उमा बाबाजी सावळजकर : (१८२५ – १९१०). एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नावारूपास आलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोक कलावंत. कवी आणि भेदिक शाहीर ही त्यांची मुख्य ओळख. त्यांच्या कारकीर्दीतच मराठीतील पहिले वगनाट्य निर्माण झाले असे अभ्यासक मानतात. आई कोंडाबाई आणि वडिल बाबाजी यांच्यापोटी उमाजीचा जन्म झाला. दुष्काळ आणि गरिबी या कारणाने वडिल लुटमार करीत, त्यामुळे वडिलावर वारंट असल्याने ते फरारी होते. गावातील धनदांडग्यांच्या त्रासाला कंटाळून सावळज या गावातून दहा वर्षाच्या उमाला घेऊन आई कोंडाबाई आपल्या माहेरी भिलवडीला कायमची निघून गेली. ही बातमी वडिल बाबाजीला समजली. पाटलाला चांगला धडा शिकविण्याचे त्याने ठरविले. दसऱ्याच्या दिवशी तीला पन्नास लोक घेऊन पोलीस पाटलाच्या घरावर त्याने चाल केली. पाटलाच्या घरावरील कौले काढून त्याने पाटलाच्या घरात प्रवेश केला. सशस्त्र बाबाजीला पाहून पाटील गांगरून गेला. त्याच्या पत्नीने गयावया केल्यामुळे त्याने पोलीस पाटलाला सोडले. तो फरारी असल्याने त्याच्यावर वारंट होते. ते सांगली संस्थानापुरतेच होते. बाबाजीने सांगली परिसर सोडला आणि तो कोल्हापूर संस्थानाच्या हद्दीत असणाऱ्या जयसिंगपूरजवळच्या नांदणी गावात येऊन राहिला, दरोडेखोरी सोडून तेथे तो सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगत राहिला.

भिलवडीत आल्यानंतर कोंडाबाई माहेरच्या आश्रयाला राहून मोलमजुरी लागली. उमाला संभू कोष्ट्याच्या घरी जनावरे राखण्यासाठी ठेवले. संभू कोष्टी तुरा पक्षाचा प्रख्यात भेदिक शाहीर होता. पुसेसावळीचा कलगी पक्षाचा प्रसिद्ध शाहीर हैबती आणि भिलवडीचा संभू कोष्टी यांच्यात मोठी स्पर्धा असायची. कलगी आणि तुरा पक्षात सवाल-जबाबाचे अटीतटीचे सामने होत. संभू कोष्टी यांच्या घरी सतत भेदिक गाण्याच्या तालमी होत असत. गोठ्यात जनावरांपलीकडे बसलेले ते मांगाचे पोर उभ्या फडातल्या लावण्या, त्यातल्या शब्दाची कसरत, चालीची झडत. सवाल-जबाबाची लढत ऐकत असायचे. लांबून ऐकलेले हे गुरुज्ञान उमाच्या डोक्यात इतके भिनले की, दिवसभर गुरांमागे हिंडता हिंडता तोही कवित्व करू लागला. संभू कोष्टी हा उमाचा खरा गुरू. (व्हटकर : १९७५:१२२) एकदा त्याच गाणे संभू कोष्ट्याने आडोशाने ऐकले, तो हसत हसत म्हणाला, “तू बापापेक्षा अट्टल चोर ठरलास! माझं गाणं तू चोरलंस” असे म्हणून संभू कोष्ट्याने उमाजीला मायेने जवळ घेतले आणि त्याला आपला शिष्य बनविले. संभू कोष्ट्याचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली उमाजीने रामायण, महाभारत, पांडवप्रताप, गुरुमार्ग, भक्तिमार्ग, अध्यात्म याचा कसून अभ्यास केला. या विषयावरील भेदिक कवने त्यांनी आत्मसात केली. चौदा वर्षे उमाजीने या विषयाचे शिक्षण घेतले. कुशाग्र बुद्धीच्या उमाजीने आपल्या बुद्धीच्या जोरावर त्यात प्राविण्य संपादित केले आणि पुढे तो तुरा पक्षाचा अग्रगण्य कवी झाला.

भेदिक शाहीर म्हणून नाव कमविल्यानंतर उमाजी भिलवडी सोडून सांगलीस आले. स्वत:चा तमाशाचा फड काढावा असा विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागला. तो काळ इ. स. १८४०-४५ चा असावा. उमाजींचे वय ३०-३५ वर्षाचे असेल. धडाडीच्या तरणाबांड उमाजींनी तमाशा काढला. सांगलीत तुकातोड नावाचा मित्र त्यांना भेटला. मिरजेचा बंगलू (ढोल्या), बुधगावचा तात्या (नाच्या) या साथीदारांना त्यांनी सोबतीला घेतले. त्यावेळी उमाजींनी रचलेल्या ‘छकडी’ मध्ये ‘उमा-तुकाची जोडी’, ‘उमा-तुका म्हणे’ असा नावाचा छाप टाकलेला आढळतो. पेडच्या बाबाजी सिदू साठे याची सासुरवाडी सावळज होती. त्यामुळे उमाजींचे त्यांच्याशी नात्या-गोत्याचे संबंध होते. सांगलीत उमाजींच्या तमाशाचा चांगलाच बोलबाला झाला होता. ७-८ वर्षे उमाजींच्या तमाशाचे खेळ सांगलीच्या परिसरात होत होते. त्यांच्या तमाशाला मिळालेली प्रसिद्धी पाहून बाबाजी उमाजींच्या तमाशात येऊन दाखल झाला. मोराळचे नाना रामचंद्र पाटील हे बाबाजीचे गुरू होते. त्यांनी बाबाजीला तमाशाचे, भेदिक गाण्याचे चांगले शिक्षण दिले होते, बाबाजी शीघ्र कवी होता. त्याने लावण्या, छकडी रचल्या होत्या. बाबाजीची साथ मिळाल्यानंतर उमाजींची काव्यप्रतिभा आणखी बहरली आणि दोघे मिळून काव्य करू लागले. उमा-बाबू अशी त्यांची दुक्कल जमली आणि त्यांनी रचलेल्या गाण्यांमध्ये, शिलकारीमध्ये उमा-बाबू हे नाव विराजमान झाले. उमा-बाबू एकत्र आल्यावर मोराळच्या नाना रामचंद्र पाटलांनी त्या दोघांना छेलबटाव-मोहनाराणीची कथा सांगितली. त्या कथेच्या आधाराने उमा-बाबूने मोहनाबटाव  हा वग इ. स. १८५०-६० च्या दरम्यान रचला. हाच मराठीतला पहिला वग मानला जातो.

सतत पन्नास ते पंच्चावन वर्षे उमाजीने तमाशा केला आणि रसिकांची सेवा केली. तमाशा बंद केल्यावर उमाजीचे कुटुंब सावळजला आले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

संदर्भ :

  • कस्तुरे बाळासो,आद्य तमासगीर उमाजी बाबाजी सावळजकर यांचे वग, क्रांतदर्शी प्रकाशन.