निसळ, अनुया : ( १९ ऑक्टोबर १९७८) अनुया निसळ यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ डेलवेअर येथून मटेरिअल सायन्स अँड इंजिनियरिंग या विषयात मास्टर्स आणि आयआयटी पवईमधून रसायन अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट प्राप्त केली. पहिली काही वर्षे आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून संशोधन व विकास विभागात काम करण्याचा अनुभव घेतल्यानंतर त्या पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये (एनसीएल) पॉलिमर सायन्स अँड इंजिनियरिंग या विभागात प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा गट पॉलिमर बायोमटेरील, वैद्यकीय उपकरणे व टिश्यू इंजिनियरिंग यांवर संशोधन करतो.
रंगीत रेशमी धाग्यांच्या उत्पादनावरील संशोधन हे त्यांच्या गटाचे एक महत्त्वाचे काम आहे. रेशीम अळीच्या कोशापासून जे धागे मिळतात ते सफेद रंगाचे असतात. या धाग्यांना रंगीत करण्याच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यामुळे नदीनाल्यांचे पाणी दूषित होते. यावर उपाय म्हणून केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण या संस्थेच्या गटाने हे धागे जैविक पद्धतीने रंगीत करण्याची प्रक्रिया विकसित केली. त्यानुसार रेशीम अळीचे खाद्य असलेली तुतीची पाने संशोधन केलेल्या नैसर्गिक रंगात बुडवून त्यांना खाण्यास दिल्यावर त्या त्या रंगाचे रेशीम मिळते. अनुया यांच्या गटाने या प्रयोगासाठी नेमके रंग शोधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. या प्रक्रियेमुळे जलप्रदूषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल.
अनुया यांनी एनसीएलच्या कामावर आधारीत सेरीजेन मेडिप्रॉडक्टस् प्रा. लि. ही सिल्क वा रेशमी धाग्यांचे मानवी आरोग्यासाठी पुनर्निर्माण करणारी स्टार्टअप कंपनी सुरू केली असून लवकरच त्याद्वारे उत्पादन सुरु होईल. या शोधाचा प्रामुख्याने तीन प्रकारे उपयोग होऊ शकतो. हाडांचा कर्करोग अथवा तत्सम गंभीर आजारामुळे किंवा अपघाताने हाडांमध्ये जी पोकळी निर्माण होते ती भरून काढण्यासाठी म्हणजेच बोन फिलर म्हणून तसेच कृत्रिम स्तन (स्तनाच्या कर्करोग रुग्णांसाठी) बनवण्यासाठी हे पॉलिमर्स उपयोगात येऊ शकतात. मधुमेहामुळे पायांना ज्या जखमा होतात किंवा बराच काळ अंथरुणाला जखडल्यामुळे रोग्यांना जे बेड सोर्स होतात त्याचे व्रण भरून काढण्यासाठीही हे उत्पादन प्रभावी ठरेल. अशा प्रकारे मानवी स्वास्थ्यासाठी रेशमाचा वापर हाडांमध्ये करायची परवानगी मिळालेली सेरीजेन मेडिप्रॉडक्टस् ही जगातील पहिली कंपनी आहे. या शोधाला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे.
करोनाच्या चाचणीसाठी अनुया यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पॉलीमरच्या नासफारींजेल स्वाबवर काम केले. एनसीएलने हे तंत्रज्ञान एका भारतीय कंपनीला हस्तांतरित केले असून सध्या ती कंपनी दररोज एक लाख स्वाब तयार करते. याआधी स्वाब इतर देशातून आयात केले जात. आता ते भारतातच बनत असल्याने त्यांची किंमतही कमी झाली आहे.
करोनाच्या उद्रेकामुळे कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. परंतु त्याबरोबरच वापरा आणि फेका प्रणालीने संपूर्ण देशाच्या कचऱ्यात मे २०२०च्या सुमारास प्रतिदिन २०० टनांची भर पडत असल्याचे निदर्शनास आले. आत्तापर्यंत हा कचरा केंद्रीय व्यवस्थापन सुविधेमार्फत जाळला जात होता. त्यामुळे दूषित वायूंचे उत्सर्जन होऊन प्रदूषण वाढत होते. अनुया, हर्षवर्धन पोळ आणि त्यांच्या गटाने पीपीई किट्स, हातमोजे, मुखपट्ट्या असा सर्व प्लास्टिक कचरा निर्जंतुक करुन त्याच्या पुनर्वापरासाठी विशेष प्रक्रिया विकसित केली. त्यामुळे या विघटन न होणाऱ्या कचऱ्यापासून आता कुंड्या, मोटारीसाठी लागणारे विविध भाग इत्यादी प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन राष्ट्रीय पातळीवर करणे शक्य होणार आहे.
आत्तापर्यंत अनुया निसळ यांचे २३ शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून त्यांच्या नावावर आजवर सहा एकस्वांची नोंदणी झाली आहे.याबरोबर इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनियरिंग चा तरुण संशोधक हा सन्मान, रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनियरिंग, यूके यांची लिडर्स इन इनोव्हेशन फेलोशिप तसेच स्त्री संशोधकांसाठीचा टाय-बिरॅक विनर हा विशेष पुरस्कारांवरही अनुया यांना मिळाला आहे.त्यांना स्विझरलँड येथील सायंटिफिक आंत्रप्रेन्युअर्स वा वैज्ञानिक उद्योजक घडवणाऱ्या परिषदांमध्ये भारतातर्फे सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
अनुया निसळ यांनी आजवर विविध शासकीय संस्थांसाठी अनेक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.
संदर्भ :
- http://academic.ncl.res.in/aa.nisal
- https://serigenmed.com
- https://birac.nic.in/desc_new.php?id=818
- https://chemicals.nic.in/sites/default/files/9th%20National%20AwardsBooklet.pdf
समीक्षक : अ. पां. देशपांडे