मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे सुप्रसिद्ध मंदिर हे लक्षावधी भक्तांचे श्रद्धास्थान असून अत्यंत लोकप्रिय देवस्थान आहे. हे मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला सु. ४.५ किमी. अंतरावर असून मंदिराकडे जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेतील बस तथा टॅक्सी सेवा सशुल्क उपलब्ध आहे.

श्रीसिद्धिविनायक गणपती

मंदिरातील सिद्धिविनायकाची प्रसन्न मूर्ती ही काळ्या पाषाणाची असून ती बैठकीपासून मुकुटापर्यंत अडीच फूट उंचीची व दोन फूट रुंदीची आहे. मूर्ती उजव्या सोंडेची असून तिच्या वरच्या उजव्या हातात कमळ, तर डाव्या हातात परशु; खालील उजव्या हातात जपमाळ, तर डाव्या हातात मोदकांची वाटी आहे. ही मूर्ती एका पाषाणात कोरलेली असून पायांजवळ लहानसा उंदीर आहे. संपूर्ण मूर्ती रक्तगंधानुलीप्त आहे. हा सिद्धिविनायक कमळावर पद्मासन घालून बसलेला आहे. या गणेशमूर्तीच्या गळ्यात सर्पाकृती यज्ञोपवीत (जानवे) आहे. पाषाणाच्या मखरात कोरलेल्या सिद्धिविनायकाच्या बाजूला हिरव्या साड्या नेसलेल्या ‘ऋद्धी’ व ‘सिद्धी’ या ऐश्वर्य, भरभराट, सुख-समृद्धी व मांगल्य यांच्या देवता उभ्या आहेत म्हणूनच या गणेशाला केवळ गणपती न म्हणता ऋद्धी व सिद्धी सन्निध संजीवन महागणपती म्हटले जाते.

हे देवस्थान पुरातन मानले जाते. उपलब्ध माहितीनुसार या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार कार्तिक शुद्ध चतुर्दशी शालिवाहन शके १७२३, दि. १९ नोव्हेंबर १८०१ रोजी मुंबईचे मूळ रहिवासी समजले जाणारे लक्ष्मण विठू पाटील यांनी केला असे समजते. त्या वेळी मंदिर परिसरात खूप झाडी होती; फारशी वस्ती नव्हती. मंदिराजवळ एक तळे होते. हळूहळू वस्ती वाढू लागली व ते तळे बुजविण्यात आले. १८०१ मध्ये मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला असल्याने हे मंदिर दोनशे वर्षांहून अधिक प्राचीन आहे, हे स्पष्ट होते. मुंबईतील बाणगंगा संकुलात या मूर्तीसारखीच संगमरवरी मूर्ती आहे. या दोन्ही मूर्ती एकाच कारागिराने घडविल्या असतील, तर हे मंदिर बाणगंगा संकुलाला समकालीन ठरते व बाणगंगेप्रमाणे हे मंदिरसुद्धा किमान पाचशे वर्षांइतके प्राचीन असावे असा काही अभ्यासकांचा कयास आहे. संत जांभेकर महाराजांनी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडून आशीर्वादस्वरूप या देवस्थानासाठी वैभव मागून घेतल्याची आख्यायिका भक्त मानतात व त्या आशीर्वादाचे मूर्त रूप म्हणजे मंदिर परिसरातील पवित्र मंदार वृक्ष अशी भक्तांची श्रद्धा आहे.

इसवी सन १९३६ पासून संत जांभेकर महाराज यांच्या आदेशावरून गोविंदराज फाटक हे पूजाअर्चा व आनुषंगिक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत होते. ३१ डिसेंबर १९७३ रोजी वयोमानपरत्वे त्यांनी सेवेतून निवृत्ती घेतली. या काळातच मंदिराची विश्वस्तव्यवस्था गठित झाली आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकारी असलेले प्रशासकीय विश्वस्त यांच्याकडून मंदिराचे व्यवस्थापन होऊ लागले. पुढे शासनाने अतिरिक्त निधीतून भक्तांना सुविधा देणे, अधिक व्यापक सामाजिक उपक्रम हाती घेता येणे या उद्देशांनी विश्वस्त व्यवस्थेची पुनर्रचना केली. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी दिनांक ११ ऑक्टोबर १९८० रोजी शासनाकडून अध्यादेश प्रस्थापित करण्यात आला. यानुसार सिद्धिविनायक मंदिर तथा न्यास हे शासन नियंत्रित असून सर्व कामकाज ‘श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था (प्रभादेवी) अधिनियम १९८०’द्वारे चालविण्यात येते.

