पानापासून काढलेले प्रथिन हे मानवाकरिता उत्तम दर्जाचे असून, त्याचा दर्जा दुधातील प्रथिनाइतका पण अंड्यातील प्रथिनापेक्षा थोडा कमी असतो. लसूणघास, बरसीम यासारखा जनावरांचा चारा किवा मुळा, कोबी, गाजर इ. भाज्या खाल्ल्यावर त्यांच्या वाया जाणाऱ्या पानापासून तयार केलेली प्रथिनखळ लहान मुलांच्या न्याहारीत दिली तर मुलांचे वजन व रक्तातील हीमोग्लोबिन वाढते. प्रथिन पावडरमध्ये जीवनसत्त्वे (अ, ई, फॉलिक आम्ल), खनिजे (विशेषत: कॅल्शियम, लोह) आणि स्निग्धामध्ये (प्रामुख्याने लिनोलीइक आणि लिनोलेनिक) खूप असून त्यांचा मुलांच्या वाढीवर फार मोठा फायदा होतो. साधारण: १० किलो वजनाच्या मुलाला १० ग्रॅम पावडर दररोज दिल्यास मुलाची ३०० % जीवनसत्त्व अ, १०० % लोह, ५० % फॉलिक आम्ल, ४० % कॅल्शियम आणि २० % प्रथिनाची गरज भागते. या खळीमध्ये प्रथिनाव्यतिरिक्त इतरही जीवनावश्यक घटक असतात म्हणून त्याला पौष्टिक पर्णखळ म्हणतात.
सन १९८१ सालात पर्णप्रथिनाचे उत्पादन करून त्याचा उपयोग शेतीमध्ये कसा करता येईल, याचे संशोधन महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पती विभागात सुरू झाले. या प्रयोगाकरिता विद्यार्थ्यांनी औरंगाबाद जवळील बिडकीन गावातील शेतीची निवड केल्याने या प्रयोगाला बिडकीन प्रकल्प म्हणून संबोधले जाते. भारत सरकारकडून पर्णप्रथिनावर १६ मिनिटाचा लघुपटही तयार करण्यात आलेला आहे.
पर्णप्रथिन तयार करण्याची पद्धत : प्रथम गडद हिरव्या वनस्पती चुरडून लगदा करतात. लगद्यावर दाब देऊन निघालेला रस चाळणीतून किवा फडक्यातून गाळून घेतला जातो. नंतर हा रस ताबडतोब उकळी फुटेपर्यंत गरम करतात. गरम रसामध्ये तयार झालेले हिरवे दही (Coagulum) स्वच्छ कापडी पिशवीत ठेवून पाण्यापासून वेगळे करतात. अशा प्रकारे केलेल्या पानांच्या विघटनापासून (Fractionation) तीन घटक मिळतात. १०० किलो पान-पिकात ते घटक पुढील प्रमाणात असतात : (१) हिरवा रस ५ किलो पर्णसत्त्व (पर्णप्रथिन); जे मानवी आहारात वापरण्यायोग्य असते, (२) ५२ किलो तंतुमय (अवशिष्ट) चोथा; जे जनावरांचे उत्तम खाद्य असते आणि (३) तपकिरी रंगाचा ४३ किलो रस किवा निवळी. वरील आकडेवारीवरून असे दिसून येते की, पान पिकाचे ९० टक्क्याहूनही अधिक वजन हे चोथा व निवळी यांचे असते. त्यामुळेच या दोन घटकांचा कसा व किती फायदेशीर रीत्या उपयोग केला जाईल यावर पर्णसत्त्व प्रकल्पाचे अर्थशास्त्र अवलंबून असते.
अवशिष्ट चोथा : अवशिष्ट चोथ्याचे घटक (Composition) : प्रथिने १४ ते १७ %, तंतुमय पदार्थ ३५ ते ४५ %, सेल्युलोज ३० ते ३५ %, लिग्निन १० ते १२ %, स्निग्ध पदार्थ २ %, राख ५ ते १० % आणि ऊष्मांक ४-५ किलो कॅलरी/ग्रॅम. अवशिष्ट चोथा रवंथ करणाऱ्या जनावरांचे खाद्य ताजे खाद्य म्हणून, वाळवून आणि त्याचा मूरघास बनवून देता येतो. निवळीबरोबर यांचा उपयोग बायोगॅस निर्मितीकरितासुद्धा होऊ शकतो.
