युआन, एरीक एस. : (२० फेब्रुवारी, १९७०) एरीक युआन यांचा जन्म चीनमधील शानडॉंग प्रदेशातल्या ताईआन शहरात झाला. त्यांचे वडिल भूशास्त्र अभियंता होते. चौथ्या इयत्तेत असताना पैसे मिळवण्यासाठी त्यांनी बांधकामात वापरलेले भंगार जमा करून त्याचे पुनर्चक्रीकरण करून त्यापासून धातुरूप तांबे वेगळे केले होते. त्यांना वडिलांप्रमाणेच अभियंता बनायचे होते. म्हणून त्यांनी शानडॉंग विद्यापीठातून प्रथम गणितात, नंतर संगणकशास्त्रामध्ये आणि भूशास्त्र अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

त्यांनी मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचे सर्वेसर्वा बिल बेट्स यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेरित होऊन अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना अमेरिकेला जाण्यासाठी आवश्यक असणारा व्हिसा आठवेळा नाकारला गेला, मात्र नवव्यांदा त्यांना व्हिसा मंजूर करण्यात आला आणि १९९७ मध्ये एरीक युआन अमेरिकेत दाखल झाले. संभाषणासाठी आवश्यक असणारी इंग्रजी भाषा त्यांना फारशी येत नव्हती, तरी देखील चिकाटीच्या जोरावर, एरीक यांनी वेबेक्स या कंपनीत नोकरी मिळवली. त्याकाळी ही कंपनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या क्षेत्रात कार्यरत होती.

सुमारे दहा वर्षे वेबेक्स कंपनीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगबाबतचे तंत्रज्ञान एरिक यांनी आत्मसात केले. वेबेक्स कंपनीच्या यशाचा चढता आलेख लक्षात घेऊन, २००७ मध्ये सिस्को या संगणक कंपनीने वेबेक्स कंपनी विकत घेतली आणि येथूनच एरिक यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सिस्को कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. २००७ सालीच एरिक युआन यांना अमेरिकेचे नागरिकत्त्व मिळाले.

मुळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या संकल्पनेचे आणि एरिक यांचे नाते प्रेमाच्या नाजूक धाग्यांनी जोडलेले आहे. १९८७ साली एरिक पदवीचे शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांची प्रेयसी त्यांच्या घरापासून लांब अंतरावर राहायची. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी दहा तास प्रवास करायला लागायचा. तेव्हा त्यांना सारखे वाटे की, एका बटनाच्या क्लिकवर आपण आपल्या प्रेयसीला भेटू शकलो पाहिजे, तिच्याशी बोलू शकलो पाहिजे, तिला पाहू शकलो पाहिजे. यातूनच त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर विकसित केले.

एरिक यांनी २०११ साली झूम व्हिडिओ कम्युनिकेशन या कंपनीची अमेरिकेत स्थापना केली. झूम या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ॲपच्या माध्यमातून त्यांनी नानाविध चाचण्या केल्या आणि काही महिन्यात झूम नावाचे मोबाईल ॲप तयार झाले.

संदर्भ :

समीक्षक : हेमंत लागवणकर