विक्री व वितरण आणि देवाणघेवाण नियमितपणे केले जाते. ज्याचा उद्देश त्यांच्या सेवांद्वारे समाजाच्या गरजा भागवून नफा मिळविणे हा असतो. व्यावसायिक विकास तरुणांना काम शिकण्यास मदत करते. आज कौशल्याधारित शिक्षणातून रोजगाराला, स्वत:चा व्यवसाय करण्याला जास्त संधी आहे. उदा., वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान शिक्षण, संगणक शिक्षण, विद्युत (इलेक्ट्रॉनिक) शिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण इत्यादी.

शिक्षकांच्या व्यावसायिक गरजा ओळखणे एक आव्हानात्मक कार्य आहे; कारण त्यांच्या गरजा, विषयज्ञान, विषय शिक्षण, संप्रेषण, व्यवस्थापकीय कौशल्य किंवा समकालीन शिक्षण धोरण इत्यादींशी संबंधित असतात. या गरजा ओळखण्यासाठी कोणतीही यांत्रिक प्रक्रिया अधिक उपयुक्त ठरू शकत नाही. ती केवळ शिक्षक किंवा शिक्षक प्रशिक्षकांच्या मदतीनेच ओळखली जाऊ शकते. हे काम केव्हा आणि कसे करावे, त्याची पद्धत कोणती असावी, यावर सतत संशोधन केले पाहिजे. वर्गीकृत क्षेत्रांनुसार प्रशिक्षणाची प्रभावी आणि व्यावहारिक रचना तयार करणे गरजेचे आहे. म्हणजे प्रणालीचा एक भाग गरजा ओळखतो आणि दुसरा भाग त्या गरजा भागविण्यासाठी एक योग्य आराखडा तयार करतो. शिक्षक गटास योग्य वेळी प्रशिक्षण मिळाले पाहिजे. इतर कोणत्याही घटकाने प्रशिक्षणाच्या परिणामाची चाचणी घ्यावी. जेणेकरून पुढच्या वेळी प्रतिकृती किंवा आराखडा परिष्कृत करून वापरता येऊ शकेल आणि वेळो वेळी शिक्षकी व्यवसायाचा विकास साधता येईल.

समीक्षक : के. एम. भांडारकर