मोमीन, बी.के. : (१ मार्च १९४७ – १२ नोव्हेंबर २०२१). महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, चित्रपट गीतकार, लोककलावंत, लेखक आणि कवी. बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म कवठे (येमाई) ता. शिरुर, जि. पुणे येथे झाला. महाराष्ट्राच्या ग्रामीण लोककला, लोकरंगभूमी या क्षेत्रात त्यांनी भरीव आणि लक्षणीय योगदान दिले आहे. त्यांनी लोकरंगभूमीच्या पडद्यापुढे तर कधी पडद्याआड आत्मविश्वासाने कार्य केले आहे. गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारात विपुल असे लिखाण त्यांनी केले आहे. त्यांचे शिक्षण इयत्ता नववीपर्यंत झाले. शालेय जीवनातच शाहिरीकाव्य लेखनाचा छंद त्यांना जडला होता. पुढे त्यांनी गद्य प्रकारातील लेखन आणि पद्य प्रकारातील गणगवळण, भावगीते, भक्तिगीते, भारूडे, लावण्या, कलगीतुरा, वगनाट्य, पोवाडे, नाट्यछटा, मराठी चित्रपट गीते, मराठी गीतसंच गीते, जनजागृतीपर गीते असे विविधांगी लेखन केले आहे.

आकाशवाणीवर प्रसारित लोकनाट्य – हुंडाबळी, व्यसनबंदी, एड्स, अंधश्रध्दा निर्मूलन, साक्षरता अभियान; वगनाट्य – बाईने दावला इंगा, इस्कानं घेतला बळी, तांबड फुटलं रक्ताचं, भंगले स्वप्न माझे, भक्त कबीरसुशीला, मला क्षमा कर असे त्यांचे लेखन आहे. त्यांची वगनाट्ये  वेगवेगळ्या लोकनाट्य मंडळांनी सादर केली आहेत. ही वगनाट्ये तमाशातून सादर होत असताना रसिक प्रेक्षक अक्षरश भारावून जायची. या वगनाट्यातील आशय- संदर्भ- मांडणी ही मार्मिकतेने नटलेली असल्याने रसिक प्रेक्षकांची दाद मिळायची. वेडात मराठे दौडले सात, लंका कुणी जाळली या ऐतिहासिक नाटकांचे त्यांनी लेखन केले आणि ते रंगमंचावर खूप गाजले. याशिवाय त्यांची सोयऱ्याला धडा शिकवा, दारू सुटली चालना भेटली, मनाला आळा, एडस टाळा, दारूचा झटका संसाराला फटका, हुंड्यापाई घटलं सारं, बुवाबाजी ऐका माजी ही लोकनाट्ये आकाशवाणीवर प्रसारित झाली आहेत. दारूबंदी, गुटखाबंदी, हुंडाबंदी इत्यादी शासनाच्या योजनांच्या प्रचारात त्यांनी सतत हिरिरीने सहभाग घेत काम केले. नेताजी पालकर, भ्रमाचा भोपळाभंगले स्वप्न माझे या वगनाट्यात त्यांनी भूमिका केल्या आणि त्या प्रचंड गाजल्या. मराठी गीतसंचामध्ये प्रसारित झालेली ‘नवसाची यमाई, भाग एक व दोन ’, ‘कलगी तुरा’, ‘अष्टविनायक गीते’, ‘सत्वाची अंबाबाई’, ‘वांग्यात गेली गुरं’, ‘रामायण कथा’, ‘कऱ्हा नदीच्या तीरावर’, ‘येमाईचा दरबार’ ही त्यांची गीते लोकप्रिय ठरली.

मोमीन यांनी दत्ता महाडिक पुणेकर, काळू-बाळू लोकनाट्य, रघुवीर खेडकर लोकनाट्य मंडळ, गंगाराम बुवा कवठेकर अशा नामांकित लोकनाट्य मंडळांत विविध भूमिका पार पाडल्या. तसेच लेखनप्रपंचामुळे तमाशा क्षेत्रातील कलावंतांमध्ये त्यांची साहित्यिक अशी ओळख राहिली. त्यांच्या लेखनात विविधता आणि सौंदर्य ओतप्रोत भरले आहे. ग्रामीण संस्कृतीशी त्यांची नाळ जुळलेली असल्याने त्यांच्या गीत आणि वगनाट्यामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचे प्रतिबिंब उमटले आहे. त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या ५० वर्षांच्या लोककलेतील योगदानाबद्दल २०१८ मध्ये महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा तमाशा सम्राज्ञी ‘विठाबाई नारायणगावकर’ हा सर्वोच्च असा जीवनगौरव पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या अंगी असलेल्या गुणांचा बडेजाव न करता सामाजिक बांधिलकी जपत कार्य केले आहे.

संदर्भ : क्षेत्रसंशोधन