जेव्हा विद्यार्थ्याला पुरेशा सूचना देऊनही ते त्याच्या संज्ञानात्मक पातळीवर आणि वयानुसार लेखन क्षमतेत विसंगती दर्शवितात, तेव्हा त्याला लेखन दोष असे संबोधतात. त्याला ‘लिखित अभिव्यक्तीतील विशिष्ट शिक्षण विकार’ असेही म्हणतात. dysgraphia हा शब्द ‘dys’ ज्याचा अर्थ ‘दुर्बल’ आणि ‘graphia’ ज्याचा अर्थ ‘हाताने लिहिणे’ या दोन ग्रीक शब्दांपासून तयार झालेला असून त्याचा अर्थ लिहिण्याची अक्षमता किंवा लेखन दोष असा होतो.
लिहिणे ही एक जटिल व बहुमुखी कृती किंबहुना एक प्रक्रिया आहे. शिक्षण प्रक्रियेतील ते एक महत्त्वपूर्ण कौशल्य आहे. या कौशल्याशिवाय शिक्षण अर्धवट राहिल किंवा होणारच नाही. अंध बालकांसाठीसुद्धा ब्रेल लिपीचा लिहिण्या-वाचण्यासाठी उपयोग केला जातो. हे कौशल्य सामान्यत: आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षांत हस्तगत व विकसित केले जाते.
‘विशिष्ट अध्ययन अक्षमता’ ही एक डोलारारूपी संज्ञा आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारचे विशिष्ट विकार आहेत. परिभाषानुसार शिक्षण अक्षम असणे ही मूलभूत मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे. यामध्ये भाषा समजून घेण्यास, लेखन करण्यास आणि वापरण्यात येणाऱ्या विकृतींचा समावेश आहे. अर्थात, आपल्याला जी माहिती प्राप्त होते, त्यावर आपण प्रक्रिया करतो, आठवतो आणि ती संप्रेषित करतो. अध्ययन अक्षमता ही कमकुवत दृष्टी किंवा श्रवण यांचा परिपाक नाही; ते प्रतिजन वर्णलेख (अँटिजन स्पेक्ट्रम) मध्येही मोडत नाही; सामान्य भाषेत ज्याला मतिमंद संबोधले जाते, ते त्यासारखेही नाही आणि भावनिक गोंधळाशी सुसंगतही नाही. त्याच प्रमाणे अध्ययन अक्षमता कोणत्याही गैरसोयीचा (सांस्कृतिक, पर्यावरणीय, आर्थिक) परिणाम नाही. त्याचा संबंध अनुवांशिक घटक, जन्मपूर्व आजार व समस्या, बालपण आजार व जखम, पर्यावरणाचे घटक यांच्याशी असू शकतो.
लेखन दोष अनेक विशिष्ट विकारांपैकी एक आहे. लेखनदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुळाक्षरांवर प्रक्रिया करून शब्द तयार करण्याची आणि शब्दसंपत्ती संकलित करण्याची क्षमता नसते. ते एकप्रकारचे अपंगत्व आहे. लिहिण्यासाठी आवश्यक असलेल्या बोटांच्या स्नायुंची अनुक्रमिक हालचाल आवश्यक असते, जी लेखन दोष असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नसते. लेखन दोषाचा विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकाशी लवशेषही संबंध नाही. त्यांची विचारक्षमता भक्कम असू शकते. असे जरी असले, तरी ही अक्षमता शैक्षणिक प्रगतीस बाधक ठरू शकते.
लिहिण्याच्या क्रियेत दोन टप्पे आहेत. (१) ध्वनी (श्रवण) : जे शब्द बोलले जात आहेत ते ऐकणे (भाषिकसंबंधी). (२) दृश्य (दृष्टी) : जे लिहून दाखविले जात आहेत किंवा दिसत आहेत. लेखन दोष असणारे विद्यार्थी ध्वनी किंवा दृष्टी यांच्या आधारे त्या शब्दांचा उलगडा करून त्यानुसार अक्षर आणि शब्द आकारणे किंवा लिहिणे शिकत असतो. खराब लिखाण, चुकीचे लिखाण, अक्षरांचे अनियमित आकार आणि स्वरूप, शब्दलेखनात अडचण, आपले विचार कागदावर लिहिण्याची अडचण, अवाचनीय हस्तलेखन, शब्द, अंकांची अव्यवस्थित मांडणी, अक्षर-शब्दांमध्ये योग्य अंतर नसणे, हळूवार लिहिणे, शब्द व अक्षरांचे विविध आकारांमध्ये फरक न करता येणे इत्यादी लेखन दोषाचे वा लेखन विकाराचे लक्षण आहेत. असे विद्यार्थी स्वत:च्या लिखाणाचे स्वयंमूल्यमापन करू शकत नाहीत. लेखन दोष असल्यामुळे या विद्यार्थांना लिहिण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. लेखन दोष असणारे विद्यार्थी लेखन करताना पेन-पेन्सील-लेखणी घट्ट पकडतात. त्यामुळे लेखन करताना त्यांना थकवा येतो. परिणामी त्यांना आळशी, बावळट समजले जाऊ शकते. लेखन दोष असलेले विद्यार्थी कमी आत्मविश्वास, अधिक ताण, मैत्री करण्यात अडचणी या गोष्टींनी ग्रस्त असू शकतात. म्हणून त्यांना आधार देण्याची, प्रेरित करण्याची, त्याना लेखानाऐवजी बोलण्यास संधी देणे, अक्षर गिरविण्याचा सराव करून घेणे आणि हातांचा योग्य व्यायाम करवून घेणे फायद्याचे ठरते.
लेखन दोष वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळ्या लक्षणांसह येऊ शकते. अशा विद्यार्थ्यांना लेखनासाठी रेघाटी कागद द्यावे, दोन रेषांमध्ये जास्त जागा असावी. त्यांना आलेख कागद दिल्यास कमी श्रम करावे लागतील आणि ते स्वत:ला सुव्यवस्थित ठेऊ शकतील. त्यांना लिहिण्यासाठी किंचित गुळगुळीत स्पर्ष असलेले व जाड पेन-पेन्सिल-लेखणी उपलब्ध करून द्यावे. शिवाय त्यांना स्वत: पेन-पेन्सिलची निवड करू द्यावी. इंग्रजीमधून लिहिण्यासाठी प्रवाही लेखनाला (कर्सिव्ह राइटिंग) जास्त पसंत करावी; कारण त्यात प्रत्येक अक्षरानंतर हाथ उचलावा लागत नसल्यामुळे याची त्यांना मदत होते. त्यांना जास्तीचा वेळ देण्यात यावा. या सुविधा त्यांच्यातील लेखन दोष दूर होण्यास साहाय्यभूत ठरतील आणि त्यांच्यामध्ये काही प्रमाणात सुधारणा होत जाईल.
समीक्षक : एच. एन. जगताप