आज जे भव्य मंदिर मुंबई नगरीचे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे, त्या वास्तूच्या नूतनीकरणाच्या भूमीपूजनाचा सोहळा दि. २७ एप्रिल १९९० रोजी संपन्न होऊन नूतन वास्तू दि. १३ जून १९९४ रोजी कळस प्रतिष्ठापना करून लोकार्पित करण्यात आली. सध्याचे मंदिर पाच मजली असून गाभाऱ्यावरील प्रत्येक मजल्यावर वेष्टित भिंती बांधून कळसापर्यंत जागा मोकळी राहील याची काळजी घेतली गेली आहे. मंदिरावर असलेला नवा कळस हे या मंदिराचे एक ठळक वैशिष्ट्य असून तो १,५०० किग्रॅ. वजनाचा असून बारा फूट उंच आणि सुवर्णवेष्टित आहे. गाभाऱ्यासमोर दुरून दर्शन घेण्यासाठी १३ ते १४ फूट उंचीचा सभामंडप आहे.

श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे कार्य : १. सामाजिक कार्य : या क्षेत्रातील न्यासाची कामगिरी गौरवास्पद राहिली आहे. नैसर्गिक संकटे, युद्धजन्य परिस्थिती वा अन्य कोणतेही संकट असो श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यास नेहमीच मदतकार्यात अग्रगण्य राहिला आहे. मदत करताना भौगोलिक सीमारेषा, प्रादेशिकता, भाषा, धर्म, पंथ असे कोणतेही निकष न ठेवता ‘भारतीयत्व’ आणि ‘माणुसकी’ जपत मदत करण्याची न्यासाची भूमिका असते. देशासाठी आत्मार्पण केलेल्यांच्या योगदानाचा सन्मान राखणे, हे न्यासाला अतिशय महत्त्वाचे वाटते. दहशतवादी हल्ल्यांमध्ये आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांच्या कुटुंबीयांना सांत्वन आणि अर्थसाहाय्य देणे त्यांनी आपले कर्तव्य मानले. भाविक मोठ्या श्रद्धेने सोने-नाणे, अलंकार दान करतात. न्यास वेळोवेळी या भेटींचा लिलाव घडवून आणते. त्यातून उभ्या राहणाऱ्या निधीचा वापर समाजोपयोगी कार्यासाठी न्यासाकडून करण्यात येतो.

२. आरोग्यविषयक कार्य : न्यासातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील गरीब व गरजू रुग्णांना वृक्क (Kidney) विकार, मेंदूचे विकार, कर्करोग, मेंदूची शस्त्रक्रिया, हृदयशस्त्रक्रिया इ. विविध उपचार व शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत केली जाते. दि. १४ फेब्रुवारी २०१४ पासून मंदिराशेजारी प्रतिक्षालय, शैक्षणिक व आरोग्य सुविधा केंद्र उभारले असून गरीब रुग्णांना माफक दरात सुविधा देण्याच्या दृष्टीने न्यासाने श्रीसिद्धिविनायक अपोहन केंद्र (Dialysis Center) सुरू केले आहे.

३. शैक्षणिक कार्य : श्रीगणेश ही ज्ञान, विज्ञान व विद्या यांची देवता असल्याने श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यास शैक्षणिक क्षेत्रात पुस्तकपेढी, डिजिटल ग्रंथालय, वाचनकक्ष, शिबिरे इ. विविध उपक्रम राबवितो.

अशाप्रकारे न्यासातर्फे परंपरा आणि नवता, अध्यात्म आणि तंत्रज्ञान, धार्मिक व सामाजिक कार्य यांची सांगड घालण्यात आलेली आहे.

संदर्भ :

समीक्षक : प्रसाद अकोलकर