कार्यवाद हा मानवाच्या कर्तृत्वाची गाथा सांगणारा वैचारिक पंथ आहे. एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत कार्यवाद या विचारसरणीचा उदय झाला. चार्ल्स पिअर्स यांना कार्यवादाचा प्रणेता, प्रवर्तक, पुरस्कर्ता असा मान दिला जात असला, तरी विसाव्या शतकात कार्यवादी विचाराला तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात खऱ्या अर्थाने जॉन ड्यूई यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्यामुळे त्यांनाच कार्यवादाचा जनक मानतात. सेफिस्ट तत्त्वज्ञ पायथॅगोरस यांचे ‘मॅन इज दी मिझर ऑफ ऑल थिंग्ज’ हे कार्यवादाचे सूत्र असून माणसाच्या क्रियाशक्तीला, उपक्रमाला, प्रयोगशीलतेला कार्यवाह अधिक महत्त्व देतो. कोणत्याही गोष्टीची योग्यायोग्यता ही मानवी जीवनात तिच्या उपयुक्ततेवर अवलंबून असते, असे ड्यूई यांचे मत आहे. त्यामुळे त्यांच्या मते, जे सत्य मानवी जीवनाच्या विकास व प्रगतीच्या दृष्टीने उपयोगी असेल तेच सत्य. त्यामुळे कार्यवादाला उपयुक्ततावाद तसेच साधनवाद (इन्स्ट्रुमेंटॅलिझम) असेही म्हटले जाते.

कार्यवाद ही लोकशाहीप्रधान अशी विचारधारा असून शिक्षण प्रक्रियेत प्रत्येकाला सहभागी होण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. अशा सहभागातून व अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मनोवृत्ती रुजेल आणि लोकशाहीच्या विकासासाठी आवश्यक त्या गुणांचा विकासही त्यांच्यात घडून येईल. इतकेच नव्हे, तर शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया असल्यामुळे सामाजिक कार्याचे आयोजन करून त्यात विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त केले पाहिजे, असाही आग्रह कार्यवाद धरतो.

कार्यवादाची वैशिष्ट्ये :

  • कार्यवाद केवळ पुस्तकी ज्ञानावर विश्वास न ठेवता कृती वा प्रयोगांद्वारे जे अनुभव मिळतात, ते खरे ज्ञान असे मानतो.
  • कार्यवादाच्या मते, सत्य हे व्यक्ती व काळपरत्वे बदलत असते. त्यामुळे त्याची योग्यता व्यक्तिच्या उपयुक्ततेवर अवलंबून असते.
  • व्यावहारिक जग हेच सत्य असल्यामुळे अमूर्त अशा सत्यामागे धावण्यापेक्षा दैनंदिन व्यवहारांत येणाऱ्या समस्या दूर करून मानवी जीवन सुखी व समृद्ध करणे, या विचाराला कार्यवाद प्राधान्य देतो.
  • कार्यवादी विचारवंत ज्ञानाला साधन न मानता साधनभूत मानतात.
  • कार्यवाद ही लोकशाहीप्रधान विचारधारा आहे.

लोकशाहीचा पुरस्कार हे कार्यवादाचे वैशिष्ट्य असल्यामुळे चर्चा, वादविवाद, परिसंवाद, कृतिसत्रे, चर्चासत्रे सोबतच प्रकल्प पद्धती, समस्या निराकरण पद्धती, कृतीद्वारा शिक्षण अशा नव्या अध्यापनाच्या पद्धती कार्यवादाने अस्तित्वात आणल्या. कोणतेही तत्त्वज्ञान वा विचारधारा परिपूर्ण नसते; परंतु जीवन व शिक्षण यांचा समन्वय साधला जावा हा विचार आणि शिक्षण पद्धती हे कार्यवादाने शिक्षण क्षेत्राला दिलेले फार मोठे योगदान आहे.

समीक्षक : बाबा नंदनपवार


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.