पश्चिम आफ्रिकेतील कॅमेरून आणि नायजेरिया या देशांतून वाहणारी नायजर नदीची प्रमुख उपनदी. हिला चड्डा नदी असेही म्हणतात. या नदीची लांबी १,०८३ किमी. आणि जलवाहनक्षेत्र ३,१९,०००  चौ. किमी. आहे. कॅमेरून देशाच्या उत्तर भागातील अ‍ॅडामावा पठारावर सस. पासून १,३४० मी. उंचीवर या नदीचा उगम होतो. पहिल्या टप्प्यातील तिचा २४० किमी.चा प्रवाह अनेक द्रुतवाह आणि जलप्रपातांवरून ६०० मी. पेक्षा अधिक खाली उतरतो. बाकीचा प्रवाह मात्र विनाअडथळा वाहतो. पावसाळ्यातील पुराच्या वेळी मायोकेबी या उपनदीद्वारे ही नदी लोगोन नदीला जोडलेली आहे. लोगोन नदी पुढे चॅड सरोवराला मिळते. नूमान (नायजेरिया) येथे बेन्वे नदीला उजवीकडून गाँगोला नदी येऊन मिळते. त्यानंतर ती नैर्ऋत्येस आणि पूर्वेस वाहत जाऊन नायजेरियातील लोकोजा शहराजवळ नायजर नदीस मिळते. या संगमस्थानाजवळ बेन्वेच्या पात्रात वाळूचा बांध असून नदीतील किमान पाणीपातळीच्या वेळी येथे फक्त ०.६ मी. एवढी पाण्याची खोली असते; मात्र पावसाळ्यात नदीला पूर आला की, पूराचे पाणी वस्तीत जाते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होते.

पूर्वी नायजर नदीपेक्षाही बेन्वे नदीचे पाणी अधिक असे; परंतु वाढत्या जलसिंचनामुळे दोन्ही नद्यांचे पाणी कमी झालेले आहे. फॅरो, गाँगोला, मायोकेबी, ताराबा, कॅस्तिना अ‍ॅला या बेन्वे नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कॅमेरूनमध्ये या नदीवर लॅग्दो हे धरण बांधले असून त्याचा उपयोग जलसिंचन व जलविद्युतनिर्मितीसाठी केला जातो. मायोकेबी नदीपासूनचा पुढील बेन्वे नदीचा संपूर्ण प्रवाह बारमाही जलवाहतूकयोग्य आहे; परंतु पुरेशा पाणीपातळीअभावी कित्येकदा वाहतूक थांबवावी लागते. या नदीमार्गाने प्रामुख्याने खनिजतेलाची मोठ्या प्रमाणावर आयात केली जात असून कापूस, भुईमूग शेंग यांची निर्यात केली जाते. गारूआ (कॅमेरून), योला, नूमान, माकूर्डी (नायजेरिया) ही या नदीच्या तीरावरील प्रमुख शहरे आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.