खानखोजे, पांडुरंग सदाशिव : (७ नोव्हेंबर १८८३ – २२ जानेवारी १९६७) पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. वडलांनी त्यांना शिक्षणासाठी नागपूरला पाठवले. तेथे त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने स्वदेशी वस्तूंचे दुकान काढले. पुढे प्लेगमुळे शाळा बंद झाल्या. इंग्रजांविरुध्द लढण्यासाठी स्फोटकांचे ज्ञान घेणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत बनले. म्हणून ते भारत सोडून जपानमार्गे अमेरिकेला गेले. अमेरिकेत गेल्यावर ते बर्कली येथे मित्रासह राहू लागले. निव्वळ लष्करी प्रशिक्षण मिळणे कठीण दिसताच त्यांनी कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. त्यानंतर लष्करी महाविद्यालयातही प्रवेश मिळाला. १९११ मध्ये कृषीशास्त्र आणि लष्करी प्रशिक्षणाची पदवी त्यांना मिळाली. मेक्सिकोमध्ये त्यांनी कृषीशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. दुष्काळी भागात शेती कशी करता येईल, यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले. त्याचवेळी स्वातंत्र्यासाठी युवकांना प्रेरित करणाऱ्या गदर प्रकाशनाच्या मराठी आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले. पशुपालन आणि दुग्धव्यवसायाचे सखोल ज्ञान घेऊन त्यांनी एम.एस. ही कृषीशास्त्रातील पदवी घेतली.
त्यांना इंग्रजांनी दोन वेळा अटक केली मात्र दोन्ही वेळा ते कैदेतून निसटले. सुटका करून घेतल्यावर ते रशियाला गेले. तेथे लेनिन यांची भेट घेतली. त्यानंतर परत मेक्सिकोला गेले. मेक्सिकोतील कृषी विद्यापीठात प्राध्यापक झाले. तसेच प्रेरणादायी लेखन आणि कृषी संशोधनावर लक्ष केंद्रीत केले. अलाबामा येथे जाऊन त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे कार्य पाहिले. तेथील परिषदेत त्यांनी वाचलेला शोधनिबंध खूप गाजला. जमीन आणि पिके, जनुकशास्त्र या विषयावरील अभ्यासाने मेक्सिकोत स्वत:चे स्थान निर्माण केले. तेवोसिंतले या रानटी तणाचा संकर घडवून त्यांनी तेवोमका नावाचे मक्याचे नवे वाण तयार केले. या वाणाच्या रोपाला तीस-तीस कणसे लागत. जंगली वाणापासून अधिक उत्पादन देणारे वालाचे वाण बनवले. मेक्सिकोमध्ये मसाल्याची शेती करण्यास सुरुवात केली. मेक्सिकन सरकारने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. त्यांनी एकूण २५०० संकरित वनस्पती तयार केल्या. मेक्सिकोमध्ये त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजीची स्थापना केली. मेक्सिको सरकारच्या कृषी विभागाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मका, गहू, रताळी, ताग, सोयाबीन या पिकांच्या वाणात आणि पीक पद्धतीत सुधारणा घडवून आणली. यामुळे मेक्सिकोमध्ये अन्नधान्याचे उत्पादन वाढले. या कार्यामुळे मेक्सिकोतील लोक त्यांना हिंदू जादूगार म्हणून ओळखू लागले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते भारतात परतले. मात्र बोटीतून उतरताच त्यांना अटक झाली कारण त्यांचे नाव इंग्रजांच्या काळ्या यादीत समाविष्ट होते. मध्य प्रदेशच्या मंत्र्यांनी त्यांची सुटका केली. त्यांनी भारतीय कृषी धोरणाविषयी महत्त्वाचे दस्तऐवज अहवाल तयार केले. भारताच्या सीमेवरील बर्फाळ भागात शेती कशी करावी याचे स्थानिकांना प्रशिक्षण देण्यासाठीचा प्रकल्प तयार करून त्यांनी सरकारला सादर केला. सीमेवर शेती केल्यास शेतकरी चीन, पाकिस्तान अशा शेजारी राष्ट्रांच्या सैन्याच्या हालचाली आपणास कळवतील आणि सीमांचे रक्षण होईल, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र हा प्रकल्प कार्यान्वित झाला नाही.
भारतात झालेल्या साखर उत्पादक देशांच्या परिषदेत त्यांनी मेक्सिकन सरकारच्या सूचनेप्रमाणे मेक्सिकन सरकारचे प्रतिनिधित्व केले.
वयाच्या ८४ व्या वर्षी खानखोजे यांचा मृत्यू झाला.
संदर्भ :
- नाही चिरा.. खानखोजे, वीणा गवाणकर
- https://www.documenta14.de/en/south/903_revolutionary_work_pandurang_khankhoje_and_tina_modotti
समीक्षक : मोहन मद्वाण्णा