परिणामकारक आणि उत्तम कार्य करण्याच्या शरीराच्या क्षमतेला शारीरिक स्वास्थ्य असे म्हणतात. उत्तम स्वास्थ्य ही निरोगी आयुष्याची गुरूकिल्ली आहे. कामाच्या व इतर ठिकाणी न दमता, न थकता, उत्साहाने काम करता येणे हे फार महत्त्वाचे आहे.
आपल्या शरीरातील विविध अवयव जसे की, हृदय, फुप्फुसे, स्नायू, सांधे वगैरे व्यवस्थितपणे काम करत असतील, तर आपले शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते.
संतुलित आहार आणि शारीरिक स्वास्थ्ययांचा सहसंबंध : निरोगी शरीरासाठी पौष्टिक आहाराची गरज आहे. आहारात प्रथिने आणि कर्बोदकांचा योग्य प्रमाणात वापर करावा. धूम्रपान, मद्यपान इ. व्यसनांपासून दूर राहावे.
त्रिदोष संतुलन आणि शारीरिक स्वास्थ्य : मानवी शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात. यांचे संतुलन राखल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते. या तीन दोषांपैकी एक किंवा अनेक दोषांमध्ये काही कारणास्तव असंतुलन झाल्यास रोग उद्भवतात. परिणामी शारीरिक स्वास्थ्य बिघडते. तेव्हा योग्य आहार आणि नियमित व्यायाम किंवा योगासने यांद्वारे त्रिदोषांचे संतुलन राखण्यास साहाय्य होते.
व्यायामाचे महत्त्व :नियमित व्यायाम केल्याने वजन संतुलित राहण्यास मदत होते. तसेच हाडे, स्नायू आणि सांध्यांना बळकटी येते. शारीरिक आरोग्य निरोगी असल्याने मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहते. परिणामी शरीराची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारकक्षमता वाढते.
स्नायुशक्तिवर्धक व्यायाम : भुजा व्यायाम (Push-ups, Pull-ups), अर्धासन (Squatting), उठाबशा करणे किंवा वजन (Dumbbell) वापरून व्यायाम करणे यांमुळे स्नायूंची ताकद वाढते. धावणे, सायकल चालवणे, क्रीडाचाल/क्रीडासंचलन (Sport marching) असे व्यायाम जास्त कालावधीसाठी केल्याने स्नायूंची क्षमता वृद्धिंगत होते. दररोज साधारणत: २० मिनिटे स्नायू ताणण्याचे व्यायाम करणे आवश्यक आहे. योगप्रकार आणि विशेष नृत्यप्रकार केल्याने शरीराचा लवचिकपणा वाढतो.
वायुजीवी व्यायाम (Aerobic exercises), पोहणे, क्रॉसफिट व्यायामप्रकार संच अशा व्यायामांनी हृदयाच्या क्रियाशीलतेत भर पडते. हृदयाची क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करावा. एका जागी जास्त वेळ बसणे टाळावे, पायऱ्यांचा अधिकाधिक वापर करावा.
प्रत्येक क्रियांसाठी स्नायूंची पूर्वतयारी (Warm up) करणे आवश्यक असते, त्यासाठी स्नायू ताणण्याचे व्यायाम करता येतात. यामुळे जड कामासाठी स्नायू तयार होतात आणि अनावश्यक इजा टाळता येते. प्रशिक्षण टप्प्यांत धावणे, सायकल चालवणे, पोहणे, क्रॉसफिट व्यायामप्रकार, नृत्यप्रकार असे व्यायाम करतात. व्यायामानंतर शरीराला पूर्वस्थितीत आणण्यासाठी श्वसनसंबंधित व्यायाम, शवासन, क्रीडासंचलन असे प्रकार करतात.
क्रीडाकौशल्यवृद्धी व्यायाम : एकपादी व्यायाम (Lunges), रश्शीउड्या, चेंडूफेक अशा गतिशील आणि संतुलनसाधक व्यायामप्रकारांनी शारीरिक स्वास्थ्य आणि क्रीडाकौशल्य वृद्धिंगत होते.
शारीरिक स्वास्थ्याची आवश्यकता : दैनंदिन जीवन सुरळीतपणे जगण्यासाठी मानसिक आरोग्य तसेच शारीरिक आरोग्य महत्त्वाचे आहे. हृदयविकाराचा झटका, संधिवात, फुप्फुसांचे आजार, मधुमेह, पक्षाघात, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी शारीरिक स्वास्थ्य आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती, अतिथंडी किंवा अतिउष्णता, मानसिक अस्वस्थता अशा परिस्थितींना तोंड देण्याची क्षमता उत्तम शारीरिक स्वास्थ्य आपणांस देते.
पहा : त्रिदोष.
संदर्भ :
- ACSM’s Guidelines for Exercise Testing and Prescription Tenth edition.
- Kisner & Colby, Therapeutic exercise foundations and techniques Sixth edition, 2012.
- https://www.betterhealth.vic.gov.au/health/healthyliving/physical-activity-its-important