आंतरजालाचा वापर करून आभासी अभ्यासक्रम निर्माण करण्याची आणि त्याचे प्रसारण व्यवस्थापन करणारी एक संगणक प्रणाली म्हणजे शिक्षण व्यवस्थापन प्रणाली होय. हिला शिकण्याच्या सर्व प्रक्रियांचे व शैक्षणिक संसाधनांचे वितरण-व्यवस्थापन करणारी संगणक प्रणाली असेही म्हणतात. विशेषतः आजच्या भ्रमणध्वनी व वेगवान आंतरजालाच्या युगात शिक्षण व्यवस्थापन प्रणाली हे उच्च गुणवत्तापूर्ण, परिणामकारक आणि आनंददायी शिक्षणाकरिता एक अत्यंत महत्त्वाचे साधन झाले आहे. शिकण्याच्या सर्व प्रक्रियांचे व्यवस्थापन आणि सुलभता, शिकण्यासाठी लागणारा कमी खर्च व वेळ, शिकण्याची उत्तम गती व परिणामकारकता, विद्यार्थी व शिक्षक यांच्यात सहज संवाद, लवचिक प्रवेश व उत्तम मूल्य इत्यादी शिक्षण व्यवस्थापन प्रणालीची मुख्य वैशिष्टे आहेत.
ब्लॅकबोर्ड, मूडल, इलीआस यांसारख्या अनेक ज्ञात शिक्षण व्यवस्थापन प्रणाल्या मोठ्या प्रमाणावर वापरात आहेत. बऱ्याच शिक्षण व्यवस्थापन प्रणालींमध्ये एक आशययुक्त शिक्षण व्यवस्थापन प्रणाली (लर्निंग कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम – एलसीएमएस) अंतर्भूत असते. शैक्षणिक संसाधनांचा संग्रह, संचयन, वापर आणि पुनरुत्पादनाचे व्यवस्थापन करण्याचे काम एलसीएमएस करते. शिक्षण व्यवस्थापन प्रणालीमुळे शैक्षणिक संस्थाच्या जनमानसातील प्रतिमेत तसेच त्यांच्या शैक्षणिक सेवा वापर करणाऱ्या विद्यार्थीसंखेत लक्षणीय सुधारणा झाल्याने गेल्या काही वर्षांपासून एलएमएसच्या माध्यमातून शिकणाऱ्यांच्या संखेत सतत वाढ झाली आहे.
शैक्षणिक संसाधनांची वितरण क्षमता, आभासी वर्गाचे व्यवस्थापन, शिक्षण प्रगतीचा मागोवा घेऊन अहवाल देणे, शिक्षण परिणाम मूल्यांकन, उपलब्धतेची नोंद, विद्यार्थी नोंद व्यवस्थापन, सहयोगी शिक्षण साधने, भ्रमणध्वनीचा शिक्षणाकरिता वापर, वेब ब्राउझरवर आधारित, सहज, सोपा लवचिक वापर आणि स्केलेबल ही वैशिष्ट्ये बऱ्याच एलएमएसमध्ये आढळतात.
एलएमएसने बऱ्याच संस्थेत शिक्षण व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट साधने प्रदान केली आहेत; परंतु त्यांचा काळजीपूर्वक वापर न केल्यास ते प्रत्यक्ष गुणवत्तेत आणि शिकण्याच्या परिणामकारकतेत घट होण्यास कारणीभूत ठरू शकतात. अनेक एलएमएसमध्ये आभासी अभ्यास सामग्री तयार करण्यासाठी टेम्पलेट्स असतात. ही टेम्पलेट्स त्वरित अभ्यासक्रम तयार करण्यास मदत करतात. एलएमएस वापरणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अनुभवातून सुधारणांसाठी होणारी मागणी आणि प्रगत तंत्रज्ञानाने निर्माण होणारी अनुकूलता यांमुळे एलएमएस सतत विकसित होत असल्याचे दिसते. पुढच्या पिढीतील एलएमएसमध्ये कार्यक्षमता, सानुकूलता, लवचिकता, आंतरकार्यक्षमता (इंटरऑपरेबिलिटी) आणि स्केलेबिलिटी सुधारली जातील अशी अपेक्षा आहे.
पारंपारिक पद्धतीने वर्गाधारित शिक्षण देणाऱ्या संस्थासाठी योग्य आभासी शिक्षण व्यवस्थापन प्रणाली निवडणे आणि यशस्वी अंमलबजावणी करणे, ही एक मोठी उपलब्धी आहे. एलएमएस खरेदी करण्याचा निर्णय घेताना काही पर्याय उपलब्ध असतात. उदा., (१) ऑफ द शेल्फ एलएमएस खरेदी करणे आणि त्याचा वापर करणे. (२) ऑफ द शेल्फ एलएमएस खरेदी करून वापरण्यापूर्वी आपल्या गरजेनुसार आवश्यक बदल करणे. (३) आपल्या आवश्यकतांसाठी एलएमएस विकसित करणे.
