चयापचयाच्या क्रियेमध्ये वनस्पती विविध प्रकारची द्रव्ये तयार करत असतात. त्यांत प्रामुख्याने दोन प्रकारची रंगद्रव्ये पाहावयास मिळतात. हरितद्रव्य (Chlorophyll) पानांमध्ये आणि पानसदृष्य भागांमध्ये असतात, तर त्यास मदत करणारी लाल (Xanthophyll) आणि पिवळ्या (Phaeophytin) रंगांची द्रव्ये असतात. त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे हरितद्रव्याचे सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून रक्षण करणे आणि अन्ननिर्मितीच्या कार्यात हरितद्रव्याला मदत करणे, म्हणून त्यांना मदतनीस द्रव्ये म्हणतात. दुसऱ्या प्रकारची द्रव्ये म्हणजे फुलांमध्ये आणि फुल-सदृश भागांमध्ये आढळणारा अँथोसायनीन (Anthocyanin) द्रव्यसमूह.

हरितद्रव्याचे प्रमुख कार्य प्रकाश-संश्लेषणाद्वारे अन्न-निर्मिती करणे, ज्यात लाल आणि पिवळ्या द्रव्यांची मदत होते. अँथोसायनीन द्रव्ये पाण्यात विद्राव्य असतात. त्यांचे कार्य फुलांमध्ये परागीकरण करण्यासाठी कीटकांना व पक्षांना आकर्षित करणे. ही द्रव्ये वनस्पतींच्या प्रसारणकार्यात प्राण्यांना आकर्षित करण्यासाठी फुले, खोड, पाने, फळे आणि मुळामधेही विविध रंगांत आढळून येतात. फुलांच्या पाकळ्यात ती जास्त उठून दिसतात.

अँथोसायनीनबरोबरच बीटालीन हा लाल-पिवळ्या रंगद्रव्यांचा समूह वनस्पतींच्या विशिष्ट कुळातच असतो (उदा., निवडुंग, लाल माठ इ.). ही रंगद्रव्येसुद्धा पाण्यात विद्राव्य असतात, मात्र त्यांचे अस्तित्व नेहमीच स्वतंत्र असते. बीटरूट आणि कोनफळ कंद यांचा रंग याच्यामुळे आहे.

वनस्पतींमधील रंगद्रव्ये त्यांच्या प्रमाणित कार्यांबरोबरच इतरही अनेक उपयुक्त कार्ये करत असतात. बीटा कॅरोटीन हे हरितद्रव्याबरोबर आढळणारे रंगद्रव्य जीवनसत्त्व अ आणि क यांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. पानझडी वृक्षांमध्ये, शरद ऋतूंत हरित पानांचे लाल, पिवळ्या, नारंगी, विटकरी रंगांमध्ये रूपांतर पाहावयास मिळते. याचे मुख्य कारण म्हणजे पानांमधील हरितद्रव्याचे झालेले विघटीकरण. या क्रियेमध्ये हरितद्रव्य रंगहीन होते आणि त्याच्यासोबत असणारी त्यांची मदतनीस रंगद्रव्ये त्यांच्या मूळ स्वरूपात टप्प्या-टप्प्याने प्रदर्शित होतात. यामध्ये अँथोसायनिनचासुद्धा सहभाग असतो. पानांमधील अशा प्रकारच्या रंग स्थित्यंतराच्या वेळी प्रकाश-संश्लेषण क्रिया थांबलेली असते.

 

संदर्भ :

  • Leaf pigments in “Harward Forest” Harward University, USA, 1988.
  • Young, A.J., Phillip D. Savill, Carotenoides in higher plant photosynthesis, Handbook of Photosynthesis. Publ. Taylor and Francis  pp. 575-596, 1997.

समीक्षक : शरद चाफेकर