जमील, शाहीद : (८ ऑगस्ट, १९५७ -) भारताच्या उत्तर प्रदेशात शाहीद जमील यांचा जन्म झाला. अलीगढ मुस्लिम विद्यापीठात त्यांनी बी.एस्सी. पदवी व नंतर रसायनशास्त्रातील एम.एस्सी. पदवी कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मिळवली. पुढे त्यांनी जीवरसायनशास्त्रातील पीएच्.डी. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीमधून मिळवली. त्यांच्या पीएच्.डी.चे मार्गदर्शक ए. सिद्दीकी आणि बी. ए. मॅक फाडेन हे होते.

रेण्वीय विषाणू विज्ञान शाखेत त्यांनी पीएच्.डी. नंतरचे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडोच्या हेल्थ सायन्सेस सेंटरमधील मायक्रोबायोलॉजी आणि इम्युनॉलॉजी विभागात केले. तीन वर्षानंतर ते संधिवात विभागात असिस्टंट प्रोफेसर या पदावर काम करू लागले. वर्षभरात त्यांनी दिल्लीला इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB) येथे विषाणू विज्ञान संशोधन विभाग सुरू केला. पंचवीस वर्षे ते तेथे वरिष्ठ वैज्ञानिक आणि विषाणू विभागाचे प्रमुख होते. भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीमधील वेलकम ट्रस्टमध्ये ते नंतर आले.

तीन वर्षांपर्यंत त्यांचे मुख्य संशोधन काविळीच्या हिपॅटायटिस-बी विषाणूवर युनिव्हार्सिटी ऑफ कोलोराडोमध्ये झाले. याच वेळी त्यांनी इंटरल्युकिन-१ कुलातील सायटोकिनच्या जनुक व्यक्ततेवर संशोधन केले. त्यानंतर हिपॅटायटिस-ई विषाणू (HEV) आणि एचआयव्ही ह्यूमन इम्युनोडिफीशिएन्सी व्हायरसच्या रेण्वीय जीवविज्ञानावर त्यांनी संशोधन केले. या संशोधनातून एचआयव्हीचे निदान अधिक लवकर करता येईल असे त्यांना वाटत होते. त्यांच्या संशोधन गटाने एचआयव्ही-१ सब टाइप-सी या भारतातील सर्वाधिक संसर्ग असलेल्या विषाणूची प्रथिने, हिपाटायटीस-बी, एक्स आणि सार्स विषाणू ३-ए प्रथिने शोधून काढली. एचआयव्ही-१ सब टाइप-सी वर लस शोधण्याचे त्यांचे संशोधन सुरू आहे. हा प्रकल्प नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि आयसीजीइबी यांच्या सहकार्याने चालू झाला. त्यांचे हे संशोधन अभ्यासक्रमातील वैद्यकीय पुस्तकात समाविष्ट केले गेले आहे.

सध्या ते त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सच्या अशोका विद्यापीठात संचालक पदावर आहेत. त्यापूर्वी शाहीद जमील इंडियन सार्स कोव्ही-२ जीनोमिक्स संघ (INSACOG) समितीच्या सल्लागार मंडळाचे प्रमुख होते. मात्र अलीकडे त्यांनी कोव्हिड सार्स-२ च्या जनुकीय क्रमनिर्धारण समितीचा राजीनामा दिला. या समितीत दहाहून अधिक वैज्ञानिक सार्स कोव्ही विषाणू जनुक क्रमनिर्धारणावर संशोधन करीत होते, ते आजही त्यांच्याशिवाय चालू आहे. तसेच भारताच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीमधील वेलकम ट्रस्टमध्ये ते प्रमुख होते. या ट्रस्टच्या माध्यमातून हिपाटायटीस-ई वर संशोधन केले जाते. नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस आणि इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमी या संस्थांचे ते सदस्य आहेत.

याशिवाय त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये आयसोसायट्रेट लायेज आणि प्रोटीनेजेस मेद संपृक्त बियाणे, प्राणी विषाणूमधील आधुनिक विषाणू विज्ञान यांचा समावेश असून, याच विषयावर त्यांचा शोधनिबंध ICGEB-UCI 1995, परिसंवादात प्रसिद्ध झाला होता. या शोधनिबंधाचा उपयोग अनेक पीएच्.डी. आणि त्यापुढील संशोधन करणाऱ्या  संशोधकांनी करून घेतला आहे. स्प्रिंगर या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाच्या इंडियन जर्नल ऑफ व्हायरॉलोजीच्या संपादक मंडळावर आणि जर्नल ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड बायोमेडिसीन, जर्नल ऑफ बायोसायन्स आणि प्रोसीडिंग्ज ऑफ इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडेमी यांच्या संपादक मंडळावर ते अनेक वर्षे होते. त्यांनी सर सईद डे सेलेब्रेशनमध्ये शिकागो येथे बीजभाषण केले होते. जामिया मिलिया इस्लामियामध्ये भरलेल्या ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन बायोटेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड एन्व्हायरोन्मेंट’ (NCOBE-2017) मध्ये प्रमुख भाषण करण्याचा मान त्यांना मिळाला.

बी. एम. बिर्ला सायन्स सेंटरतर्फे जमील यांना जीव विज्ञानाचे सायन्स प्राइझ, नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेस इंडियाचे फेलो, शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमीचे फेलो, गुहा रिसर्च कॉन्फरन्स आणि अमेरिकन सोसायटी फॉर मायक्रोबायोलोजीचे सभासद असे सन्मान त्यांना लाभले आहेत.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा