कॉट्सबू, ऑटो फॉन (Kotzebue, Otto von) : (३० डिसेंबर १७८७ – १५ फेब्रुवारी १८४६). रशियन समन्वेषक व नौसेना अधिकारी. त्यांचा जन्म एस्टोनिया या तत्कालीन रशियन साम्राज्यातील रेव्हेल येथे म्हणजेच सांप्रत एस्टोनिया देशातील टाल्यिन येथे झाला. प्रसिद्ध जर्मन नाटककार ऑगस्ट फॉन कॉट्सबू यांचा ऑटो हा मुलगा. सेंट पीटर्झबर्ग विद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर लगेचच त्यांची नौदलातील कारकीर्द सुरू झाली. आपल्या कारकीर्दीत त्यांनी तीन पृथ्वीप्रदक्षिणा केल्या आणि वेगवेगळ्या प्रदेशांचा शोध लावून त्यांचे समन्वेषण केले. रशियाने अदाम इव्हान क्रूझ्यिनश्ट्यिरन या मार्गनिर्देशकांच्या नेतृत्वाखाली इ. स. १८०३ ते इ. स. १८०६ या कालावधीत पहिली पृथ्वीप्रदक्षिणा मोहीम आखली होती. या मोहीमेतील ‘नद्येझद’ या गलबतावर एक छात्रसैनिक म्हणून ऑटो सहभागी झाले होते. ऑटो हे उत्तम खलाशी होते आणि त्यांना नौकानयनात विशेष रस होता. या मोहीमेवरून परत आल्यानंतर त्यांनी बाल्टिक समुद्रातील कार्यात काही काळ घालविला; परंतु पहिल्या सफरीत भेट दिलेल्या पॅसिफिकमधील बेटांचे समन्वेषण करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती.

ऑटो यांनी इ. स. १८१५ मध्ये आपल्याच नेतृत्वाखाली ओशिअ‍ॅनियाची सफर काढली. या सफरीसाठी ते ३० जुलै १८१५ रोजी क्रोनस्टॅट येथून निघाले. ‘रूरिक’ या गलबतातून दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकावरील केप हॉर्न भूशिराला वळसा घालून त्यांनी २२ जानेवारी १८१६ रोजी पॅसिफिक महासागरात प्रवेश केला. त्या वेळी त्यांनी पॅसिफिक महासागरातील ईस्टर बेटाला, टूआमोटू द्वीपसमूहातील अनेक पॉलिनीशियन बेटांना आणि काही मार्शल बेटांना भेटी दिल्या. त्यानंतर उत्तर अमेरिकेच्या अलास्का किनाऱ्याचे समन्वेषण करून त्याचे नकाशे तयार करत असताना त्यांनी चुक्ची समुद्राचा फाटा असलेल्या एका साउंडचा शोध लावला. त्या फाट्याला त्यांनी स्वत:च्याच नावावरून कॉट्सबू साउंड हे नाव दिले. आशियाई आर्क्टिक प्रदेशातील सागरी मार्गाने त्यांना अटलांटिककडे जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे ते परत मार्शल बेटांच्या मार्गाने रशियाला परतले. ऑगस्ट १८१८ मध्ये ते प्रथम नेव्हा नदीच्या मुखाशी व त्यानंतर लगेचच स्वगृही पोहोचले. येताना त्यांनी आपल्याबरोबर वेगवेगळ्या वनस्पती तसेच संस्कृतिविज्ञानविषयक माहिती आणली होती. इ. स. १८२१ मध्ये त्यांनी आपल्या सफरीचा वृत्तांत प्रकाशित केला.

ऑटो कॉट्सबू यांच्या कार्याने प्रभावित होऊन रशियन सम्राट झार अलेक्झांडर पहिला यांनी काहीशा शास्त्रीय उद्देशांनी पृथ्वीप्रदक्षिणेसाठीची पुढची सफर काढण्यासाठी ऑटो यांची मार्च १८२३ मध्ये नेमणूक केली. रशियाचे कॅमचॅटका द्वीपकल्प आणि अमेरिकेचा वायव्य किनारा यांदरम्यान मालासह प्रवास करून तेथील रशियन अमेरिकन कंपनीच्या मालाचे परकीय तस्करांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी ऑटो यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यासाठी त्यांना साम्राज्याच्या नौदलात कॅप्टन पदावर बढती देण्यात आली. तसेच त्यासाठी त्यांना ‘प्रेडप्रिएट’ हे मोठे गलबत आणि १४४ सहकारी बरोबर दिले. तुलनेने दुसऱ्या सफरीतील रूरिक गलबत लहान होते आणि बरोबर फक्त २० सहकारी होते. इ. स. १८२३ ते इ. स. १८२६ या कालावधीतील आपल्या या तिसऱ्या सफरीसाठी त्यांनी २८ जुलै १८२३ रोजी क्रोनस्टॅट सोडले. ते २३ डिसेंबर रोजी केप हॉर्न भूशिराला वळसा घालून दक्षिण पॅसिफिकमध्ये गेले. या सफरीत त्यांनी हवाई बेटे व त्यातील होनोलूलू बंदर, कॅमचॅटका द्वीपकल्प यांना भेटी दिल्या आणि सोसायटी व मार्शल द्वीपसमूहातील काही बेटांचा शोध लावला. केप ऑफ गुड होपमार्गे परत येऊन १० जुलै १८२६ रोजी क्रोनस्टॅट बंदरात पोहोचले. या वेळी त्यांच्या सफरीतून रशियाला पॅसिफिकमधील बरीच माहिती मिळाली.

ऑटो यांनी आपल्या सफरींचा वृत्तांत पुढील दोन ग्रंथांमधून प्रकाशित केला : ए व्हॉयिज ऑफ डिस्कव्हरी इनटू दी साउथ सी अँड बेरिंग्ज स्ट्रेट्स फॉर दी पर्पज ऑफ एक्स्प्लोरिंग ए नॉर्थ-वेस्ट पॅसेज, अंडरटेकन इन दी यिअर्स १८१५-१८१८ (१८२१) आणि ए न्यू व्हॉयिज राउंड दी वर्ल्ड इन दी यिअर्स १८२३-१८२६ (१८३०).

ऑटो यांचे रेव्हेल येथे निधन झाले.

समीक्षक : वसंत चौधरी