निवळी (Whey) : निवळीची तुलना दह्याचा चक्का बनविताना खाली निथळणार्या पाण्याबरोबर करता येईल. साधारणपणे निवळीमध्ये ३० ते ४० % पाण्यात विरघळणारी शर्करा, १० ते २० % नायट्रोजनयुक्त पदार्थ आणि पानातील कित्येक सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थ असतात. निवळीचा उपयोग ४ प्रकारे करता येतो. (१) द्रवरूप खत म्हणून, (२) बायोगॅस निर्मितीकरिता, (३) सूक्ष्मजीवाणू वाढविण्याचे माध्यम म्हणून आणि (४) रवंथ करणार्या जनावरांच्या खाद्यात मिसळून.
कोंबडी व वासरांच्या खाद्यात पर्णसत्त्वाचा वापर : पर्णसत्त्वाचा उपयोग अंडी व मासोत्पादनासाठी कोंबड्यांच्या खाद्यात उत्तम दर्जाची प्रथिने व झँथोफिल हे पीतद्रव्य पुरविण्याकरिता करण्यात येतो. त्याचा उपयोग वासरांच्या खाद्यातसुद्धा गाईच्या दुधाऐवजी करता येतो. या खाद्याला प्रतिस्थापक (Calf Milk Replacer) म्हणतात. बिडकीन प्रकल्पात पर्णसत्त्व वापरून तयार केलेले हे खाद्य ७ दिवसांच्या वासराला दुधाऐवजी प्रतिस्थापक म्हणून ६५ ते ७० टक्क्यापर्यंत देण्यास सुरुवात केली व वासरे ८ आठवड्याची झाल्यावर बंद केले. प्रायोगिक तत्त्वावर याप्रमाणे दुधाची बचत होऊन हे वाचलेले दूध मानवी कुटुंबाला उपलब्ध झाले.
बिडकीन प्रकल्पाचे फायदे : (अ) पर्णप्रथिन खळ/पावडर सामान्य शेतीपेक्षा अन्नसत्त्वाचे दर एकरी उत्पादन जास्त देतात. (ब) पर्णप्रथिन वनस्पती त्यांच्या पानांच्या दाट वाढीमुळे जमिनीचा ऱ्हास (erosion) होऊ देत नाहीत. (क) पर्णप्रथिन वनस्पतीवर कीटकनाशके मोठ्या प्रमाणात मारावी लागत नाहीत, कारण या वनस्पतीची कापणी पानांनी प्रकाशसंश्लेषण क्रियेतून अन्न तयार केल्यावर लवकरच केली जाते. (ड) पर्णप्रथिन मिळविण्याची क्रिया सोपी असून या क्रियेत वनस्पतींचा कोणताही घटक वाया जात नाही. (इ) शेंगदाणे, सोयाबीन, तूरडाळ यांसारख्या बियांच्या तुलनेत अधिक पोषकद्रव्ये मिळविता येतात.
प्रकल्पाचे काही तोटे : (अ) या वनस्पतीना वाढीसाठी वरचेवर पाणी देणे जरुरीचे असते. त्यामुळे पुरेसे पाणी नसलेल्या प्रदेशात हा प्रकल्प चालविता येत नाही. (ब) बऱ्याच लोकांना जेवणात हिरवे पदार्थ आवडत नाहीत. (क) पर्णप्रथिनात जीवनसत्त्व ‘क’ नसते.
संदर्भ :
- जोशी, रा. ना., पर्णसत्त्व : पौष्टिक अन्न वरदान, सातारा, २००२.
- Pirie, N.W., Leaf Protein and its by-Products in Human & Animal Nutrition, U. K., 1987.
- Singh N. (Ed.), Proceedings of International Conference on Leaf Protein Held at Aurangabad, 1982.
समीक्षक : शरद चाफेकर