मूडल (Moodle) : ज्ञान निर्मितीचा सामाजिक रचनावादी दृष्टिकोण वापरणारी जगातील सर्वांत लोकप्रिय आणि शाळा महाविद्यालय विद्यापीठे यांसारख्या संस्थांना अतिशय उपयुक्त असणारी एक शिक्षण व्यवस्थापन प्रणाली. मूडलचे संक्षिप्त रूप मॉड्युलर ऑब्जेक्ट ओरीएन्टेड डायनामिक लर्निंग इनविरॉन्मेट असे आहे. मूडल ही एक मुक्त स्त्रोतातून उपलब्ध असणारी एलसीएमएस आहे. मूडलचे सर्व हक्क सुरक्षित असले, तरी ही मृदूजाल (सॉफ्टवेअर) प्रणाली सामान्य नागरिक परवाना (जनरल पब्लिक लायसन्स – जीएनयू) च्या अंतर्गत जगातील कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला पूर्णपणे विनामूल्य वापर किंवा त्यात बदल करण्याची सुभा देते. मूडल मृदूजाल प्रणाली विंडोज किंवा लिनक्स नियंत्रण प्रणालीच्या कोणत्याही संगणकावर प्रस्थापित करता येते. अशा संगणकावर मूडल प्रस्थापित करण्यासाठी ‘पीएचपी’ आणि ‘माय एसक्यूएल’सारखे मुक्त मृदूजाल प्रणाली असणे आवश्यक असते. मूडल वापरून आभासी अभ्यासक्रम निर्माण करण्याची व त्याचे प्रसारण व्यवस्थापन करण्याची विनामूल्य सेवा देणारी भरपूर संकेतस्थळ उपलब्ध आहेत. कोणताही शिक्षक या विनामूल्य सेवेचा वापर करून आपला स्वातःचा आभासी अभ्यासक्रम कोणत्याही भाषेत सुरू करू शकतो. मूडलचा वापर करणाऱ्यास मूडलर म्हणतात.
कोरोना काळात (२०१९-२०) जगातील २३५ देशांतील सुमारे ७.३ कोटी विद्यार्थी सुमारे ८७ हजार वेगवेगळ्या संकेतस्थळाचा वापर करून सुमारे ७९ लाख वेगवेगळे विषय सुमारे १३ लाख शिक्षकांच्या मदतीने आभासी पद्धतीने शिकत होते. मूडल प्रणालीतील सुमारे १३ कोटी फोरम पोस्ट किंवा २० कोटी प्रश्न शिकण्याच्या प्रक्रियेत मदत करीत होते. प्रत्येक सहा महिन्यांनी मूडलची नवीन सुधारित आवृत्ती उपलब्ध होत असते. सध्या मूडलच्या सर्वांत नवीन सुधारित आवृत्ती क्रमांक ३.८ असा आहे.
सामाजिक रचनावाद आणि मूडल : सामाजिक रचनावाद म्हणजे परस्पर सहकार्याने शिकण्याच्या वातावरणात प्रत्येक व्यक्ती एकाच वेळी विद्यार्थी आणि शिक्षक असतो. मूडलमधील फोरम किंवा विकीचा वापर करून प्रत्येक विद्यार्थी शैक्षणिक साहित्याची निर्मिती करीत असतो. नंतर याचा वापर करून इतर सहयोगी विद्यार्थी शिकतात. दुसऱ्या व्यक्तीस अनुभवता येईल अशी आपली एखादी निर्मिती क्रिया किंवा दुसऱ्या व्यक्तीस समजावून सांगण्याच्या क्रियेतून आपण अतिशय उत्तम शिकतो. उदा., मूडलमधील कोर्स स्ट्रक्चर आणि फोरम किंवा विकीचा वापर करून प्रत्येक विद्यार्थी आपले ज्ञान इतर सहयोगी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो आणि त्यातून नवीन ज्ञान निर्मिती करीत असतो. आपल्या सहयोगी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक कृतींचे फक्त निरीक्षण करूनसुद्धा आपण भरपूर शिकत असतो. जसे मूडलमधील ऑनलाइन यूजर्स ब्लॉक (आभासी वापरकर्ता अवरोध) किंवा रेंट ॲक्टिविटिज ब्लॉक (अलिकडील उपक्रम अवरोध) च्या निरीक्षणातून शिकण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या एकंदर पार्श्वभूमीची माहिती मिळाल्यास अतिशय परिणामकारक रीत्या शिकविणे शक्य होते. जसे मूडलमधील यूजर प्रोफाईल, वापरकर्ता उपक्रम अहवाल, किंवा निवड, सर्वेक्षण यांसारख्या कृतींचा वापर करून शिक्षक अधिक परिणामकारक रीत्या शिकवू शकतात. मूडलवर आधारित शैक्षणिक वातावरण हे अत्यंत लवचिक आणि स्वतःमध्ये बदल करण्यास सक्षम असल्यास विद्यार्थ्यांना गरजेनुसार शिकता येते.
मूडल वापराचे स्तर : शिक्षकाला याचा वापर विविध स्तरांवर करता येतो.
- स्वतःचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याकरिता.
- आंतरजालावरील उपलब्ध साहित्य आणि कृतीचा वापर शिक्षकाच्या मदती शिवाय करण्याकरिता.
- विद्यार्थ्यांना माहितीचे आदान-प्रदान होण्याकरिता व आपापले अनुभव आकलन, अडचणी इतरांपर्यंत पोचविण्यासाठी.
- इतरांच्या अडचणी सोडविण्यासाठी उपयुक्त चर्चा मंच, स्वयं चाचणी किंवा गृह पाठ (शिक्षकाची कमीत कमी मदत अपेक्षित).
- विकी, शब्दकोश किंवा डेटाबेससारख्या आंतरक्रियेस मदत करण्याऱ्या शैक्षणिक कृती (शिक्षकाची जास्त मदत अपेक्षित).
- शिक्षकाच्या मार्गदर्शनासह विद्यार्थ्यांमध्ये माहितीचे आदान-प्रदान होण्याकरिता.
- चर्चा मंच, क्रम बदलू शकणाऱ्या शैक्षणिक कृतीचा वापर, निवड, सर्वेक्षण यांसारख्या कृतींचा विद्यार्थ्यांच्या पार्श्वभूमीची माहिती मिळविण्याकरिता.
- वापर, सहयोगी विद्यार्थ्यांचा सहभाग असणाऱ्या कार्यशाळासारख्या शैक्षणिक कृतीचा वापर.
जेव्हा कोणी मूडल संकेतस्थळाला भेट देतो, तेव्हा तो मूडलच्या प्रथम पानाला (होम पेज) भेट देतो. मूडलच्या प्रथम पानावर माहिती वेगवेगळ्या पद्धतीने दर्शविता येते. मूडल संकेतस्थळ वेगवेळ्या अभ्यासक्रमाचे बनले असते. अभ्यासक्रमाच्या पानांवर शिक्षक वेगवेगळी शैक्षणिक साधने आणि कृती विद्यार्थ्यांकरिता सहसा मधल्या भागात उपलब्ध करतो. संकेतस्थळाचा मधला भाग वेगवेगळे विषय (टॉपिक्स) किंवा आठवडे (विक्स) यांमध्ये विभागलेला असते. शिक्षक संकेतस्थळाच्या डाव्या व उजव्या भागात वेगवेगळे मूडल प्रतिरोध वापरून, अधिकची उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करतो. एकाच अभ्याक्रमाच्या पानावर आवश्यक असेल त्या कालावधीच्या (उदा., वर्षे, सत्र इत्यादी) अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक साधने आणि कृती उपलब्ध करतो. एका अभ्यासक्रमाच्या पानासाठी एक किंवा अनेक शिक्षक असू शकतात. अभ्यासक्रमाच्या पानांचे वेगवेगळ्या स्तरावरील प्रभागात वर्गीकरण केल्यामुळे विद्यार्थ्यांस अभ्यासक्रम शोधणे सोपे जाते.
मूडल संकेतस्थळात प्रवेश करता वेळी (ड्युरिंग लॉगीन) कोणतीच व्यक्ती ही शिक्षक किंवा विद्यार्थी नसते. मूडल संकेतस्थळात प्रवेश केल्यानंतर जर त्या व्यक्तीने कोणत्याही विशिष्ट अभ्यासक्रमाच्या पानावर नावनोंदणी केले, तरच त्या व्यक्तीला विद्यार्थी ही भूमिका त्या विशिष्ट अभ्यासक्रमाच्या संदर्भात मिळते. मूडल संकेतस्थळाचा फक्त प्रशासक (ॲडमिनिस्ट्रेटर) कोणत्याही व्यक्तीला शिक्षक ही भूमिका विशिष्ट अभ्यासक्रमाच्या संदर्भात देऊ शकतो.
समीक्षक : अनंत जोशी